Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

नगराध्यक्ष बंडगर अपात्र!
* उस्मानाबाद पालिकेच्या जागेवर अतिक्रमण
* सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी
उस्मानाबाद, ३ मार्च/वार्ताहर

नगरपालिकेच्या जागेवर नऊ वर्षे अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. बंडगर यांची कृती अध्यक्षपदास न शोभणारी असल्याचे नमूद करीत त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल हा निर्णय दिला. बंडगर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सुशिक्षित बेरोजगार असल्याचे सांगून बंडगर यांनी नगरपालिकेची दोन हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर करार करून घेतली.

कॉपीमुक्त परीक्षा :
कथा आणि व्यथा

दर वर्षी फेब्रुवारी-मार्च महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या स्तरावरील परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपीबाबत चर्चा सुरू होते. शिक्षणक्षेत्राशी संबंधित विचारवंत आणि अधिकारी घोषणा करतात की, ‘या वर्षी कॉपीवर परिणामकारक नियंत्रण करण्यात येईल आणि कॉपी होऊ देणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता काढून घेण्यात येईल. याकरिता भरारी पथके स्थापन केली जातात.’
इतके करूनही मागील १० वर्षांत परीक्षाकेंद्रांवरील कॉपीच्या प्रमाणात घट झालेली नाही. उलट त्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होते आहे.

पंतप्रधान व्हायचे असेल तर पवारांनी राज्यातील सर्वच जागा लढवाव्यात - आंबेडकर
औरंगाबाद, ३ मार्च/प्रतिनिधी

‘अब की बार शरद पवार’ अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. त्यांची ही घोषणा यशस्वी होईल. पण एकवीस जागा लढवून पंतप्रधान होता येत नाही; त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागा लढवाव्यात, असा सल्ला भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला. ‘‘पंतप्रधानपदासाठी माझ्या पवारांना शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी सर्व जागा लढविल्या नाहीत तर माझ्या शुभेच्छा हवेतच विरतील,’’ असेही ते म्हणाले.

पहिले पाढे पंचावन्न!
बंड यांनी थांबविलेल्या तीन कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील
औरंगाबाद, ३ मार्च/प्रतिनिधी
महानगरपालिकेची आर्थिक आवक आणि खर्च याची सांगड बसत नसल्याने तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी कमी महत्त्वाची सर्वच कामे थांबविली होती. त्यामुळे काहीसे आर्थिक नियोजन झाले आणि गेल्या तीन महिन्यांपासून पगाराबरोबरच ठेकेदारांचीही देणी वेळेवर देणे शक्य झाले. श्री. बंड यांची बदली होताच त्यांनी अडविलेल्या बहुतांशी कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कुवतीपेक्षा जास्त कामांना मंजुरी देण्यात आली असल्याने येत्या दोन महिन्यांत पुन्हा पहिल्यासारखेच चित्र निर्माण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’
सोयाबीन अनुदानात केलेल्या अन्यायाचा आमदार जाधव यांच्याकडून निषेध
परभणी, ३ मार्च/वार्ताहर
सोयाबीन नुकसानभरपाई प्रकरणी लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ांना उदार हस्ते अनुदानाचे वाटप करणाऱ्या सरकारने परभणी जिल्ह्य़ावर पुन्हा एकदा अन्याय करीत जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद करीत सहा तालुक्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. तर लाभ मिळणाऱ्या तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही किरकोळ अनुदान देऊन त्यांची बोळवण केली आहे. या प्रकाराचा आमदार संजय जाधव यांनी पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

कॉपी करणाऱ्या २० विद्यार्थ्यांवर भरारी पथकाकडून कारवाई
लोकसत्ता इफेक्ट
नांदेड, ३ मार्च/वार्ताहर
कॉप्यांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या भरारी पथकांनी काल उघडपणे कॉप्या करणाऱ्या २० विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्य़ांत कॉपीविरोधी अभियान सुरू असताना नांदेडमध्ये मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उदासीनता व पोलिसांचे दुर्लक्ष या पाश्र्वभूमीवर बहुतांश केंद्रांवर मुक्तपणे कॉपी करणे सुरू होते शुक्रवारी झालेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेच्या वेळी कॉपी अभियानात काही संस्थाचालक, ग्रामीण भागातील काही शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारीही सहभागी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर, ३ मार्च/वार्ताहर

