Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

प्रादेशिक

काँग्रेस-राष्ट्रवादी मनोमिलन व्हाया शुगर इन्स्टिटय़ूट!
मुंबई, ३ मार्च / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला ‘इशारों पे इशारे’ देत काँग्रेसला लक्ष्य केले असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काल भेट घेतल्यानंतर पाठोपाठ आज पवारांनी खास पुण्यात जाऊन काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्याशी शेतीविषयक प्रश्नांबाबत चर्चा केली. यातून पवारांनी आपण काँग्रेसबरोबरच असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून काँग्रेस नेतृत्वाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे !

नवी मुंबईत वायुगळती : ३५ अत्यवस्थ
नवी मुंबई, ३ मार्च/प्रतिनिधी

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील पावणे, एमआयडीसीतील शीतल कोल्ड स्टोअरेज या कंपनीतील प्लान्टमधील अमोनिया वायूची गळती झाल्यामुळे या परिसरातील नागरी वस्तीत एकच खळबळ उडाली. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या भागात अमोनिया वायूचा प्रादुर्भाव जाणवण्यास सुरुवात झाली. या वायुगळतीमुळे अत्यवस्थ झालेल्या पावणे परिसरातील सुमारे ३५ ग्रामस्थांना नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘सेन्सेक्स’ची तीन वर्षांपूर्वीच्या स्तरावर घसरण
रुपया प्रति डॉलर ५२ च्या पल्याड
मुंबई, ३ मार्च/ व्यापार प्रतिनिधी
आशियाई बाजारांमधील कमजोरीचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी समभागांची जोरदार विक्री सुरू राहिली आणि बाजाराचा निर्देशांक अर्थात ‘सेन्सेक्स’ १८० अंशांनी घसरून बाजार बंद होताना ८,४२७.२९ वर स्थिरावला. समभागांच्या विक्रीत विदेशी वित्तसंस्थाच आघाडीवर असल्याचे आज दिसले आणि या विदेशी भांडवलाच्या देशाबाहेर मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या पलायनाचा सर्वाधिक भारतीय चलन अर्थात रुपयाला बसताना दिसत आहे. चलन बाजारात आज झालेल्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत आणखी चार पैशांनी घसरण होऊन तिने प्रति डॉलर ५२ रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

महापौर शुभा राऊळ लोकसभेसाठी इच्छुक?
मुंबई, ३ मार्च/ प्रतिनिधी

निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यापासून अनेक इच्छुकांच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या असून लोकसभेसाठी मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या नावाची दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी चर्चा सुरु झाली आहे. दहिसरमधील एका विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या डॉ. शुभा राऊळ यांना पहिल्याच फटक्यात मुंबईचे महापौरपद मिळाले. महापौर म्हणून त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी ती वादग्रस्त नसल्याने शिवसेनेच्या गोटात त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीत.

अंधेरीतील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाची उकल
नोकरासह तिघांना उत्तर प्रदेशातून अटक
मुंबई, ३ मार्च / प्रतिनिधी
अंधेरी पूर्व येथील कुंदनानी या वृद्ध दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी अंधेरी पोलिसांनी घरातील नोकरासह दोन पहारेकऱ्यांना आज अटक करून या गुन्ह्य़ाची उकल केली. तिघाही आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील फतेहपूरमधून अटक केली. होळीला गावी जाता यावे यासाठी पैसे हवे असल्याने कुंदनानी दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

शिवसेना अनुसरणार बसपचा ‘एक हजारी पॅटर्न’!
बंधुराज लोणे
मुंबई, ३ मार्च

शिवसेना आणि बहुजन समाज पक्ष विचारसरणीच्या पातळीवर दोन टोकावर उभे असले तरी शिवसनेने मात्र बसपचे एका बाबतीत अनुकरण केले आहे. मतदारसंघ बांधणीसाठी शिवसेना आगामी निवडणुकांत बसपचा पॅटर्न वापरणार असून यानुसार शिवसेनेने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक नेमले आहेत. त्यातील अनेक निरीक्षक हे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक असून या निरीक्षकांकडे प्रत्येकी एक हजार मतदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कर्णिक पती-पत्नी आरोपमुक्त
मुंबई, ३ मार्च/प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शशिकांत कर्णिक आणि त्यांच्या पत्नी श्रीमती शर्मिला कर्णिक यांच्या यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून फक्त सहा टक्के अधिक संपत्ती असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये खटला चालविण्यास पुरेसा आधार नाही, असा अहवाल स्वत: तपास अधिकाऱ्यानेच सादर केल्यानंतर भ्रष्टाचाराचे खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयाने या दम्पतीला संदर्भित खटल्यातून आरोपमुक्त केले आहे.

ठाण्यातील प्रभाग अधिकारी पदांच्या निवड प्रक्रियेस स्थगिती
मुंबई, ३ मार्च/प्रतिनिधी

प्रभाग अधिकाऱ्यांची सहा आणि उपकरनिर्धारक व संकलकाची तीन पदे भरण्यासाठी ठाणे महापालिकेने गेल्या वर्षी मार्चपासून सुरु केलेल्या निवड प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. या पदांसाठी २३ मार्च २००८ रोजी दिलेली जाहिरात व २८ डिसेंबर २००८ रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षा या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या निवड प्रक्रियेसंबंधीचे सर्व रेकॉर्ड न्यायालयाने मागविले असून पुढील निर्णय होईपर्यंत निवड पक्रियेस स्थगिती दिली आहे.

‘स्वरार्थरमणी’ ग्रंथातून उलगडणार किशोरीताईंची गानतपश्चर्या
मुंबई, ३ मार्च / प्रतिनिधी

‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ म्हणजे आजवर मी जे गायले आहे, त्या गाण्यावरचे माझे स्वत:चे चिंतन आहे. अनेक वर्षांच्या अभ्यासातून हा ग्रंथ सिद्ध झाला असल्याचे प्रतिपादन गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी आज दादर येथे केले. ‘नाटय़संपदा प्रतिष्ठान’ने शिवाजी मंदिर येथील शिवनेरी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. किशोरीताईंच्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या ६ मार्च रोजी ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते होणार आहे. त्या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अभिनेते प्रभाकर पणशीकर, लेखक दाजी पणशीकर या वेळी उपस्थित होते.

रिलायन्सला ‘इमा’ पुरस्कार
मुंबई, ३ मार्च / प्रतिनिधी

रिलायन्स एनर्जीच्या वीज वितरण विभागाला यंदाचा शहरी विभागाच्या सवरेत्कृष्ट वीज वितरणाचा पुरस्कार ‘इमा’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री जयराम रमेश यांच्या हस्ते अलीकडेच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (इमा) ही संस्था वीज वितरण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान करते. यंदा संपूर्ण देशातून २० हून अधिक वीज वितरण कंपन्यांनी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी आवेदनपत्रे सादर केली होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील चार वितरण कंपन्या, महाराष्ट्रातील बेस्ट, टाटा पॉवर आणि दिल्लीतील एनडीपीएल, प. बंगाल वीज मंडळ आदी कंपन्यांनी आवेदनपत्रे सादर केली होती. आवेदनपत्रात नमूद करण्यात आलेली माहिती आणि अन्य पूरक माहिती, सादरीकरण आणि त्यावरील तज्ज्ञ, विश्लेषण समिती व ज्युरी पॅनेल यांनी विचारलेल्या प्रश्नोत्तरांच्या आधारे रिलायन्स एनर्जी या कंपनीची सदर प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पारेषण, वितरण, ग्राहक सेवा, वीजचोरी नियंत्रणासाठीच्या उपाययोजना आदी मुद्दय़ांचा प्रामुख्याने पुरस्कार जाहीर करताना विचार करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी-तहसीलदारांच्या बदल्यांना स्थगिती
ठाणे,३ मार्च/प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने काल महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. राजकीय सोयीनुसार झालेल्या बदल्यांविरोधात तक्रारी प्राप्त होताच निवडणूक आयोगाने आज बदल्यांना स्थगिती दिली. यामुळे नेते आणि काही अधिकाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळाले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोणताही अधिकारी एका जिल्ह्यात सलग चार वर्षे अथवा एका पदावर तीन वर्षे आणि स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत असेल, त्या अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली केली जाते. ही परंपरा माहीत असल्यामुळे महसूल आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. महसूल विभागातील तहसीलदार, प्रांत अधिकारी,उपजिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांपासून उपनिरीक्षकांपर्यंतच्या सुमारे १४० अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. या संधीचा फायदा घेऊन राजकीय सोयीसाठी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. प्रत्यक्ष निवडणूक कामात असलेले अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचाही त्यात समावेश होता. या अंदाधुंद बदल्यांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर आयोगाने सर्व बदल्यांना स्थगिती दिली. स्थगितीचे आदेश ऐकताच नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी आलेले अधिकारी हिरमुसले. कोकण विभागातील २५ तहसीलदारांच्या बदल्या झालेल्या आहेत. महसूल विभागातील बदल्यांप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणत्याही क्षणी होण्याची दाट शक्यता आहे.

‘महावितरण’चे मुख्य अभियंता निलंबित
ठाणे, ३ मार्च/प्रतिनिधी

महावितरणसाठी होणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या खरेदी व्यवहारात अनियमितता केल्याचा ठपका ठेवून महावितरणचे भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता अशोक गुजर यांना आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार गुजर यांच्या कारभाराबाबत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यात महावितरणसाठी करण्यात आलेल्या खरेदी व्यवहारात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप होता. त्याची गंभीर दखल घेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी आज गुजर यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत. जून २००९ मध्ये भांडूप परिमंडळ मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुजर यांनी महावितरणमधील बेबंद कारभाराला लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली होती. त्यामुळे दुखावलेल्या काही मंडळींनी हे निलंबन घडवून आणले अशी चर्चा महावितरणमध्ये सुरू आहे. तर गुजर यांनी प्रचंड मालमत्ता जमविली असून एसीबीमार्फत त्याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.