Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

मंदीने झाला होळीचा ‘रंग’ फिका!
प्राजक्ता कदम

रंगपंचमीला आठवडा उरलेला असताना मशिद बंदर येथील घाऊक बाजार म्हणून प्रसिद्ध असलेला भातबाजार विविध रंगानी अक्षरश: रंगून जातो. यंदा मात्र भातबाजारातील हा ‘रंग’ मंदीमुळे काहीसा फिका पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात रंग विक्रेत्यांची वर्दळ आहे. परंतु रंग विकत घेण्यासाठी दुकानांसमोर गर्दी करणाऱ्यांची वानवा असल्याने रंगविक्रेत्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. आर्थिक मंदीमुळे ग्राहकांनी रंग खरेदीकडे सध्या पाठ फिरवली असली तरी रंगपंचमीच्या मुहुर्तावर लोकांची गर्दी नक्की उसळेल असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दादरकर करोडपती
सुनील डिंगणकर

रक्तदाब कधी वाढतो? टेन्शनमुळे, खूप राग आला तर, अतिशय धावपळ किंवा दगदग झाल्यास रक्तदाब वाढू शकतो. अलीकडेच एका संध्याकाळी दादरला राहणाऱ्या रोवेलन डिसिल्व्हा यांनी घरी येताच रक्तदाब तपासला. त्यांच्या अंदाजाप्रमाणे तो वाढलेलाच होता. यावेळी कारण थोडे वेगळे होते. त्यांना दोन कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.

एसएनडीटीचे नाटय़गृह ४० वर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
प्रसाद मोकाशी

मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या जुहू येथील जागेवर असलेले भव्य नाटय़गृह सुमारे ४० वर्षे आपल्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून विद्यापीठाच्या प्रशासकांकडे केवळ भव्य योजना कागदावर तयार आहेत. या नाटय़गृहाच्या काही भागाचा वापर होत असला आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार येथे दोन वर्षांंपूर्वी मोठा युवक महोत्सव भरवला असला तरी प्रत्यक्षात या नाटय़गृहामध्ये केवळ वावर आहे तो कबुतरे, भटकी कुत्री आणि कधीतरी येथे चोरून शिरणाऱ्या गर्दुल्यांचाच!

एप्रिल फूल बनाया
प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्य़ात मराठी हौशी नाटय़ चळवळ मोठय़ा प्रमाणात राबविली जात आहे. जिल्ह्य़ात सुमारे १,००० ते १,२०० हौशी नाटय़ कलावंत आहेत. दरवर्षी या जिल्ह्य़ात विविधि सांस्कृतिक संस्थांतर्फे तीन ते चार एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात.

आगामी निवडणुकांवर कोळी समाजाचा बहिष्कार!
प्रतिनिधी

गेली अनेक वर्षे कोळी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून अखेर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदा होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सोमवारी शिवतीर्थावर झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार सुरूच ठेवण्याचा निर्णयही कोळी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला.

स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालय व कोश प्रमुखांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे शिबीर
प्रतिनिधी

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने २८-२९ मार्च, २००९ रोजी ‘स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालय व कोश प्रमुखांसाठी प्रशिक्षण शिबिर’ योजण्यात आले आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सामाजिक-स्वयंसेवी संस्था किंवा संघटनांचे कार्यालयप्रमुख व कोशप्रमुख अथवा खजिनदार, तसेच धर्मादाय आयुक्तांशी संबंधित कामे पाहणारे कार्यकर्ते या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकतील. हे निवासी शिबिर म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तन, भाईंदर येथील ज्ञान-नैपुण्य केंद्रात होणार आहे.

नॅशनल बुक ट्रस्टच्या चार पुस्तकांचे आज प्रकाशन आणि चर्चासत्र
प्रतिनिधी

नॅशनल बुक ट्रस्ट आणि मुंबई विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल बुक ट्रस्टच्या सुवर्णजयंती मालिकेअंतर्गत आज चार पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता, परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा, भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनात होणार आहे. दृश्यांतर : स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता हा चंद्रकान्त पाटील संपादित ग्रंथ आणि परिदृश्य : स्वातंत्र्योत्तर मराठी कथा या निशिकांत ठकार संपादित पुस्तकांचे प्रकाशन सकाळी १० वाजता उद्घाटन डॉ. चंद्रशेखर जहागिरदार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले भूषविणार आहेत. त्यानंतर ११ वाजता ‘स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता’ या विषयावरील परिसंवादात प्रा. नितीन रिंढे, डॉ. रमेश वरखेडे आणि प्रा. वसंत आबाजी डहाके सहभागी होतील. दुपारी २ वाजता होणाऱ्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कथा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. विलास खोले, प्रा. उदय रोटे आणि डॉ. सुधा जोशी सहभागी होतील. दु. ४.३० वाजता भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे या पुस्तकांचे प्रकाशन हाईल. त्यानंतर ‘भगतसिंग आणि २१व्या शतकातील भारत’ या विषयावरील परिसंवादात कॉ. गोविंद पानसरे, डॉ. आनंत तेलतुंबडे व कॉ. दत्ता देसाई सहभागी होतील.

‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ पुस्तक प्रकाशित
प्रतिनिधी

अमेरिकास्थित अभियंते सुधीर शं. कुलकर्णी लिहिलेल्या ‘जगप्रसिद्ध पुलांच्या कहाण्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी प्रभादेवी येथे ‘रचना संसद’च्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. ग्रंथायन प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक जयंत नाशिककर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पूल बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्रीखंड कन्सल्टन्सी या संस्थेचे कार्यकारी संचालक राजीव श्रीखंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे, वसंत नरहर फेणे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पूल आणि त्यांचे बांधकाम अशा वेगळ्या विषयावर मराठीमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले असल्याचे श्रीखंडे यांनी सांगितले तर अभियांत्रिकी क्षेत्रातील मंडळींनी आणि विद्यार्थ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. त्यांच्यासाठी ते उपयुक्त असल्याचे मत, नाशिककर यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.
पुस्तकाचे लेखक सुधीर कुलकर्णी यांनी आपल्या या पुस्तकाविषयी उपस्थिताना पडद्यावर सचित्र माहिती दिली. सुभाष भेंडे यांचेही या वेळी भाषण झाले. ग्रंथायन प्रकाशनचे पंकज कुरुलकर यांनी ‘ग्रंथायन’च्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. ज्योती आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर लाभेश गवळी यांनी आभार मानले.

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त औद्योगिक विभागात विविध उपक्रम
प्रतिनिधी

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या वतीने चार ते ११ मार्च दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ठाणे, तसेच नवी मुंबई परिसरातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार, ४ मार्च रोजी ठाण्यातील पोखरण रोड येथील व्होल्टास कंपनीत सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत कामगारांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत रक्तदान शिबीर होईल. या दोन कार्यक्रमांनी सुरक्षा सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन होईल. यावेळी एका आरोग्यविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी तुर्भे येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कारखान्यात दुपारी २ ते ५ या वेळेत निरंतन प्रशिक्षण योजनेचे उद्घाटन होईल. शुक्रवार, ६ मार्च रोजी तुर्भे एमआयडीसीतील फायझर कंपनीत ‘अमोनियाचे धोके व त्याचा सुरक्षित वापर’ या विषयावर दुपारी २ ते ५ या वेळेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, ७ मार्च रोजी तुर्भे येथील हर्डिलिया केमिकल या कारखान्याच्या आवारात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत ‘कारखान्यातील आग व प्रतिबंध’ या विषयावर सलग चर्चासत्र होईल. सोमवार, ९ मार्च रोजी कळवा येथील हिंडाल्को कारखान्यात सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर, तसेच एचआयव्ही जनजागृती शिबीर घेतले जाणार आहे. गुरुवार, १२ मार्च रोजी वागळे इस्टेट, ठाणे येथील ठाणे मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या सभागृहात दुपारी ३ ते ५.३० या वेळेत सुरक्षा सप्ताहाची सांगता आणि पारितोषिक वितरण समारंभ होईल. कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संबंधित संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क- डी.के. बहाणे (९८६९०५३८५१) आणि राहुल कुलकर्णी (९८२०३२४२९७).