संसारोपयोगी वस्तू अध्र्या किमतीत देण्याचे आमिष दाखवून जिंतूरवासीयांना दोन कोटी रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या ‘रॉयल ट्रेडर्स’चा चालक बालाजी नाडल याच्यासह चार जणांविरुद्धजिंतूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. तामिळनाडू येथील बालाजी नाडाल, शेख सलीम शेख रहीम, कुबेरन कोलिअप्पन, रविकुमार यांनी ‘रॉयल ट्रेडर्स’ या नावाने बलसा रस्त्यावर १५ डिसेंबर २००८ रोजी दुकान थाटले. गृहोपयोगी वस्तू अध्र्या किमतीत देण्याचे आमिष दाखविण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी काही ग्राहकांना वस्तूचे वितरणही करण्यात आले. त्यानंतर नोंदणीसाठी एकच गर्दी झाली.दरम्यान, पोलिसांनी ‘रॉयल ट्रेडर्स’च्या चालकाविरुद्ध कारवाई केली. त्याविरोधात नाडल याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. उच्च न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिली. परिणामी नाडल याच्यावर लोकांचा अजून विश्वास बसला. लोकांनी मोठय़ा प्रमाणात नाडल याच्याकडे रक्कम जमा केली. नाडलने साथीदारांसह १२ जानेवारीला पलायन केले. पोलिसांनी या प्रकरणी सविस्तर माहिती उच्च न्यायालयासमोर ठेवल्यावर नाडल याची याचिका खारिज करण्यात आली. यानंतर आज येथील नियाजखान पठाण यांची तक्रार घेऊन वरील चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चाळीस विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले
गेवराई, ३ मार्च/वार्ताहर

बारावीची परीक्षा सुरू असलेल्या केंद्रांना भेट देऊन कॉप्या करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांवर राज्य परीक्षा मंडळाच्या पथकाने कारवाई केली. र. भ. अट्टल महाविद्यालयात १२ विद्यार्थी कॉप्या करताना पथकाला आढळले. परीक्षा केंद्राबाहेरील सुळसुळाट कमी झाला असला तरी परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांचे पाहून लिहिण्याचे सुरूच असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. ‘भौतिकशास्त्र-२’ या विषयाची आज परीक्षा पेपर सुरू असताना पथकाने गढी येथे जय भवानी महाविद्यालयात २८ जणांना व अट्टल महाविद्यालयातील १२ जणांना कॉपी करताना पकडले. डॉ. वामनराव जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडा- श्री श्री रविशंकर
औरंगाबाद, ३ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. योग्य उमेदवार सभागृहात गेले पाहिजे यासाठी योग्य उमेदवार निवडा आणि त्यासाठी सर्वानी कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, असा सल्ला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी औरंगाबादकरांना दिला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरास गरवारे मैदानावर सोमवारी सायंकाळपासून सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
‘नावे आणि घोषणा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वच राजकीय पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामुळे अनेकजण मतदान करण्याच्या फंदात पडत नाही. यात देशाचे नुकसान आहे. आपण मतदान केल्याशिवाय योग्य उमेदवार निवडून येणार नाहीत. मतदानाचा हक्क बजावणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. चांगला उमेदवार नाही म्हणून मत देण्याचे टाळणार असाल तर तेही धोकादायक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी बाहेर पडा आणि त्यातल्या त्यात चांगल्या उमेदवाराला मतदान करा. मतदान करताना उमेदवाराची जात-पात असे काहीही बघू नका आणि कोणत्याही उमेदवाराच्या आमिषालाही बळी पडू नका,’ असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

डॉ. सतीश साळुंके यांच्या पुस्तकांचे विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन
बीड, ३ मार्च/वार्ताहर

अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाटककार डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘घुसमट’ व ‘अस्वस्थ तरीही’ या नाटय़ पुस्तकांचे तर ‘एका देशाचा शिल्लक इतिहास’ या एकांकिका संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. या तिन्ही पुस्तकांचा लोकार्पण कार्यक्रम होणार असल्याची माहिती परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. प्रसिद्ध रंगकर्मी व लेखक डॉ. सतीश साळुंके यांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचे प्रकाशन अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, कार्यवाह अतकरे यांच्या हस्ते झाले. प्रकाशनानंतर तिन्ही पुस्तकांच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. सातासमुद्रापलीकडे बीडच्या रंगकर्मीने आपले साहित्य नेल्याबद्दल या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने केला जाणार आहे.

