Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेना- राष्ट्रवादी युती झाल्यास भाजप मनसेबरोबर !
समर खडस
मुंबई, ३ मार्च

 

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती झाल्यास आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी लागेल. शरद पवारांसाठी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिल्यास कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे राहील. मात्र मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर स्वार होऊन राज ठाकरे पुढे जातील, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, राजकारणात गप्प बसण्याला खूप महत्त्व आहे. काल परवापर्यंत जे तद्दन बोरूबहाद्दर होते ते आज स्वत:ला एका पक्षाचे सर्वेसर्वा मानू लागले आहेत. शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आणण्यामध्ये बाळासाहेबांच्याच भाषेत सांगायचे तर एका बोरूबहाद्दराचाच हात आहे. उद्धव ठाकरे यांनाही हे माहित आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा या बोरूबहाद्दराचे काय करायचे ते पाहता येईल, असे हा नेता म्हणाला. शिवसेना कधीही हिंदुत्वाचा विचार सोडील असे आम्हाला वाटत नाही. हिंदुत्वाचा विचार सोडला नाही तर शरद पवार त्यांना आपले म्हणणार नाहीत. त्यामुळे शिवसेना व भाजप ही विचारांच्या आधारावरील युती तुटणे शक्य होणार नाही. मात्र शरद पवारांच्या भूलथापांना बळी पडून जर शिवसेनेने काही चुकीचा निर्णय घेतलाच तर आम्हीही आमचे खेळ करण्यास समर्थ आहोत. अशा वेळी राज ठाकरे हा आमच्यापुढील सर्वाधिक चांगला पर्याय आहे. राज ठाकरे यांच्याकडे व्यक्तिमत्व आहे, वक्तृत्व आहे, तसेच मराठीच्या मुद्दय़ावर त्यांच्याकडे तरुण मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होतो आहे. राज यांच्या मराठीच्या मुद्दय़ाला आमच्या हिंदुत्वाची साथ लाभली तर बाळासाहेबांप्रमाणेच महाराष्ट्रातील तरुण या भविष्यातील युतीकडे येऊ शकतो, असेही हा नेता म्हणाला.
सध्या भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोदी यांच्या सभांचा धडाका लावला आहे. तसेच निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकींमध्येही भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्येच जोर लावावा, अशी मागणी करण्यात येते आहे. युती झाली तर चांगलेच, हिंदुत्वासाठी शिवसेनेतील या बोरूबहाद्दराचे कटू बोल आम्ही पचवले आहेतच. पुढेही काही छोटे-मोठे त्याग करता येतील. पण युती झाली नाहीच तर मात्र ४८ मतदारसंघातील पक्ष संघटना कार्यान्वित करता येण्यासाठी भाजपद्वारे जोराने पावले उचलली जात आहेत. आज दादर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची व गोपीनाथ मुंडे यांची एक बैठकही झाली. या बैठकीत ४८ लोकसभा मतदारसंघातील संघटन तयार ठेवावे या दृष्टीनेच निवडणुकीकडे पाहण्यात यावे, अशी चर्चा झाल्याचे समजते.