Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

पावणेकरांचे शुक्लकाष्ठ संपणार तरी कधी?
जयेश सामंत

नवी मुंबईतील राजकारण तसेच समाजकारणावर गेल्या दोन दशकांपासून एकहाती साम्राज्य राखणारे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे राज्याच्या पर्यावरण विभागाची जबाबदारी येऊनही गणेशदादांवर वर्षांनुवर्षे जीवापाड प्रेम करणाऱ्या पावणेकरांच्या मागे लागलेले प्रदूषणाचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

हिप्नोचिकित्सा - अतिप्राचीन उपचारपद्धती
आजार हा मानवी जीवनाला एक शाप आहे. वर्षांनुवर्षे, युगानयुगे माणूस यात भरडला गेला.. आजही जात आहे. काळ बदलला पण माणसाची दु:खे व आजार यातून त्याची सुटका झाली नाही. या परवडीत वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाच्या आमूलाग्र सुधारणा होऊन मानवाने कित्येक दुर्धर आजारांवर मात केली. परंतु काही वर्षांत वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती रूढ झाल्या, रुळल्या. त्यात सोनेरी पावलाने ‘हिप्नोचिकित्सा’ ही अद्भुत, तितकीच परिणामकारी चिकित्सा मानवी जीवनात दाखल झाली. डॉ. तुषार हांडे (गिरगाव, मोबाईल नंबर ९८२०७०१६५३) या सुप्रसिद्ध हिप्नोचिकित्सकांनी समाजाच्या असलेल्या बांधिलकीच्या नात्याने आजवर या अद््भुत चिकित्सेचा लाभ कैक आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या वर्गाला दिला आहे व समाजसेवेची ज्योत गेल्या चार वर्षांपासून तेवत ठेवलेली आहे.

पैशासाठी मित्रावर वार
उरण/वार्ताहर
: पैशाची मदत न करणाऱ्या मित्राला निर्जनस्थळी बोलावून सहकाऱ्यांकरवी मारहाण व चाकूचे वार करून चेन, ब्रेसलेट, दुचाकी वाहनासह सुमारे अडीच लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी घडली. कल्पेश पाटील (२५), रा. भेंडखळ याचा मित्र फुरकान चारफाटा- डाऊरनगर येथे राहतो. फुरकान हा कल्पेशला फोन करून वडील आजारी असल्याचे सांगून पैशांची मागणी करीत होता. मात्र कल्पेशने त्याची मागणी पूर्ण केली नव्हती. फुरकानने सोमवारी दुपारच्या सुमारास कल्पेशला शक्करबाबा दग्र्याजवळील निर्जन विहिरीजवळ बोलाविले. कल्पेश घटनास्थळी पोहोचताच एका अज्ञाताने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि दंडुकाने मारहाण केली, तर दुसऱ्या इसमाने कल्पेशच्या पोटावर व मनगटावर चाकूने वार केले. कल्पेशला जखमी अवस्थेत टाकून फुरकान व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी कल्पेशच्या गळ्यातील १२ तोळ्याची सोन्याची चेन, चार तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट, १८ हजारांचा नोकिया कंपनीचा मोबाइल व १८ हजाराची होन्डा टू व्हिलर गाडी घेऊन पोबारा केला. फुरकान हा सराईत गुन्हेगार असून उरण, मुंबईत अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर असल्याची माहिती तपास अधिकारी रवींद्र दौडकर यांनी दिली.

लोकसभेसाठी तरुणांना उमेदवारी द्यावी
रामशेठ ठाकूर यांचा आग्रह

पनवेल/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत पक्षाने तरुणांना उमेदवारी द्यावी, असे आपले मत आहे. भविष्यात निवडणुकीला उभे न राहण्याचे आपण यापूर्वीच ठरविले आहे, परंतु सोनिया गांधी यांनी आदेश दिला, तर आपण निवडणूक लढवू, असे प्रतिपादन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी घोषित झाल्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तरुणांना प्राधान्य देण्यासाठी पक्षाने आपले पुत्र, पनवेलचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणीही त्यांनी केली. स्थानिक नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी सोमवारी पनवेलमध्ये दाखल झालेल्या पक्षनिरीक्षकांच्या बैठकीत रायगडमधील उमेदवारीबाबत एकमत झाले नाही. या बैठकीत विरोधकांच्या गटाने रामशेठ ठाकूर यांना धक्काबुक्की केली व त्यांची कॉलर पकडली, अशी वृत्ते काही ठिकाणी प्रसिद्ध झाली, तसेच स्थानिक केबलवरूनही या प्रकाराला प्रसिद्धी देण्यात आली. मात्र तुरळक घोषणाबाजीचा अपवाद वगळता या बैठकीत कोणताही अपप्रकार घडला नाही, असा दावा रामशेठ यांनी केला. शेकाप नेत्यांकडून आपणास बदनाम करण्याचा, तसेच काँग्रेसमध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. रायगड व मावळ अशा दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा असून, राष्ट्रवादीने मावळची मागणी केली आहे. यातून लवकरच तोडगा निघेल, असे ते म्हणाले. निवडणुकीचे वेळापत्रक घोषित झाल्यानंतर रायगडमधील राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे.

मतिमंद विद्यार्थ्यांनी केले रसिकांना तृप्त
उरण/वार्ताहर :
स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या ‘स्वीकार’ या मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहमेळावा सोमवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. मतिमंद विद्यार्थ्यांनी नृत्य-गायनाचा सदाबहार कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान मागील १९ वर्षांपासून मतिमंद मुलांसाठी कार्य करीत आहे. प्रतिष्ठानच्या उरण येथील ‘स्वीकार’ शाळेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत, याचे औचित्य साधून संस्थेने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उरण येथील पालक मैदानात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन येथील ज्येष्ठ पत्रकार गोपीनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या संस्थापिका शिरीष पुजारी, मिलिंद पाडगावकर, अ‍ॅड. अरविंद भानुशाली व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे दोन तास विविध मनोरंजनाचे कार्यक्रम मोठय़ा सफाईपणे विद्यार्थ्यांनी सादर केले. गणपती नमनाने सुरू झालेल्या कार्यक्रमाचा ‘मेघा रे बरसो बरसो’ या सामूहिक नृत्य-गायनाने समारोप करण्यात आला. दरम्यानच्या काळात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेतील फॅशन शोचेही सादरीकरण केले. ओमकार स्वरूपा, कोळीगीत ‘डोल डोलतंय वाऱ्यावरी’, शहिदांना श्रद्धांजली वाहणारे ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ व विशेषत ‘बमबम भोले मस्तीमें डोले’ आदी गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळविली. रसिकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मुक्तहस्ताने बक्षिसांची खैरात करून या कार्यक्रमाचा आनंद लुटला.