लाच स्वीकारणाऱ्या अव्वल कारकुनास पकडले
नांदेड, ३ मार्च/वार्ताहर

भूसंपादनाच्या रकमेचा धनादेश देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणारा अव्वल कारकून प्रभाकर धोंडोपंत पाठक यास आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक महेंद्र नरसिचलू सामलेट्टी यांची जमीन गुरु-ता-गद्दी सोहळ्यासाठी झालेल्या विकासकामांसाठी घेण्यात आली होती. या जमिनीच्या एकूण मावेजापैकी त्यांना चार लाख सात हजार रुपये देण्यात आले होते. उर्वरित ४५ हजार रुपयांचा धनादेश देण्याासाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रभाकर पाठक याने एक हजार रुपयाची लाच मागितली. सामलेट्टी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचला. आज दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहामध्ये पाठक याला हजार रुपयाची लाच घेताना पकडले. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. महत्वाची बाब म्हणजे मावेजाचा धनादेश देण्याचे काम पाठक याच्याकडे नव्हते, शिवाय तो ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक होता.

काँग्रेस सरकार जनतेच्या विश्वासास अपात्र - मुंडे
लातूर, ३ मार्च/वार्ताहर

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार मागील पाच वर्षांत जनतेच्या विश्वासास अपात्र ठरले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी केले. दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा नवयुवक मतदार स्वागत मोहीम कार्यक्रमात श्री. मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद केंद्रे होते. संघटनमंत्री सुधाकर भोयर, रामचंद्र तिरुके, रमेश कराड, सुजितसिंह ठाकूर, आमदार बब्रुवार खंदाडे, नगरसेवक देवीदास काळे, डी. एन. शेळके, गणेश हाके कार्यक्रमास उपस्थित होते.श्री. मुंडे म्हणाले की, केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या राजवटीत बेरोजगारीचे प्रमाण वाढले व त्यामुळे तरुण दिशाहीन झाले. या सरकारच्या राजवटीत दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महागाईने परिसीमा गाठली आहे. दहशतवादी कारवायांत कमालीची वाढ झाली आहे. हे सरकार जनतेच्या मनातून उतरले असून परिवर्तन हाच यावरील एकमेव उपाय आहे. या सरकारला खाली खेचून भा. ज. प.चे सरकार सत्तेवर आणावे. प्रास्ताविक भा. ज. यु. मो.चे जिल्हाध्यक्ष बाबुराव खंदाडे यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे उद्या महिला संमेलन
नरेंद्र मोदींची जाहीर सभा
औरंगाबाद, ३ मार्च/खास प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे महिलांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या मागील मैदानावर औरंगपुऱ्यात महिला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या महिला संमेलनाला राज्यातील पन्नास हजार महिला सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली. या महिला संमेलनाचा समारोप गुजरातचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेने होणार आहे. महिलांचे प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार या संदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. स्त्रीसन्मान, समान संधी आणि सुरक्षा यावर आधारित हे संमेलन असणार आहे. या महिला संमेलनामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजपच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा किरण माहेश्वरी, राष्ट्रीय चिटणीस आणि अभिनेत्री स्मृती इराणी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार रावसाहेब दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत.

‘शिव योद्धा विकास मंच’ ची गांधीगिरी
औरंगाबाद, ३ मार्च/प्रतिनिधी

रेल्वे येण्यापूर्वी फाटक बंद झाल्यानंतर त्या खालून रूळ ओलांडण्यात येत असल्याने अनेक वेळा अपघाताचे प्रकार घडले आहेत. तरीही फाटक बंद असताना अनेकजण रूळ ओलांडतात. नव्यानेच स्थापन झालेल्या शिवयोद्धा विकास मंच या संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी आज दुपारी शहानूरमिया दर्गा येथे फाटक बंद असताना रूळ ओलांडणाऱ्या दुचाकीधारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यांच्या या गांधीगिरीमुळे फक्त चारचजणांनी रूळ ओलांडला, अनेकजण अध्र्या रुळावरून परत फिरले. एक महिन्यापूर्वीच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष संग्राम पवार यांनी येथे गांधीगिरी करण्याचे ठरविले.

