Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

नवनीत

जी व न द र्श न
मुंडकोपनिषद्

अथर्ववेदात मुंडकोपनिषद् आहे. याचे तीन अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचे दोन खंड आहेत. मुण्डक म्हणजे मुंडन करणे. मनाचे मुंडन करून अज्ञानापासून मोकळे करणारे ज्ञान म्हणजे मुंडकोपनिषद. यात आत्मज्ञानाविषयीचा मूलभूत विचार आहे. यज्ञयागादी श्रौत किंवा पूजापाठ; तीर्थयात्रादी स्मार्त कर्मानी आत्मज्ञान लाभत नाही, असे मुंडकोपनिषद् सांगणाऱ्या ऋषींचे मत आहे. आत्मज्ञान साध्य होण्यासाठी माणसाच्या अंगी एकांत आणि आत्मानुसंधान लागते. ते सद्गुरूंच्या कृपेने लाभते. ब्रह्मविद्या ब्रह्मदेवाने अथर्वला सांगितली. नंतर अंगीला सांगितली. पुढे ती त्याने भरद्वाजकुलोत्पन्न सत्यवाहाला सांगितली. सत्यवाहाने अंगिरसाला ही ब्रह्मविद्या दिली. जे ज्ञानेंद्रियांच्या अतीत आहे; जे कर्मेद्रियांच्या पार आहे; जे अनादि, अनंत, सूक्ष्म आहे, असे ते ब्रह्म सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण होते. ज्याप्रमाणे कोळी स्वत: तंतू उत्पन्न करतो व पुन्हा आत घेतो; ज्याप्रमाणे पृथ्वीवर वनस्पती निर्माण होतात; ज्याप्रमाणे जिवंत माणसाच्या अंगावर मस्तकाचे केस व अंगावरील लव येते- त्याप्रमाणे अविनाशी ब्रह्मापासून विश्व निर्माण होते. चिंतनशीलता हा या विश्वाचा उगम आहे. यात अग्नीची उपासना महत्त्वाची आहे. अग्नी हा इहलोक व परलोक यातला दुवा आहे. सूर्य हा स्वर्गद्वार आहे. या कर्मभूमीत कर्मानेच यशप्राप्ती होते. कर्माला मानसिक आणि अध्यात्मिक अशा बाजू असतात. कर्माने पापपुण्य जन्मते. जन्म वाया न घालविता सत्कर्म करा. चित्तवृत्ती परमात्म्यात गुंतवा. कर्तव्यात तत्पर असा. कर्मफलाची आसक्ती नसल्याने त्याचे बंधन नाही. हे बंधन सैलावले की, मन आत्मरूप होते. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत ज्ञानदेव सांगतात, ‘जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ याला सर्वत्र ईश्वर दिसण्याची जाणीव होणे म्हणतात. यासाठी ॐकाराची उपासना सतत करा. म्हणजे वासनेतून मोकळे व्हाल. हाच मोक्ष!
यशवंत पाठक

कु तू ह ल
चंद्राची निर्मिती
चंद्र कसा निर्माण झाला? चंद्रावर वातावरण का नाही?

चंद्र कसा निर्माण झाला असावा, यासंबंधात एकूण चार मतप्रवाह आहेत.
अ) सहोदर सिद्धांत (सिस्टर थिअरी)- चंद्र आणि पृथ्वी यांचा जन्म एकाच वेळेला झाला, असं हा सिद्धांत सांगतो. हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळच होते. चंद्र पृथ्वीपेक्षा बराच लहान असल्यानं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागला.
ब) पकड सिद्धांत (कॅप्चर थिअरी)- चंद्र आणि पृथ्वी यांची निर्मिती एकमेकांपासून दूर (पण आपल्या सौरमालेतच!) झाली. कालांतराने पृथ्वीनं चंद्राला आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे पकडलं आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरू लागला.
क) विभाजन सिद्धांत (डॉटर अथवा फिशन थिअरी)- पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा ती प्रचंड वेगानं स्वत:भोवती फिरत होती. प्रचंड म्हणजे किती -तर तेव्हा दिवस-रात्रीचं चक्र २४ तासांचं नव्हतं. ते होतं फक्त दोन तासांचं! या प्रचंड वेगामुळे पृथ्वीचा एक भाग निखळून पडला आणि त्याचंच पुढं चंद्रात रूपांतर झालं. पृथ्वीवर तेव्हा पडलेला ‘खड्डा’ म्हणजे आजचा प्रशांत महासागर!
ड) महा-आघात सिद्धांत (जायंट इंपॅक्ट थिअरी)- एका प्रचंड ग्रहानं पृथ्वीला टक्कर दिली. हा ग्रह साधारण मंगळाएवढा होता. या प्रचंड आघातामुळे पृथ्वीचा भलामोठा तुकडा अंतराळात उडाला. तो तुकडा म्हणजे आपला चंद्र.
वरीलपैकी कोणताच सिद्धांत सर्वमान्य नसला तरी चौथा सिद्धांत बरोबर असावा, असं मानलं जातं. चंद्राचं वय सुमारे साडेचार अब्ज र्वष असावं, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. चंद्राचं गुरुत्वाकर्षण फार कमी आहे. त्यामुळे तो वायूच्या रेणूंना ‘धरून’ ठेवू शकत नाही. सूर्यावरून काही वायू चंद्रावर येतात खरे, पण ते अंतराळात उडून जातात. त्यामुळे चंद्रावर वातावरण नाही!
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
धर्मयोद्धा सलादिन

मध्ययुगात ख्रिस्ती विरुद्ध मुस्लिमांचा संघर्ष हा क्रुसेड्स म्हणजे ‘धर्मयुद्ध’ म्हणून ओळखला जातो. एकूण आठ धर्मयुद्धे झाली. त्यातील पहिली दोन ख्रिस्तांनी जिंकली. परिणामी त्यांचा आत्मविश्वास वाढला. अशा बिकटप्रसंगी तिसऱ्या धर्मयुद्धात सलादिन याने मुस्लिमांना विजय मिळवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. तो इस्लामच्या इतिहासात धर्मयोद्धा म्हणून ओळखला जातो. त्या सलाहउद्दिन युसूफ अयुब ऊर्फ सलादिन याचा जन्म ११३७ च्या सुमारास इराकमधील तिकरीस या भागात झाला. इजिप्तच्या लढाईत त्याने मोठा पराक्रम गाजवल्याने तो इजिप्तचा वजीर बनला. कालांतराने सारी सत्ता त्याच्या हाती आली. सन ११८९ ते ११९२ या काळात तिसरं धर्मयुद्ध झाले. याात त्याने मोठा पराक्रम गाजवला. हातिनची लढाई हा त्याच्या शौर्याचा कळसच. येशू ख्रिस्ताच्या वास्तव्यामुळे जेरूसलेम ख्रिश्चनांची पवित्र भूमी बनली होती, तिच्यावर सलादिनने वर्चस्व मिळवल्याने युरोपात खळबळ उडाली. त्याचं पारिपत्य करण्यासाठी इंग्लंडचा राजा रिचर्ड, फ्रान्सचा राजा फिलीप दुसरा, जर्मनीचा राजा बार्बारोसा आणि इतर लहानमोठे राजे एकत्र येऊन लढले; परंतु या संघर्षांतही सलादिनच विजयी झाला. त्याचा साऱ्या युरोपने धसका घेतला. इतका की पुढचे धर्मयुद्ध लढण्यासाठी त्याच्या नावाने सलादिन टाईथ नावाचा कर गोळा केला गेला. सलादिन कुशल प्रशासकही होता. कैरोत इस्लामच्या अभ्यासासाठी शाळा काढल्या. अर्थव्यवस्था मजबूत केली. काहींनी क्रूर, व्यभिचारी, आक्रमक म्हणून त्याची निंदा केली. ‘जिहाद’च्या नावाखाली त्याने क्रौर्याचा कळस गाठला. तरीही इटालियन महाकवी दान्ते याने आपल्या ‘डिव्हाईन कॉमेडी’मध्ये होमर, सिझर यांच्याबरोबर त्याची तुलना केली. यावरून त्याचे श्रेष्ठत्व लक्षात येते. ४ मार्च ११९३ रोजी त्याचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
हत्ती घरी आला

सुट्टी संपून शाळा सुरू व्हायला चांगले दहा दिवस उरले होते. सगळी मुले सुट्टीला कंटाळली होती. अपूर्वाला मात्र कंटाळा आला नव्हता, कारण तिची मित्रमंडळी! अपूर्वाचे बाबा फॉरेस्ट ऑफिसर होते. बाबांनी मोठा प्लॉट पाहून घर बांधले होते आणि घराबाजूची मोठी जागा दिली अपूर्वाच्या ‘मित्रमंडळा’साठी! अपूर्वाच्या मित्रमंडळींत होता मोत्या कुत्रा. तांबूस रंगाचा, मोठय़ा कानांचा. अपूर्वाची लांबून चाहूल लागली की, हा ‘भोऽऽभोऽऽ’ करून हाळी द्यायचा. छोटय़ा जाळीच्या घरात होता मुन्ना कोंबडा. ऐटदार, तुर्रेबाज. त्याच्या घरात बसायचाच नाही. सारखे दाणे टिपत फिरायचा. कापसासारखा गुबगुबीत, लाल मण्यासारख्या डोळय़ांच्या सशाचे नाव होते राजा. गाजर, गवत दिले की, स्वारी खूश! एक स्टारटर्टल होते चांदण्यांच्या पाठीचे. पिवळय़ा चांदण्या त्याच्या हिरव्या टणक पाठीवर फार सुंदर दिसायच्या. रात्री भिंतीकडे डोकं करून गाडी पार्किंगला लावली जाते तसे पार्किंग करायचा. अपूर्वा आपल्या मित्रांत रमली होती. हॉर्न वाजला. बाबा टूरवरून परतले होते. येताना तिच्यासाठी खजिनाच आणला होता त्यांनी. मोराचा तुरा, साळींदराचे पांढरे-काळे काटे.. अपूर्वाला कधी एकदा खजिना मैत्रिणींना दाखवते असे होऊन गेले. जेवल्यानंतर बाबा अपूर्वाच्या मित्रमंडळात आले. हसून म्हणाले,‘खूश आहे ना आमची अपूर्वा राणी?’ दुडुदुडू उडय़ा मारणाऱ्या राजा सशाला उचलून कुरवाळत अपूर्वा बाबांजवळ येत म्हणाली, ‘बाबा, आपल्याकडे हत्ती कुठंय?’ बाबांनी अपूर्वाच्या सगळय़ा मागण्या आजपर्यंत पुरवल्या होत्या. तेवढय़ात अपूर्वाचे बोलणे ऐकून आई व्हरांडय़ातून ओरडली, ‘तरी सांगत होते फार लाडावू नका. एक दिवस डोक्यावर बसेल. देणार का आता हिला हत्ती आणून?’ बाबा निरुत्तर झाले. अपूर्वा मनाशीच म्हणाली,चुकलं माझं. आई रागावली. बाबाही रागावले असणार. मला हत्ती नकोय म्हणून सांगू या बाबांना. दुसऱ्या दिवशी सकाळी बेल वाजली. ‘कोण आलं बरं’ म्हणत बाबांनी दरवाजा उघडला. ‘मी शिर्के, रॉयल सर्कसचा मॅनेजर!’ ‘या! या! बोला काय काम काढलंत?’ बाबांनी विचारलं. ‘तुम्हाला प्राण्यांची आवड आहे, म्हणून विचारायला आलोय. आमचा हत्ती तुम्ही घ्याल का?’ ‘काय हत्ती?’ बाबा आश्चर्याने म्हणाले. अपूर्वा धावत आली. आईही आली. ‘आमचा हत्ती -अलेक्झांडर म्हणतो त्याला आम्ही- म्हातारा झालाय. काम जमत नाही त्याला.’ अपूर्वाकडे पाहात म्हणाला, ‘हं तू दोन-तीन वेळा आली होती सर्कस पाहायला. अलेक्झांडरनं टाकलेला बॉल हिनंच झेलला होता. हिनं रिंगणात बॉल फेकला तो अलेक्झांडरनं पकडला.’ ‘होऽऽ मज्जा आली’, अपूर्वा म्हणाली. तिचं सारं लक्ष बाबा काय म्हणतात इकडे लागले होते. ‘पण त्याची किंमत फार असेल’, बाबा चिंतेने म्हणाले. ‘त्याची काळजी नको. तुम्हाला वाटेल ती किंमत द्या. तीही हप्त्याहप्त्याने’, त्यांचे बोलणे चालू होते. एवढय़ात फाटक उघडल्याचा, मोत्याच्या भुंकण्याचा आवाज आला. सगळय़ांच्या नजरा फाटकाकडे वळल्या. त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. दारातून हत्ती आत येत होता.
स्वप्नांना मर्यादा नसतात. तुमच्या स्वप्नांचे तुम्ही निर्माते आहात. तुमच्या स्वप्नात तुम्ही काहीही करू शकता. कुणीही होऊशकता. तुमची स्वप्ने लिहून ठेवा. वर्षांशेवटी पाहा, किती खरी झाली, किती विसरली गेली. आजचा संकल्प- मी स्वप्न पाहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com