Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘मनाचं भव्य, दिव्य रूप म्हणजे रससिद्धान्त..’
मुंबई, ३ मार्च / विशेष प्रतिनिधी

 

‘रागसंगीतातला एखादा राग मला भावतो, आनंददायी वाटतो, तर दुसरा राग माझ्यात उदासी निर्माण करतो.. लक्षात आलं की हे सारे मनाचे व्यापार आहेत, तेव्हा मी मनाचा शोध घ्यायला लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनाचं भव्य, दिव्य रूप म्हणजे रससिद्धांत..’ गानसरस्वती किशोरी आमोणकर सांगत होत्या. निमित्त होतं, त्यांनी लिहिलेल्या ‘स्वरार्थरमणी’ या ग्रंथाची पहिली प्रत त्यांनाच अर्पण करण्याचं. राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी या ग्रंथाची प्रत आज सकाळी किशोरीताईंच्या निवासस्थानी एका हृद्य आणि अनौपचारिक कार्यक्रमात त्यांना भेट दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, दाजी पणशीकर हेही या वेळी उपस्थित होते.
साहित्य आणि नाटक या कलाप्रकारांमध्ये रसनिमिर्तीच्या प्रक्रियेचे विवेचन करणारा रससिद्धांत, संगीताच्या संदर्भात तपासून त्यांची पुनर्माडणी करणारा हा पहिलाच ग्रंथ आहे. गेली सुमारे पन्नासहून अधिक वर्षे भारतीय संगीताच्या विश्वात आपल्या अलौकिक गायकीने श्रेष्ठत्वाला पोहोचलेल्या श्रीमती किशोरीताईंनी लिहिलेला हा ग्रंथ अभिजात राग संगीताच्या बाबतीत नवे विचार मांडणारा ठरणार आहे. एखाद्या सिद्धहस्त कलावंताने आपल्या कलेच्या संदर्भात केलेल्या वैचारिक लेखनाचा असा हा बहुधा पहिलाच ग्रंथ आहे.
प्रभादेवीतील किशोरीताईंच्या फारशी झकपक सजावटच नसलेला पण सौंदर्यपूर्ण सजवलेल्या घरात आज नेहमीसारखंच उत्साही वातावरण होतं. एका भिंतीवर असलेला मोगुबाईंचा म्हणजे माईंचा भव्य फोटो येणाऱ्या प्रत्येकाला जणू आशीर्वादच देत होता. घरगुती स्वरूपाच्या या कार्यक्रमात किशोरीताईंनी सगळ्यांशी खूप गप्पा मारल्या. ग्रंथ निमिर्तीमागील आपली भूमिकाही त्यांनी या गप्पात उलगडून दाखवली. त्यांच्या मातोश्री म्हणजे मोगुबाई यांच्याबद्दलचा त्यांचा नितांत आदर आणि प्रेम त्यांच्या सगळया बोलण्यातून ठायी ठायी प्रतीत होत होतं. ‘माईचा आवाज कंप पावायला सुरूवात होत होती, तेव्हा त्यांच्या एका मैफलीत मी तिला मागे बसून साथ केली. माझं गाणं तिच्याहून वेगळं असलं तरी त्या दिवशी माईच्या आवाजातील बदल कुणालाही जाणवू न देण्याची काळजी मी घेतली होती..’ ताईंचे डोळे आता पाणावले होते. रागसंगीतात रसनिर्मिती होते म्हणजे नेमके काय होते, त्यामागे कोणती मानसिक आणि बौद्धिक प्रक्रिया घडते, याचा अभ्यास गेली पन्नास वर्षे किशोरीताई करीत आहेत. संगीतावरील अनेक ग्रंथांचे वाचन आणि अभ्यास करत असताना साहित्यातील रससिद्धांताकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्यातून हा नवा विचार जन्माला आला. ‘हे लेखन करताना मी स्वत:ला त्यातून पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. राग संगीतातील अनेक अवघड प्रश्न मला गेली अनेक वर्षे सतावत होते. मी स्वत: संगीत निर्माण करत असताना त्या मागील प्रक्रियेचा सातत्याने मागोवा घेत होते. संगीतातील राग सादर करत असताना कलावंताने रागमय होणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. सैद्धान्तिक विवेचन करताना त्यातील प्रत्येक बारकाव्यांचा मला माझ्या संगीतात कुठे कुठे पुरावा मिळतो आहे, याची तपासणी मी नेहमी करत आले आहे. त्यामुळेच या प्रश्नांचा मागोवा घेताना मिळालेल्या ज्ञानाची मांडणी या ग्रंथात करण्याचा मी प्रत्यत्न केला आहे’, असे किशोरीताई या वेळी म्हणाल्या.
या पुस्तकाच्या निर्मितीत नंदिनी बेडेकर आणि दाजी पणशीकर यांचा फार मोठा वाटा असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. राजहंस प्रकाशनला किशोरीताईंसारख्या ज्येष्ठ कलावतीचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल श्री. माजगावकर यांनी या वेळी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘हा ग्रंथ तयार करताना ताईंना पुस्तकाचे मुखपृष्ठ न दाखवण्याचा हट्ट मी धरला होता. ताईंचा एकूण दबदबा (ताईंनी मध्येच अडवत हसत ‘दबदबा नाही दरारा’ अशी कॉमेन्टही केली!) असा की त्या माझं काही ऐकतील की नाही, असं वाटत होतं. पण आज मुखपृष्ठ त्यांना आवडल्याचे दिसले आणि मीही सुस्कारा सोडला.’
या पुस्तकाच्या प्रकाशनाचा औपचारिक सोहळा ६ एप्रिल रोजी मुंबईत व ९ एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे.