Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

कासवाच्या तस्करीचा छडा
नागपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर कार्यालयातील अवैध शिकार प्रतिबंधक पथकाने सोमवारी २ मार्चला संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास, उमरेड शहरातील आठवडी बाजारात छापा मारून १२ कासवांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला पकडले.

निवडणूक प्रचारासाठी नव्या मुद्यांची वानवा
चंद्रशेखर बोबडे, नागपूर, ३ मार्च

पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांना प्रचारासाठी स्थानिक पातळीवर प्रभावी ठरू शकणाऱ्या मुद्यांचा अभाव जाणवणार आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दाही यावेळी फारसा प्रभावी ठरण्याची शक्यता नसल्याने विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नवीन मुद्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.पूर्वी लोकसभा निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नावर लढविल्या जात असत. मात्र राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांपेक्षा स्थानिक प्रश्न अधिक प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आल्यावर राजकीय पक्षांनीही त्या-त्या भागातील प्रश्न त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे करण्यास सुरुवात केली.

रेल्वे अभियंत्याची विष प्राशन करून आत्महत्या
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ अभियंता चंद्रकांत श्याम उदापुरे यांनी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने रेल्वे वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निवडणुकांची घोषणा होऊनही राजकीय चित्र अस्पष्टच
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

निवडणूक आयोगाने सोमवारी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना युतीबाबत निर्णय झालेला नसल्याने राजकीय पातळीवर अद्यापही चित्र अस्पष्टच आहे. सर्व राजकीय पक्षांच्या गोटात निवडणुकीच्या पहिल्या दिवशी शांतताच दिसून आली.

राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे मिहानने ५० कोटींचा प्रकल्प गमावला
झारीतील शुक्राचार्याची चौकशी करा -आमदार अशोक मानकर

नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे ‘इंटिग्रेटेड सिलिकॉन कॉम्प्लेक्स’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपुरातून पळवला गेला, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव आमदार अशोक मानकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

स्वीकारच्या जागृती विशेषांकाचे प्रकाशन
नागपूर, ३ मार्च/ प्रतिनिधी

स्वीकार या मतिमंद मुलांच्या पालक संघटनेतर्फे आयोजित जागृती विशेषांक- २००८ चे प्रकाशन तरुण भारतचे मुख्य संपादक सुधीर पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वीकारचे अध्यक्ष गोपाळ बोबडे, जागृती त्रमासिकाचे संपादक रवींद्र गोखले, अनघा मुळे आदी उपस्थित होते. सुधीर पाठक यांनी स्वीकारच्या कार्यक्रमाची स्तुती केली. मतिमंदांच्या क्षेत्रात काम करताना सातत्य टिकवल्याबद्दल सदस्यांचे कौतुक केले. सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास दु:खाची तीव्रता कमी होऊन सामूहिक चिंतनातून प्रश्न सुटू शकतात, असे ते म्हणाले. संचालन विकास खडतकर यांनी केले. डॉ. रवींद्र गोखले यांनी प्रास्ताविक केले. मीनाक्षी दामले यांनी आभार मानले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योत्स्ना लिखिते, मेघा श्रीखंडे, मेधा कुळकर्णी, वीणा हजारे या विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली. शेवटी अनघा मुळे यांचे कथाकथन झाले.

चिखली-ले-आऊटमधील आगग्रस्तांना धान्यवाटप
नागपूर, ३ मार्च/ प्रतिनिधी

चिखली ले-आऊट झोपडपट्टीतील आगग्रस्तांना कळमना धान्यगंज आडतिया मंडळातर्फे वस्त्र आणि अन्यधान्याचे वाटप करण्यात आले. चिखली ले-आऊट येथील झोपडपट्टीला अचानक आग लागल्याने ६० कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. आगग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करून कळमना धान्यगंज आडतिया मंडळातर्फे त्यांना मदतीच्या स्वरुपात धान्य व वस्त्र वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. पीडितांना धान्य व वस्त्र वितरण महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात झाले. कार्यक्रमाला नगरसेविका मालती भगत, बाल्या बोरकर उपस्थित होते. भीमराव राऊत, नरेश जिभकाटे, सारंग वानखेडे, चंद्रशेखर वाघ, गुलाब बालकोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रा. प्रकाश शुक्ल यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
नागपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

आर.एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयातून, गेल्या ३५ वर्षांंच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. प्रकाश शुक्ल नुकतेच सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभात एक हाडाचा शिक्षक, सेवाभावी प्राध्यापक व सामाजिक बांधीलकी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे मत प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. धरमपेठ महाविद्यालयातून १९७४ मध्ये प्रा. शुक्ल यांनी नोकरीला प्रारंभ केला. सुमारे १२ वर्ष ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते. व्यवस्थापन हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने महाविद्यालातील अनेक कार्यक्रमांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. महाविद्यालयाच्या प्रत्येक कामात त्यांनी नाविन्य निर्माण केले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बुलढाणा जिल्हय़ातील एका लहान खेडय़ातून येऊन, नागपूर शहरातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. शुक्ल सेवानिवृत्त झाले.

क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारा अटकेत
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

कोतवाली पोलिसांनी दक्षिणामूर्ती चौकातील एका घरी छापा मारून क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यास अटक केली. उमाशंकर उर्फ गुड्डू सत्यनारायण अग्रवाल हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतभूषण शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दक्षिणामूर्ती चौकातील एका घरी दुपारी छापा मारला. टीव्हीवर सामन्याचे प्रसारण सुरू होते. त्याचवेळी दोन मोबाईलवरून येणारे कॉल्सद्वारे सट्टा लावला जात होता. आरोपी उमाशंकर उर्फ गुड्डू सत्यनारायण अग्रवाल सट्टा लावताना सापडला. एक टीव्ही, दोन मोबाईल व चार्जर, सट्टय़ाच्या नोंदी व रोख २ हजार २५० रुपये असा एकूण ९ हजार ६० रुपये असा ऐवज जप्त करण्यात आला.

‘विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष द्यावे’
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी व पदविकाचे शिक्षण घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत विविध वक्तयांनी व्यक्त केले. युनायटेड स्टुडन्ट्स असोसिएशनतर्फे अन्जुमन हामी ए इस्लामचे माजी अध्यक्ष डॉ. एम.ए. अजीज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक संमेलनात ‘आजचे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा’ या विषयावर शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. परिसंवादात सर्वच वक्तयांनी आज मुलांना चांगल्याच चांगले शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून ती पार पाडायला हवी. विद्यार्थ्यांवर जसे संस्कार कराल तसे विद्यार्थी घडतील पण त्यासाठी शिक्षकांनीच स्वतमध्ये बदल केला पाहिजे, असेही शेख शबीर हुसेन फिदवी म्हणाले. कार्यक्रमाला अल फलाह एज्युकेशन सोसायटी जळगावचे अध्यक्ष हुसैन खान अमिर, इतिहासकार डॉ. मो. शरफुद्दीन साहील, मिल्लत एज्युकेशन अ‍ॅन्ड सोशल वेलफेयर सोसायटीचे सचिव मो. नजीरुद्दीन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद निजामुद्दीन अन्सारी यांनी केले. मोहम्मद इनामुर्रहीम यांनी आभार मानले.

अर्चित पिल्लेला कराटेचे सुवर्णपदक
नागपूर, ३ मार्च / क्री.प्र.

सेंट झेव्हियरच्या हिवरीनगर शाखेचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अर्चित करुणाकरन पिल्ले याने मुलुंड येथे झालेल्या १४ व्या आंतरराष्ट्रीय फुनाकोशी चषक कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कुमिटे कराटे प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. प्रियदर्शनी क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडल्या. अर्चित गेल्या तीन वर्षांपासून कराटेचा सराव करीत असून त्याने यापूर्वीही राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. यशाचे श्रेय त्याने प्रशिक्षक राजेश शर्मा आणि आईवडिलांना दिले आहे. अभ्यासातही तो नेहेमची आघाडीवर असतो.

तरुणाला शाळेच्या बसने चिरडले
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

दुचाकी वाहनांची टक्कर होऊन बाजूला पडलेल्या तरुणाच्या अंगावरून बसची चाके गेल्याने तो जागीच ठार झाला. विश्वकर्मा नगरात मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मुकुल प्रकाश मून (रा. जोशीवाडी) हे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो हिरो होंडा मोटारसायकलने (एमएच ३१ बीए ३३३७) जात असता समोरून आलेल्या स्कुटीशी त्याची टक्कर झाली नि तो बाजूला पडला. त्याचवेळी वेगात आलेल्या एका शाळेच्या बसने (एमएच ४० ४४७१) त्याला चिरडले. या घटनेनंतर तेथे गर्दी झाली. काही वेळातच अजनी पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मुकुलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. अपघातानंतर बस चालक बस घेऊन पळून गेला. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

‘सीएसी ऑलराउंडर’ तर्फे विद्यार्थ्यांकरिता छायाचित्र स्पर्धा
नागपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

‘सीएसी ऑलराउंडर’ या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग छायाचित्रणाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्याबद्दल त्यांना योग्य मार्गदर्शन व माहिती मिळावी, या उद्देशाने छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच हौशी छायाचित्रकारांसाठी आयोजित केली असून निसर्ग पर्यटन, अ‍ॅडव्हेंचर कॅम्प, शाळा, कॉलेजमधील सहली व वन्यजीवन, हे स्पध्रेतील विषय असे राहील. ही स्पर्धा सर्वासाठी खुली व नि:शुल्क आहे. इच्छुक स्पर्धकांनी ८ बाय १०, १० बाय १२ आकाराचे छायाचित्र, ते छायाचित्र घेतलेल्या जागेबद्दलची माहिती व योग्य शीर्षक देऊन संस्थेच्या कार्यालयात ४ मार्चपर्यंत जमा करावे. सर्व छायाचित्रांची परीक्षकांच्या माध्यमातून चाचणी करण्यात येईल व त्यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन रविंद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीत ६ ते ८ मार्चला भरवण्यात येईल. परीक्षकांच्या निर्णयावरून उत्कृष्ट छायाचित्रकारांना पुरस्कृत करण्यात येईल. स्पध्रेबद्दलच्या अधिक माहितीकरता अमोल खंते, संचालक, सीएसी ऑलराउंडर, उमालक्ष्मी अपार्टमेंट, क्यू-१५, नागपूर ३२७१७२७, ९३७०७७२२२७, ९३७०७७१७२७ यांच्याशी संपर्क साधावा.

प्राथमिक शिक्षकांचे ५ मार्चला आंदोलन
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू न करता प्राथमिक शिक्षकांच्या निषेधार्थ पुणे येथे झालेल्या सर्व प्राथमिक संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख सभेच्या वतीने ५ मार्चला विभागातील प्राथमिक शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. तसेच, ७ मार्चला दुपारी १ ते ४ पर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे निदर्शने करण्यात येणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद लोन्हारे यांनी म्हटले आहे.
या आंदोलनात नागपूर विभागातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून शासनाच्या धोरणाचा विरोध करण्याचे आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद भांडारकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद लोन्हारे, सरचिटणीस संजय चामट यांनी केले आहे.

मुख्य आयकर आयुक्त नरसिंहप्पा यांनी पदभार स्वीकारला
नागपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

आयकर विभागाच्या विदर्भ विभागाचे मुख्य आयकर आयुक्त एम.के. मोघे २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झाले. मोघे यांच्या जागेवर पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त नरसिंहप्पा यांनी पदभार स्वीकारला. नरसिंहप्पा यांच्याकडे पुण्याबरोबरच नागपूरचाही अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. नरसिंहप्पा भारतीय महसूल सेवेतील १९७३ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. मोघे यांच्या जागेवर नरसिंहप्पा यांची नियुक्ती झाली आहे. मोघे यांच्या कार्यकाळात त्यांनी निर्धारण अधिकारी अपिलिय प्राधिकारी म्हणून नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि बेळगाव येथे कार्य केले आहे. तसेच मोघे यांनी आयकर संचालक (अन्वेषण) पदावर कार्य केले आहे. जून २००६ मध्ये पदोन्नतीवर मुख्य आयकर पदावर पदोन्नतीनंतर त्यांनी भोपाळच्या आयकर महासंचालक व मुख्य आयकर आयुक्त (संवर्ग नियंत्रण प्राधिकारी) पदावर कार्य केले. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी नागपूर विभागाचे आयकर आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला.