Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्य़ांबाबत आता पोलिसांना खास प्रशिक्षण
प्रतिनिधी / नाशिक

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता जिल्हा निवडणूक यंत्रणेने अमलबजावणी, निरीक्षण आणि तक्रार निवारण समिती गठीत केली असून या काळात आचारसंहितेचा भंग झाल्यास कोणते गुन्हे दाखल करावेत, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना लवकरच खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची यादी, परवानाधारक शस्त्रे जमा करणे, अनधिकृत मद्यसाठा विरोधात कारवाई करण्याची सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. वेलारसू यांनी पत्रकार परिषदेत दिली.आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर खऱ्या अर्थाने धावपळ सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने विविध शासकीय विभागप्रमुखांची संयुक्त बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.त्याची माहिती यावेळी वेलरसू यांनी दिली.

आचारसंहितेतला ‘आदर्श’
भाऊसाहेब : येकदाची आचारसंहिता जाहीर झाली म्हनायची भावराव..
भाऊराव : हो, पण या आदर्श आचारसंहितेमुळे पहिल्यासारखा निवडणुकीचा गाजावाजा होत नाही. मग, निवडणुका केव्हा आल्या अन् केव्हा गेल्या तेही कळत नाही.
भावडय़ा : आपल्यासारखी मजा नाही असं प्रत्येक पिढीला वाटत असतं डॅड, पण आचारसंहितेच्या पडद्याआड जी धमाल सुरू असते, निवडणुकीच्या रंगमंचावरील विंगेत जो गलका सुरू असतो त्याची गंमत घरात बसून चर्चा करणाऱ्या तुमच्यासारख्या मंडळींना कशी कळणार ?
भाऊराव : अरे, तुम्हाला पडद्याआड करावं लागतं ते आमच्याकाळी रंगमंचावरच व्हायचं, सगळं कसं थेट आरपार. आता काय, प्रचाराचे भोंगे लाऊ नका, एवढीच पोस्टर छापा, ठराविकच खर्च करा, त्याचाही हिशेब द्या, रात्री १० नंतर सभा घेऊ नका असा सगळा नन्नाचा पाढा..

मौनव्रतातून बाहेर यावे
स्वतंत्र भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासूनचा मी साक्षीदार आहे. निवडणुका आणि प्रतिनिधींची निवड यात झालेली क्रांती, वैचारिक बदल, वातावरण आणि लोकांचा सहभाग व उत्साह वेळोवेळी बदलत गेला. घराणेशाही वाढली. दुसऱ्याबाजुला लोकप्रतिनिधींची कार्यपद्धती बदलली. एकेकाळचे नाशिकचे खासदार गोविंदराव देशपांडे निवडून गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जीव तोडून संसदेत मांडत. लोकसभा अधिवेशन संपले की शहरातील महत्वाच्या चौकाचौकातून त्यांची भाषणे होत. या माध्यमातून त्यांनी जनतेला सुशिक्षित केले आणि महाराष्ट्रातील ‘मुलुख मैदान तोफ’ म्हणून लोकसभेत ते ओळखले गेले.

कांदा निर्यातीबाबत स्थानिक खासदारांचे दिल्ली दरबारी मौनच
प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रतिनिधी / नाशिक

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याच्या निर्यातीस मुबलक संधी उपलब्ध असताना केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या काही विशिष्ट संस्थांमुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले असून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या प्रश्नाचे गांभीर्य दिल्ली दरबारी मांडण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना फारसा रस नसतो हा आजवरचा अनुभव आहे.

बदलत्या हवामानाचा वृक्षांच्या बहरण्यावरही परिणाम
नाशिक शहरातील बदलत्या हवामानाचा परिणाम शहरातील वृक्षांच्या बहरण्यावर होऊ लागल्याचे दिसत आहे. वृक्षाला येणारी कोवळी पाने वसंत ऋतूची चाहूल देतात. प्रत्येक वृक्ष आपल्या ठरलेल्या कालावधीतच फुलत असतो. वसंतात अनेक वृक्ष फुलतात. परंतु यंदा तसे होत नसल्याचे दिसत आहे.निलमोहर हा वृक्ष वर्षांतून चक्क तीन वेळा बहरताना दिसला. केशरी, तांबट रंगाचा स्पेतोडीया, सप्तपर्णी हे वृक्ष देखील दोनदा फुलले.

