Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

राहुल गांधींच्या राळेगण भेटीचा ‘मिसकॉल’
मोहनीराज लहाडे
नगर, ३ मार्च

काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी आज राळेगणसिद्धी (ता. पारनेर) या आदर्श गावास भेट देणार असल्याच्या अपेक्षेने त्यांना भेटण्यासाठी जमलेले युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या भेटीचा ‘मिस कॉल’ अनुभवास आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मात्र खासदार गांधी येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती. जिल्हा प्रशासनास मात्र या भेटीचा ‘मेसेज’ दुपारीच मिळाला होता.

युतीच्या निर्णयानंतरच नगरचा भाजपचा उमेदवार ठरणार
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

पदाधिकारी व जिल्हा संघटना आगरकरांबरोबर तर कार्यकर्ते, काही नवे, काही ज्येष्ठ गांधींबरोबर.. यातून भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी मार्ग काढला असून, शिवसेना-राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीचा संभ्रम मिटताच अन्य उमेदवारांबरोबरच नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

भाजप जिल्हाध्यक्षांची गांधी गटावर कुरघोडी
सोनवणे यांना डच्चू देत गटनेतेपदी राजेंद्र गुंड

नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते बाळासाहेब सोनवणे यांना डच्चू देत त्यांच्या जागी राजेंद्र गुंड यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी केली. जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांना ढाकणे यांनी गटनेतापदावर गुंड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले.

नवीन सत्ताकेंद्राची अकोलेकरांना आशा
‘शिर्डी’त समावेश
अकोले, ३ मार्च/वार्ताहर
लोकसभेसाठी नाशिकमधून शिर्डीत झालेला समावेश, मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे अकोल्याच्या एखाद्या भूमिपुत्राला खासदारकीची ‘लॉटरी’ लागण्याची निर्माण झालेली शक्यता, त्यातून तालुक्यात उदयास येऊ शकणारे नवीन सत्ताकेंद्र यामुळे लोकसभा निवडणुकीबद्दल अकोले तालुक्यात प्रथमच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अकोल्याच्या राजकारणात बदल घडविणारे काही या निवडणुकीत खरोखरच घडणार काय, याकडे तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कुकडीचे उद्या आवर्तन सोडणार
आश्वासनानंतर उपोषंण मागे
निघोज, ३ मार्च/वार्ताहर
कुकडीचे उन्हाळी आवर्तन दि. ५पर्यंत सोडण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या प्रश्नी सुरू केलेले उपोषण मागे घेतले. निघोज, जवळे, वडनेर बुद्रुक, गुणोरे, गाडीलगाव, राळेगण थेरपाळ, कोहोकडी व कुरुंद येथील शेतकऱ्यांनी कुकडीचे उन्हाळी आवर्तन लवकर सोडावे, तसेच मागील रब्बीचे अपूर्ण आवर्तन पुन्हा द्यावे, या मागणीसाठी येथील कुकडी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.

हजारे, श्रीश्री, रामदेवबाबा, आसारामबापूंची जागृती मोहीम
नकारार्थी मत, ‘राईट टू रिकॉल’
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी
निवडणुकीतील नकारार्थी मतदान आणि लोकप्रतिनिधींना परत बोलवण्याचा कायदा करावा, याकरिता सरकारवर दडपण आणण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे श्रीश्री रविशंकर, पतंजली योगपीठाचे स्वामी रामदेवबाबा व संत आसारामबापू आणि वारकरी मंडळ यांच्या समवेत जनजागृती मोहीम राबविणार आहेत.

निवडणुकीच्या बंदोबस्ताचे नियोजन सुरू
आचारसंहितेमुळे बदल्यांबाबत संभ्रम
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी बंदोबस्ताचे नियोजन पोलीस अधीक्षक कार्यालयाने सुरू केले आहे. स्वत पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे पोलीस ठाण्यांना भेटी देऊन माहिती घेत आहेत.
डोंगरे यांनी आज श्रीगोंदे व पारनेर ठाण्यास भेट दिली. ही नेहमीची तपासणी भेट असली, तरी निवडणुकीसंदर्भातही माहिती घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक आज पुण्यात झाली. नगरचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बिबटय़ा पिंजऱ्यात अडकला
कोपरगाव, ३ मार्च/वार्ताहर

तालुक्यात टाकळी शिवारात तांबोळी वस्तीनजीक राहुल देवकर यांच्या मक्याच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबटय़ा अडकला. त्यास संगमनेरजवळील निंबाळा नर्सरीत तात्पुरते संरक्षणार्थ ठेवण्यात आले आहे. मागील आठवडय़ापासून या बिबटय़ाच्या मादीने टाकळी परिसरात धुमाकूळ घालून अनेक शेळ्या, कुत्रे, डुकरे, कोंबडय़ा फस्त केल्या. राजस्थानीच्या भ्रमंती करणाऱ्या एका गाईवर झेप घेऊन जागीच ठार केले. आठवडय़ापूर्वी मक्याच्या शेतात दत्तात्रेय देवकर यांनी बिबटय़ास पाहिले व गावकऱ्यांना कल्पना दिली. त्यानंतर राहुल देवकर, बाळासाहेब देवकर, राजेंद्र देवकर आदींनी वन खात्यास व पोलिसांना याबाबत कळवले. वनपाल जी. एन. लोंढे, पी. एस. जगताप यांनी वन कर्मचारी पी. डी. दवंगे, आर. एन. दराडे यांच्या मदतीने देवकर यांच्या मक्याच्या शेतालगत पिंजरा लावला. काल रात्री या भागात वीजकपात असल्याने बिबटय़ाची मादी मक्याच्या शेतातून बाहेर पडली व अलगदपणे पिंजऱ्यात अडकली. परिसरात बिबटय़ाचा संचार असल्याने नागरिक, शेतकरी टेंभे लावून रात्र जागून काढत. काही वेळा फटाके वाजवले जात. पकडलेल्या मादीस पिंजऱ्यासह संगमनेरच्या निंबाळा नर्सरीत नेण्यात आले. नागपूर येथील वनरक्षकांच्या आदेशानंतर त्या मादीस कोठे सोडायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे वन खात्याकडून सांगण्यात आले. बिबटय़ाला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे देवकर यांच्या मक्याचे व गव्हाचे पीक तुडवले गेल्याने मोठे नुकसान झाले.

‘जीवन घडवणारी देवालये दुर्मिळ आहेत..’
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी
मूळचे जामखेडचे व सध्या पुण्याच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेत पर्यवेक्षक असलेले डॉ. अ. ल. देशमुख यांनी त्यांना मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्कारातील एक हजार रुपये नगरच्या ‘स्नेहालय’ला देऊ केले आहेत. डॉ. देशमुख व त्यांच्या मित्रांनी अलीकडेच नगरला येऊन ‘स्नेहालय’चे कार्य पाहिले. नंतर त्यांनी ही मदत पाठवली. सोबत लिहिलेल्या पत्रात डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे - ‘काम करणारे खूप आहेत, अन्यायाविरुद्ध झगडणारे थोडे आहेत. संघटनांना ऊत आलाय, आपुलकीने काम करणाऱ्या अल्प आहेत. अधिकार गाजवणारे असंख्य आहेत, अधिकार मिळवून देणारे मोजकेच आहेत. मुलांना शिकविण्यासाठी शाळा अगणित आहेत, वेश्यांच्या मुलांचे जीवन घडवणारी देवालये दुर्मिळ आहेत. ‘स्नेहालय’ यासाठीच आहे..’
राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी मला विचारलं, ‘आता पुढं काय?’ मी त्यांना नम्रपणे सांगितलं, ‘उरलेल्या आयुष्यात पुरस्काराचं पावित्र्य राखणे आणि पुरस्काराची उंची वाढवणे हे काम करायचे आहे’, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोकणचा राजा नगरमध्ये!
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूसचे नगरमध्ये आज आगमन झाले. गेल्या वर्षीपेक्षा तीन आठवडे त्यास विलंब झाला. भाव सध्या तेजीत आहेत.दर वर्षी फेब्रुवारीतच कोकणातून हापूस आंब्याची आवक होते. त्यामुळे ग्राहकांनाही त्याची प्रतीक्षा होती. आज गेल्या वर्षीपेक्षा तीन आठवडय़ांच्या विलंबाने हापूस नगरमध्ये दाखल झाला. कोकणातून हापूस, पायरी व कर्नाटकातून म्हैसूर, पायरी, लालबागची टेम्पो भरून आवक झाली. कर्नाटकात पिकणाऱ्या लालबाग व म्हैसूर पायरीचेही लवकरच आगमन झाले. या आंब्याचा भाव सर्वसामान्यांना परवडणारा आहे. खरेदीसाठी आज पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. हापूसचा भाव तेजीतच आहे. चार डझनांचा भाव १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये आहे. पायरीचा अडीच डझनाचा भाव ३०० ते ४५० रुपये, लालबाग १५० ते २२५ व म्हैसूर २२५ ते ३५० रुपये आहे, असे विक्रेते पप्पूशेट आहुजा यांनी सांगितले.आंब्याचा हंगाम जवळपास सहा महिने चालतो. या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. आंबाविक्रीतून आर्थिक उलाढालही मोठय़ा प्रमाणात होते, असे अज्जूशेट आहुजा यांनी सांगितले.

राजकीय पक्षांचे फलक काढण्यास सुरुवात
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून मनपाच्या वतीने आज शहरातील राजकीय पक्षांचे फलक काढून घेण्यास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मनपा प्रशासनाला सोमवारी रात्री याबाबत आदेश देण्यात आले. आज सकाळपासूनच मनपाचा अतिक्रमणविरोधी विभाग कामाला लागला. या विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी कायनेटिक चौकातून कारवाईस सुरुवात केली. एका ज्येष्ठ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त लावलेले भले मोठे फलक काढण्यास सुरुवात होताच या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी स्वत होऊनच सर्व फलक काढले. शुभेच्छा फलक, तसेच राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनर्स व पोस्टर व अन्य साहित्य या मोहिमेत काढण्यात आले. कायनेटिक चौक ते सक्कर चौकदरम्यानच्या रस्त्यावर ही कारवाई झाली. शहराच्या अन्य भागातही अशीच कारवाई करण्यात येणार असून, तत्पूर्वीच संबंधितांनी फलक स्वत काढून घ्यावेत, असे आवाहन मनपाने केले आहे.

वायकर टोळीतील दोघांना अटक
श्रीरामपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

दोन महिन्यांपूर्वी बेलापूर येथील शिक्षक वसाहतीमध्ये झालेल्या घरफोडीतील वायकर टोळीतील दोघा आरोपींना मुद्देमालासह औरंगाबाद पोलिसांनी पकडले. त्यांना श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात देऊन आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीसुंदर यांच्यासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत (दि. ६) पोलीस कोठडी देण्यात आली. अजय ऊर्फ ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे (रा. चिखलठाणा, औरंगाबाद) व बादल चव्हाण (रा. अशोकनगर, श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. बेलापूरसह येथील शहाणे व आडसूळ या शिक्षकांच्या बंगल्यांत दुपारी चोरी झाली होती. यातील काही मुद्देमाल औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागला आहे. या मुद्देमालासह पोलीस हवालदार अकबर शेख, मुकेश बढे, अल्ताफ शेख, मकासरे यांच्या पथकाने दोघांना औरंगाबाद पोलिसांकडून ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांना आज येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. बेलापूरसह लोणी येथील मोठय़ा घरफोडीमध्ये दोघांचा सहभाग असून, त् यांच्यावर अनेक घरफोडय़ांसह वेगवेगळ्या गुन्ह्य़ांची नोंद आहे.

कोपरगाव पीपल्स बँकेवर ठोळे-लोहाडे गटाचेच वर्चस्व
कोपरगाव, ३ मार्च/वार्ताहर

कोपरगाव पीपल्स बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी ठोळे-लोहाडे गटाने चौदाशे मतांच्या फरकाने १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला. विरोधी जनजागृती मंडळाचा दारूण पराभव झाला.
ठोळे-लोहाडे मंडळाचे सर्वसाधारण जागांवरील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी - अतुल काले (१ हजार ७६५), डॉ. विजय कोठारी (१ हजार ६८५), सुनील कंगले (१ हजार ७१३), विजय जाधव (१ हजार ६१०), कैलासचंद ठोळे (१ हजार ७४१), रतनचंद ठोळे (१ हजार ७१४), धरमकुमार बागरेचा (१ हजार ७०८), सुनील बंब (१ हजार ७१५), द्वारकानाथ मुंदडा (१ हजार ६९३), सत्येन मुंदडा (१ हजार ७३१), रवींद्र लोहाडे (१ हजार ६५९), कल्पेश शहा (१ हजार ६९३), राजेंद्र शिंगी (१ हजार ६९८), महिला राखीव - मंगला कासलीवाल (१ हजार ६८८), प्रतिभा शिलेदार (१ हजार ६२३), इतर मागास हेमंत बोरावके (१ हजार ८१३). सत्ताधारी गटाचे यशवंत आबनावे, वसंतराव आव्हाड व दीपक पांडे हे तीन संचालक यापूर्वी बिनविरोध निवडून आले. निवडणूक अधिकारी म्हणून ए. बी. कडू यांनी काम पाहिले. सहायक निबंधक सी. एम. बारी, एस. जी. गायकवाड, आर. एस. त्रिभुवन, महाजन आदींनी साहाय्य केले.

वातावरण निर्मितीची कर्जतकरांना प्रतीक्षा
कर्जत, ३ मार्च/वार्ताहर

उन्हाची तीव्रता वाढत असतानाच लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता राजकीय वातावरणही तापणार असल्याचे दिसते. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना भावी आडाख्यांबाबत नेत्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून इतरत्र राजकीय पक्षांचे व नेत्यांचे फलक उतरविले जात असले, तरी येथे आज तरी हे फलक काढले नव्हते! शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा हे फलक उभारले आहेत. कोणत्या पक्षांची कशाप्रकारे आघाडी होणार, उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी जनतेत उत्सुकता आहे. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे नेत्यांच्या हालचालींकडे लक्ष आहे.

विशेष घटक योजनेंतर्गत पाचजणांना धनादेश
कोपरगाव, ३ मार्च/वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनेंतर्गत २ लाख १० हजारांच्या पाच धनादेशांचे पाच लाभार्थीना वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या सभागृहात सभापती मच्छिंद्र टेके, उपसभापती नवनाथ आगवन, जिल्हा परिषद सदस्य दीपक गायकवाड, गटविकास अधिकारी रामचंद्र म्हस्के, सरपंच अनिल डोखे आदींच्या उपस्थितीत गायी घेण्यासाठी धनादेश देण्यात आले. लाभधारकांमध्ये पोहेगाव जिल्हा परिषद गटातील पांडुरंग आरणे, आंतू खंडीझोड, सुमन पवार, सोपान खंडीझोड, वैशाली खंडीझोड यांचा समावेश आहे. रांजणगाव देशमुख येथील अण्णासाहेब ठोंबरे व सतीश रणधीर यांना शेळ्या घेण्यासाठी २६ हजारांचे धनादेश देण्यात आले. एका लाभार्थीस एका गायीला ७ हजार अनुदान, ७ हजारांचे कर्ज या योजनेंतर्गत दिले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

टेम्पोच्या धडकेने मुलगा जखमी
देवळाली प्रवरा, ३ मार्च/वार्ताहर

रस्त्याने जाणाऱ्या शाळकरी मुलास खडांबे शिवारात टेम्पोने धडक दिल्याने तो जबर जखमी झाला. याबाबत पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली आहे. राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर लांडगे (वय ११) हा शालेय विद्यार्थी शुक्रवारी (दि. २७) पवार पेट्रोलपंपासमोर रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी मनमाडकडे जाणाऱ्या टेम्पो (एमपी ०४ जीए ०७२४) त्याला जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. याबाबत अरुण लांडगे (वय ४३, रा. खडांबे बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तुकाराम कदम करीत आहेत.

