Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दहशतवाद्यांचा ‘क्रिकेट’वर हल्ला
पाकिस्तानात अतिरेक्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात श्रीलंकेचा संघ बचावला
आठ सुरक्षारक्षक ठार ’ पाच खेळाडू जखमी ’ जयवर्धनेचा संघ माघारी
लाहोर, ३ मार्च/वृत्तसंस्था

 

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर नियोजित क्रिकेट दौरा करण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तानचे आमंत्रण स्वीकारून येथे आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर आज सकाळी सुमारे डझनभर अतिरेक्यांनी भीषण हल्ला चढविला. ‘एके’ रायफली, हँडग्रेनेड्स आणि रॉकेट लाँचर अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हा हल्ला चढविण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यात श्रीलंका संघाचा एकही खेळाडू बळी पडला नसला तरी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकासह सहाजण जखमी झाले. यातील दोघांना गोळ्या लागल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मात्र या हल्ल्यात खेळाडूंचे रक्षण करणाऱ्या सुरक्षारक्षकांसह आठजण प्राणाला मुकले. या कल्पनातीत हल्ल्याने पाकिस्तान तसेच भारतीय उपखंडातील क्रिकेटच्या भवितव्यावरच भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटविले असून आगामी विश्वचषकावर तसेच काही दिवसांवर आलेल्या ‘आयपीएल लीग’वरही अनिश्चिततेचे काळे सावट पडले आहे. विश्वचषकाच्या पाकिस्तानात होणाऱ्या सामन्यांबाबत येत्या ४८ तासांत निर्णय घेण्यात येणार आहे. अतिरेकी आणि त्यांच्याद्वारे होणारा हिंसाचार हा ‘सर्वव्यापी’ होत चालल्याची दु:खद आणि भयावह जाणीव या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
संपूर्ण क्रीडा जगताला आणि विशेषत: क्रिकेटच्या चिमुकल्या दुनियेला हादरवून टाकणाऱ्या आजच्या या हल्ल्याने क्रिकेट विश्वातील आर्थिक आणि अन्य समीकरणे पार मुळापासून बदलून टाकली आहेत. १९७२ साली म्युनिच येथील ऑलिम्पिकच्या दरम्यान झालेल्या इस्रायलच्या खेळाडूंच्या हत्येनंतर क्रीडाजगतावर झालेला हा सगळ्यात भीषण हल्ला मानला जात आहे. मात्र या हल्ल्याचे भीषण परिणाम दीर्घकालीन आणि अधिक व्यापकही असणार आहेत. पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तर अनिश्चित काळाची जणू अघोषित बंदीच या हल्ल्यामुळे लागली. हल्ल्यानंतर श्रीलंकेने हा दौरा अर्धवट थांबविण्याची घोषणा करून या बंदीची सुरुवात केली.
२६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानातील अतिरेक्यांचा हात होता, असा आरोप भारताने सबळ पुराव्यांनिशी केला होता. या हल्ल्यांच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तानमधील आपला नियोजित दौरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने गांगरलेल्या पाकिस्तानने अन्य कोणता देश आपल्याकडे दौरा करेल, याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड या देशांनी पाकिस्तानात खेळण्यास आधीच नकार दिला होता. मात्र ‘अडचणीत’ सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय अर्जुन रणतुंगा याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला आणि हा ‘अनशेडय़ूल्ड’ दौरा ठरला. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस होता. त्यासाठी श्रीलंका संघ खास बसमधून गडाफी स्टेडियमच्या दिशेने निघाला असताना स्टेडियमपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील लिबर्टी चौकात अतिरेक्यांनी या बसला अक्षरश: चारही बाजूंनी घेरले आणि तिच्यावर गोळीबार केला. अतिरेक्यांनी एक रॉकेटही बसच्या दिशेने सोडले होते. परंतु त्याचा नेम चुकला आणि बस थोडक्यात वाचली. सुमारे १२ उच्चप्रशिक्षित अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोरांच्या आक्रमणाला सुरक्षारक्षकांची फळीच बळी पडली. आठ सुरक्षासैनिक त्यात प्राणाला मुकले. तब्बल ३० मिनिटे ही चकमक सुरू होती. अखेर छोटय़ाछोटय़ा गटांत विभागून अतिरेकी पळून गेले.
या हल्ल्यात श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकारा, जादुई फिरकी गोलंदाज अजंता मेंडीस, तसेच तिलन समरवीरा, थरंग परानाविताना, सुंरग लकमल आणि थिलन तुषारा हे खेळाडू तसेच संघाचे साहाय्यक प्रशिक्षक पॉल फार्बेस हे जखमी झाले. सामन्याचे राखीव पंच एहसान रझा हे सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. थरंग परानाविताना याच्या छातीत गोळी घुसली तर समरवीराच्या पायाला गोळीने जखम झाली.
हल्ल्यानंतर श्रीलंका संघाला वाहनाने कुठे हलविण्याचा धोका पोलिसांनी स्वीकारला नाही. पाकिस्तानी हवाईदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना मैदानातून थेट विमानतळावर हलविण्यात आले. तेथूनच हा संघ लगोलग मायदेशी परतला.
दरम्यान, श्रीलंका संघावर आज असा काही हल्ला होण्याची शक्यता असल्याचा सुगावा पाकिस्तानी सुरक्षारक्षकांना कालच लागला होता. त्यामुळे या संघाचा स्टेडियमवर जाण्याचा नेहमीचा मार्ग आज बदलण्यात आला होता. परंतु ही माहितीही अतिरेक्यांना मिळाली होती, हे हल्ल्याने व त्याच्या योजनाबद्धतेने सिद्ध केले. तसेच सुरक्षा यंत्रणांतील फितुरीही उघड झाली.

मुंबई हल्ल्याशी साधम्र्य
हा हल्ला मुंबईवरील हल्ल्याशी हुबेहूब साधम्र्य सांगणारा असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानात सर्वच थरातून व्यक्त होत आहे. लाहोरचे पोलीस प्रमुख, पंजाबचे गव्हर्नर यांच्यासारख्या उच्चपदस्थांनी हे साधम्र्य निदर्शनास आणले. हा हल्ला निश्चित कोणी घडवून आणला याबद्दलही अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. मुंबईवरील हल्ल्यासाठी एकूण ३५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यापैकी १० जण मुंबईला आले तर उर्वरित २५ जण पाकिस्तानातच थांबले होते. त्यांच्यापैकीच काहीजणांनी आजचा हल्ला घडवून आणल्याचीही शक्यता काहीजण वर्तवित आहेत.

भारताचा हात!
हा हल्ला करणारे अतिरेकी भारतातून आले असल्याचा आरोप पाकिस्तानचे जहाज वाहतूक राज्यमंत्री सरदार नबील अहमद यांनी केला आहे. मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूड उगविण्यासाठी भारताने हा हल्ला घडवून आणल्याचा जावईशोधही या मंत्र्याने लावला आहे.