नाशिक मतदारसंघात गुंतागुंत वाढणार
नाशिक / प्रतिनिधी

होणार होणार म्हणता म्हणता अखेर आगामी सार्वत्रिक निवडणुकीची अचारसंहिता जाहीर झाली असून आता नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही दावेदारांनी आपापल्या उमेदवारांच्या शोध मोहिमेस गती दिली आहे. मतदार संघाची पुनर्रचना हे येत्या निवडणुकीचे वैशिष्ट राहणार असून शहरी मतदार काय कौल देतात त्यावरच दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

मराठी दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
नाशिक / प्रतिनिधी

कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी दिन म्हणून साजरा करताना शैक्षणिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांचा त्यांच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला. राजकीय पक्षाकडून असा अभिनव उपक्रम पहिल्यांदाच आखण्यात आल्याने साहित्यिक कमालीचे भारावले.

नाशिकमध्ये उद्या स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेची स्थापना
नाशिक / प्रतिनिधी

ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या हेतूने तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण देणारी विशेष संस्था बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे येथे स्थापन करीत असून पाच मार्चला बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अलेन सी. ए. पिरेरा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या आयोगानुसार वेतन न दिल्यास आंदोलन
नाशिक / प्रतिनिधी

एप्रिल २००९ पासून राज्यातील नगर पालिकातील ६७ हजार कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा येथे झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्य सरचिटणीस सुर्याजी साळुंखे यांनी दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. एल. कराड होते. मेळाव्यात २०० प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिल २००९ पासून सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन देण्याचे जाहीर केले आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्याने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. हा भेदभाव असल्याचे प्रतिपादन साळुंखे यांनी केले. अनेक नगर परिषदांची आर्थिक स्थिती वाईट आहे. वेतन व निवृत्तीवेतन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व निवृत्ती वेतनासाठी राज्य शासनाने १०० टक्के अनुदान द्यावे अशी मागणी डॉ. कराड यांनी केली. मेळाव्यात आकृतीबंध रद्द करून वाढती लोकसंख्या व हद्दी लक्षात घेवून नोकर भरती करण्यात यावी, कंत्राटी पद्धत बंद करून कंत्राटी कामगारांना कायम करावे, किमान वेतन लागू करावे, महाराष्ट्र नागरी सेवा, अधिनियम नगर परिषद कर्मचाऱ्यांना लागू आहे. त्यामुळे संबंधित कलम रद्द करावे, अशीही मागणी यावेळी रघुनाथ बैसाणे, काशिनाथ वाघमारे, देविदास पागडे, रमेश कांबळे, रघुनात देशिंगे यांनी केली.
१०.३.१९९३ नंतर आजपर्यंत कार्यरत हजारो रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप कायम करण्यात आलेले नाही. अत्यल्प वेतनावर राबवून घेतले जाते. कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशी मागणी प्रा. बी. जी. खाडे, रामदास पगारे, हिरामण सोनवणे, राजेंद्र पाखले, खलीलखान पठाण यांनी केली. प्रास्तविक सीताराम ठोंबरे यांनी केले व आभार कॉ. अशोक लहाने यांनी मानले. सूत्रसंचालन पोपटराव सोनवणे यांनी केले.

वाघ कृषी महाविद्यालयाचे रासेयो शिबीर
नाशिक / प्रतिनिधी

येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन मौजे शिंदे-पळसे येथे नुकतेच करण्यात आले होते. शिबीर कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी बाभळेश्वर परिसरामध्ये टेकडीवर दगडीबांध बांधणे, चारी खोदणे, झाडांना पाणी देणे, ग्रामस्वच्छता, कुटुंब सर्वेक्षण इत्यादी कामे केली. शिबिराच्या समारोप प्रसंगी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे विकास अधिकारी टी. एन. भांडारे, सचिव डी. एस. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. भामरे, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. सूर्यवंशी उपस्थित होते. भंडारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्रमसंस्काराचे महत्व सांगितले.