पुणतांब्यातील पाणीप्रश्नाचे भांडवल करू नये - धनवटे
राहाता, ३ मार्च/वार्ताहर

पुणतांब्यातील पाणीप्रश्नाचे भांडवल करण्यापेक्षा सर्वानी एकत्र येऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे जि. प. सदस्य डॉ. धनंजय धनवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्हा परिषद, पंचात समितीच्या माध्यमातून गावाची विकासकामे व्हावी, यासाठी आमदार राधाकृष्ण विखे व अशोक काळे गटाने ग्रामपंचायतीमध्ये युती केली असल्याचे त्यांनी सांगितले. पूरक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण यंत्रणेचे काम महिन्यात पूर्ण होणार असून, संपूर्ण योजना एक वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.राजकारणापुरते राजकारण करून पाणीप्रश्नाचे राजकीय भांडवल न करता वैयक्तिक व्यक्तिद्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून गावाचा प्रश्न म्हणून सर्वानी एकत्र यावे. पाणीपुरवठा योजना अध्यक्षांनी सर्वाना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.

जागतिक महिला दिनानिमित्त शेवगावला विविध कार्यक्रम
शेवगाव, ३ मार्च/वार्ताहर

जागतिक महिला दिनानिमित्त तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्षा डॉ. मेधा कांबळे यांनी दिली.दि. ७ मार्च रोजी दुपारी २ वाजता येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या न्या. रानडे सभागृहात प्रा. निर्मला पवार व महेश डाळिंबकर यांचे व्याख्यान होईल. टी. व्ही. व मोबाईल यासारख्या प्रलोभनांपासून मुलांना दूर कसे ठेवता येईल यावर ‘आदर्श पालकत्व’ हा मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शारदा लगड नुकत्याच आंध्र प्रदेशच्या अभ्यासदौऱ्यावरून परतल्याने कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ‘महिला बचतगटांचे उत्पादन व मार्केटिंग’ या विषयावर त्यांचे चर्चासत्र होईल. नुकत्याच घेतलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही यावेळी जिल्हाध्यक्षा लगड यांच्या हस्ते होणार आहे.

निघोजला २ कोटींपेक्षा जास्त विकासकामे - भुकन
निघोज, ३ मार्च/वार्ताहर

निघोज जिल्हा परिषद गटात दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे गेल्या दोन वर्षांंत झाल्याची माहिती पारनेर पं. स. सदस्य खंडू भुकन यांनी दिली. नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सर्वानी सक्रिय होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. माजी उपसभापती व ज्येष्ठ मार्गदर्शक नानाभाऊ वरखडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी भैरवनाथचे संस्थापक बबनराव कवाद, संचालक शिवाजीराव वरखडे, सुभाष रसाळ, बाबाजी वाघमारे, गणेश कवाद, पोपट लामखडे, विष्णू लोखंडे आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. श्री. भुकन म्हणाले की, माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करताना कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात पाठबळ दिले, म्हणूनच ही विकासकामे मार्गी लागली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, सदस्य मधुकर उचाळे यांनीही यासाठी पाठपुरावा केला. वडनेर, शिरापूर, निघोज, अळकुटी, लोणीमावळा, रांधे, दरोडी या परिसरातील बहुतांशी प्रश्न मार्गी लागले. या वेळी कवाद, वरखडे, रसाळ आदींची भाषणे झाली. बाबाजी वाघमारे यांनी आभार मानले.

नगर व शिर्डीची जागा क्रांतिसेना लढविणार
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीत क्रांतिसेना नगर व शिर्डी मतदारसंघाची जागा लढविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. कृषिराज टकले यांनी सांगितले. या दोन्ही मतदारसंघांत क्रांतिसेनेकडून अनेकजण इच्छूक आहेत व वातावरणही अनुकूल आहे, असा दावा करून टकले म्हणाले की, आतापर्यंत निवडून आलेल्यांनी स्वतचे पोट भरण्याचे काम केले. समाजाकडे दुर्लक्ष केले. निवडणुकीस सामोरे जाताना मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा, मराठा समाजातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात आदी मुद्दे मतदारांपुढे मांडणार आहोत, असे ते म्हणाले.

पुरस्कारासाठी आवाहन
मुंबई येथील हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने नगर जिल्ह्य़ात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांना कै. राधाबाई कुलकर्णी विधायक कार्यकर्ती पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्य़ात किमान १० वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्तीनी दि. १ मेपर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी ‘आशा कुलकर्णी, महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, ४/५०, विष्णूप्रसाद सोसायटी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ५७’, (मो. ९८१९३७३५२२) या पत्त्यावर अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.