अंश कोटेक्सला आग; १२ लाखांचे नुकसान
अंबड, ३ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील शहागड येथील अंश कोटेक्स जीनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत आज दुपारी दोन गंजींना आग लागून ४०० क्विंटल कापूस भस्मसात होऊन अंदाजे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. पाच अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा कापूस खरेदी सुरू होती, मात्र ग्रेडर जागेवर नव्हता. आज दुपारी खरेदी केलेल्या ११ हजार ८०० क्विंटल कापसाच्या दोन गंजींना कापूस खरेदी सुरू असताना आग लागली.

श्री नाथषष्ठी महोत्सव मंडपाचे भूमिपूजन
लातूर, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

औशाच्या श्री सद्गुरू मल्लनाथ संस्थानाचा श्री नाथषष्ठी महोत्सव १२ ते २० मार्च या काळात लातूर येथील व्यंकटेश बालाजी मंदिर येथे होणार आहे. या महोत्सव मंडपाचे भूमिपूजन रविवारी महाराष्ट्र राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, व्यंकटेश बालाजी मंदिर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष कांताप्रसाद राठी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी उपस्थित होते.अद्वैत धर्मप्रसारक, सद्गुरू सांप्रदायिक धर्मपीठ श्रीक्षेत्र औसा येथील वैशिष्टय़पूर्ण, पारंपरिक व प्रासादिक २१२ वा श्री नाथषष्ठी महोत्सव ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर, रत्नेश्वर पावननगरीत होणार आहे. या महोत्सवात सद्गुरू व संतांच्या आशीर्वचन व दर्शनाचा लाभ सर्वाना मिळणार आहे. तसेच संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरू गुरूबाबा महाराज औसेकर यांचे नित्य चक्रभजनाचा लाभ भाविकांना होणार आहे. या महोत्सवाच्या मंडप भूमिपूजन समारंभास डॉ. चंद्रकांत देऊळगावकर, माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान आदी उपस्थित होते.

मूक-बधिर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
लातूर, ३ मार्च/वार्ताहर

जीवन विकास प्रतिष्ठानद्वारे संचलित मूक-बधिर, मतिमंद विद्यालय, सौ. सुशीलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूक-बधिर विद्यालयाच्यावतीने मूक-बधिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन विभागीय समाजकल्याण अधिकारी एस. बी. भंडारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिल मुळे होते. प्रमुख पाहुणे शरद कारखानीस, राम जेवरे, दीपरत्न निलंगेकर उपस्थित होते. चित्रकला, क्रीडा स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामानुज रांदड यांनी केले. विद्यार्थ्यांना सुनीता कुलकर्णी, राजेश शर्मा, जयलाल गायकवाड, श्रीकृष्ण लाटे, संजय बुरांडे, संजय सुडे आदी शिक्षकांनी सहकार्य केले योवेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत देऊळगावकर, संचालक कांताप्रसाद राठी, मुख्याध्यापक एम. ए. खरोसेकर आदी उपस्थित होते.

‘एका नावेचे प्रवासी’सामाजिक सलोख्यासाठी उपयुक्त
हिंगोली, ३ मार्च/वार्ताहर

‘‘सर्वाना सामावून घेणे ही भारतीय संस्कृती असून याचा विसर अनेकांना ँपडल्याने, वादविवाद, जातीय दंगली होऊन सर्वसामान्य भरडला जातो; अशा धोक्यापासून सावध होऊन एकमेकांना शहाणपण शिकविण्यासाठी ‘एका नावेचे प्रवासी’ हे पुस्तक उपयुक्त आहे’’, असे उदगार जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी काढले. सरजुदेवी कन्या प्रशालेत मंगळवारी बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. ‘एका नावेचे प्रवासी’ या पुस्तकाचा अभ्यास करून यातून शांतता, जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता आत्मसात करून परीक्षेत सर्वश्रेष्ठ गुण मिळविलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिवार प्रतिष्ठान नांदेडचे डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, प्रा. उमाकांत जोशी यांनी पोलीस विभागाच्या साह्य़ाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

परीक्षांच्या काळात मुरुडमध्ये अभ्यासाच्या वेळेतच वीजकपात
लातूर, ३ मार्च/वार्ताहर

मुरूडमध्ये वीजकपातीाच्या वेळेत केल्या गेलेल्या बदलामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. इतर कार्यक्रमाच्या वेळी सायंकाळची वीजकपात कधी कधी रद्द करण्यात येते; परंतु ऐन परीक्षेतच सायंकाळी वीजकपात सुरु केल्याने विद्यार्थीवर्गात नाराजी पसरली आहे. बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या असून, दहावीच्या परीक्षाही ५ मार्चपासून सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत विद्युत कंपनीने वीजकपातीची दिवसाची वेळ अचानक बदलून सायंकाळी ५ ते ८ अशी केली आहे. विद्यार्थीवर्ग परीक्षेमुळे प्रचंड मानसिक तणावात असतो. त्यातच सायंकाळी केलेल्या वीजकपातीमुळे त्यांच्या तणावात भरच पडली आहे. वीजकपातीच्या वेळेत केलेल्या बदलाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही, अशा आविर्भावात वीज मंडळ वागत असल्याचे दिसून येत आहे.

शिवराज पाटील यांनी
इंग्रजी अनुवाद केलेल्या दासबोधाचे आज प्रकाशन
लातूर, ३ मार्च/वार्ताहर

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी इंग्रजी अनुवाद केलेल्या दासबोध या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता होत आहे. दासबोधाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, पालकमंत्री दिलीप देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर व एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चाकूरकर असतील. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकाशक प्रा. बी. व्ही. मोतीपवळे यांनी केले आहे.

अर्जुनराव कुकडे यांचे निधन
परतूर, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अर्जुनराव कुकडे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर रायपूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

परतूर पालिकेचे अंदाजपत्रक फेटाळले
परतूर, ३ मार्च /वार्ताहर

नगरपालिकेचे २००९-१० या आर्थिक वर्षांचे २८ हजार ४७० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक विशेष सभेत दहा विरुद्ध सात मतांनी फेटाळण्यात आले. नगरपालिकेच्या सभागृहात अलीकडेच अर्थसंकल्पीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष विनायक काळे यांनी २८ हजार ४७० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक बैठकीत सादर केले. अंदाजपत्रकावर चार-पाच तास प्रदीर्घ वादळी चर्चा झाली. परंतू अखेपर्यंत या अंदाजपत्रकाला सभागृहाची मंजुरी मिळाली नाही. अंदाजपत्रकाच्या बाजूने सात तर विरोधात दहा मते पडली. परिणामी अंदाजपत्रक फेटाळण्यात आले. नगरपालिकेत काँग्रेसचे बहुमत असून, शिवसेनेचे सात व एक अपक्ष नगरसेवक आहे. विरोधी नगरसेवकांची संख्या आठ आहे. अंदाजपत्रकाच्या विरोधात दहा मते पडल्याने काँग्रेसची दोन मते फुटल्याचे निष्पन्न झाले.

शेतकऱ्यांनी कळंब बाजार समितीलाच मालाची विक्री करावी
सभापती टेकाळे यांचे आवाहन
कळंब, ३ मार्च/वार्ताहर

शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून बाजार समितीने चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारातच आणावा. इतरत्र बाजारपेठ शोधू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सतीश टेकाळे यांनी केले.बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यापारी, हमाल, शेतकरी यांचा समन्वय नसल्याने तक्रारी वाढल्या होत्या. शेतकरी आपला शेतीमाल नेण्यासाठी इतर बाजारपेठेत जाऊ लागले होते. राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून शेतकरी, व्यापारी, हमाल यांची बैठक होऊन यामध्ये उघड लिलाव पद्धतीने सौदे करणे, डबा किंवा पैसा न घेणे, नियमबाह्य़ प्रथेस थारा न देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापुढील काळात शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल याच बाजारपेठेत आणावा व काही तक्रारी असल्यास त्वरित कार्यालयात लेखी द्यावे, असे आवाहनही श्री. टेकाळे यांनी केले.

उन्हाळा, लगीनसराईमुळे लिंबाचे भाव कडाडले
सोयगाव, ३ फेब्रुवारी/वार्ताहर

उन्हाळ्यातील लगीनसराईमुळे लिंबाची मागणी वाढल्याने बाजारात लिंबांचे भाव ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचले. थकवा दूर करणाऱ्या लिंबाला वर्षभर मागणी असते. मात्र उन्हाळ्यातील चार महिने लिंबांचा तुटवडा असतो. यंदा लगीनसराईत अपेक्षेपेक्षा लिंबाची मागणी आल्याने लिंबाचे भाव २० रुपये किलोवरून ५३ रुपये किलोपर्यंत पोहोचले.तालुक्यात लिंबांच्या बागा नाहीत. जवळच्या जळगाव जिल्ह्य़ातून लिंबाची मोठय़ा प्रमाणावर आवक होते. पाणीटंचाईचा फटका यंदा लिंबाच्या मळ्यालाही बसला. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. उन्हाळ्यात रसवंती हॉटेलसह सर्वसामान्यांच्या घरात लिंबाचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग होतो. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी लिंबू पाणी दिले जाते. यामुळे लिंबाला मागणी असते. किरकोळ लिंबूही १ ते २ रुपयाला एक मिळत आहे. मागणी वाढल्याने लिंबाच्या भावात अजूनही भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी सांगितले. लिंबाच्या तुटवडय़ामुळे बाजारात रेडीमेड मिळणारी लिंबू पावडरची विक्री वाढली आहे. अवघ्या २ ते ५ रुपयाला लिंबू पावडरची पुडी मिळाल्याने दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे.

गंगाखेडमध्ये तीन दुकानांसह एक घर भस्मसात
गंगाखेड, ३ मार्च/वार्ताहर

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ग्यानोमामा कलम सेंटर, श्री लेडीज एम्पोरियम, वैशाली भांडी भांडार या तीन दुकानांसह एका घरास भीषण आग लागली. आगीमुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी सहा वाजता घडली.दिलकश चौकातील संदीप गव्हाणकर यांच्या मालकीच्या घर व दुकानास आज सकाळी सहा वाजता भीषण आग लागली. यामध्ये येथील प्रसिद्ध ग्यानूमामा कलम स्वीट मार्टचे मालक भगवान प्रल्हाद कात्रे यांचे कलमचे दुकान, दत्ता नारायण फुटके यांचे श्री लेडीज एम्पोरियम व जनरल स्टोअर्स, सुभाष वसंत महाजन यांचे वैशाली भांडी भांडार तसेच छाया गंगाधर चव्हाण यांच्या घर व दुकानास प्रचंड आग लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संदीप गव्हाणकर यांच्या घर व दुकानात ग्यानोमामा कलम सेंटर व श्री लेडीज एम्पोरियम व जनरल स्टोअर्स आहे तर लागूनच समोर सुभाष महाजन यांचे भांडीची शोरुम आहे. अचानक लागलेल्या आगीने कलम सेंटर व जनरल स्टोअर्स तसेच छाया गव्हाणकर यांचे घर तसेच संसारोपयोगी वस्तू व नगदी रोकड सर्व जळून खाक झाले. श्री लेडीज एम्पोरियमचे १ लाख ३८ हजार ५५४ रुपयांचे, ग्यानोमामा कलमचे सुमारे एक ते दीड लाख रुपये तर वैशाली भांडी भांडारचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळी लागलेल्या या आगीचे मोठे लोट उसळत होते. नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझविली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद जावेद करीत आहेत.

अंबाजोगाईत उद्या राष्ट्रीय तंत्रज्ञान परिसंवाद
अंबाजोगाई, ३ मार्च/वार्ताहर

महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी (दि.५) राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान परिसंवादाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्राचार्य बी. आय. खडकभावी यांनी दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर व अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री विमल मुंदडा राहणार आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रसायन शास्त्र विभागप्रमुख डॉ. देवानंद शिंदे, नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित राहणार आहेत.या परिसंवादात देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानावर तयार केलेल्या प्रबंधांची स्पर्धा आयोजित केली आहे. शोधप्रबंधाचे वाचनही करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात रोबो स्पर्धा, रोबो युद्ध, सरंचना प्रबंध सादरीकरण, तंत्रचित्र, प्रदर्शन, संगणक खेळ, प्रकल्प स्पर्धा, इन्टरनेट संरचना आणि संगणकीय खेळाचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे.