Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

धुळे लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण झाल्याने चुरस
घडामोडी, धुळे / वार्ताहर

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांपैकी पाच मतदार संघ अनुसूचित जाती आणि चार अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांना नव्या मतदार संघाची शोधाशोध करावी लागत असताना धुळे जिल्ह्य़ात मात्र उलट चित्र दिसत आहे.

नंदुरबारमध्ये आघाडी न झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच मुख्य लढत
शहादा / वार्ताहर

१९५७ चा अपवाद वगळता १९५२ पासून केवळ काँग्रेसलाच विजयी करणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा हाच कित्ता गिरविण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज झाले असताना आघाडी न झाल्यास प्रथमच त्यांना राष्ट्रवादीसारख्या प्रबळ प्रतिस्पध्र्याचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाल्यास नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला यश मिळणार हे प्रतिस्पध्र्यानाही मान्य आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इनडोअर स्टेडियमसाठी प्रयत्नशील- डॉ. पाटील
जळगाव / वार्ताहर

जिल्ह्य़ासाठी जे शक्य आहे, ते सर्व करण्याची आपली जबाबदारी असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इनडोअर स्टेडियमसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची ग्वाही क्रीडा आणि परिवहन तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दिली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार आणि विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे जिमखाना डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील बोलत होते. कुलगुरु प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठ क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, कुलसचिव डॉ. एम. व्ही. बरीदे, शिक्षणशास्त्र विद्या शाखेच्या अधिष्ठातांसह प्रा. संजय सोनवणे, क्रीडा संचालक दिनेश पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विलास चव्हाण आदी उपस्थित होते.

रेल्वेखाली सापडून युवक ठार
भगूर / वार्ताहर

सिन्नर येथील तालुका भूमी अभिलेख विभागात भूमापक म्हणून सेवेत असलेले भगूर येथील महेंद्र दत्तात्रय देशमुख (३०) हे रेल्वेखाली सापडून ठार झाले. दुपारी तीनच्या दरम्यान देशमुख हे रेल्वे रूळ ओलांडत असताना पवन एक्स्प्रेस खाली सापडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
एक्स्प्रेसच्या चालकाने देवळाली रेल्वे स्थानकात एक तरूण गाडी खाली सापडल्याचे खबर देताच रेल्वेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हसन पठाण घटनास्थळी दाखल झाले. पाकीटात आढळलेल्या ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटली. देशमुख यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

‘शेतमालाला मिळणाऱ्या भावात शासनाची कर्तबगारी नाही’
सटाणा / वार्ताहर

शेतीमालाला आज जो बाजारभाव मिळत आहे, त्यात शासनाची कोणतीही कर्तबगारी नसून शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळेच त्यांच्या मालास वाजवी भाव मिळत असून तो त्यांच्या व्यक्तीगत कष्टाचा भाग असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील यांनी केले. तालुक्यातील कूपखेडा येथे आयोजित विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. पाटील यांनी तालुका विकासाचा ध्यास घेऊन पं. ध. पाटील, वा. स. सोनवणे यांनी अनेक वर्षे पक्ष विरहित कामकाज केल्याचे उदाहरण दिले. मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली असली तरी आ. संजय चव्हाण यांनी सक्षमपणे बागलाण तालुक्यात विकास कामे केली आहेत, एवढय़ावरच त्यांनी थांबू नये. तालुक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अधिक यश मिळवायचे असेल तर विकास कामे करताना गटबाजीचे राजकारण संपवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन वाढले. डाळिंब उत्पादकांच्या सोईसाठी लखमापूर येथे डाळिंब संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली. त्याचप्रमाणे कूपखेडा येथे डाळिंब संशोधनासाठी उपकेंद्राची निर्मिती करावी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकानंतर स्वतंत्र बैठक बोलावावी असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राघोनाना अहिरे, डॉ. विलास बच्छाव, विजयराज वाघ, अनिल चव्हाण, विमलबाई महाले, अशोक सूर्यवंशी, शैलेश सूर्यवंशी, रामकृष्ण अहिरे, ज्ञानेश नंदन आदी उपस्थित होते.

देवळ्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात
देवळा / वार्ताहर

देवळ्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कळवण तालुक्याचे विभाजन होवून स्वतंत्र देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यावर तब्बल १० वर्षांनंतर भाडय़ाच्या जागेत का होईना, पण स्वतंत्र पोलीस ठाण्याची सुरूवात अखेर झाली आहे. या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तालुक्यातील संपूर्ण ४९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी कळवणचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पाटील, देवळ्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निसार शेख, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. सरवदे, उपसरपंच जितेंद्र आहेर, प्राचार्य हितेंद्र आहेर, विजय पगार उपस्थित होते.

सोन्या मारूती मंदिराचा उद्यापासून जीर्णोध्दार सोहळा
नाशिक / प्रतिनिधी

शहरातील सराफ बाजारमधील प्राचीन दक्षिणमुखी सोन्या मारुती मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा पाच मार्चपासून सुरू होणार आहे. जीर्णोध्दार कार्यक्रमाच्या निमित्ताने सोन्या मारूतीच्या मूर्तीवरील कवच पूर्ण चांदी व त्यावर सुवर्णलेपन करण्यात आले आहे. पाच मार्च रोजी दुपारी शोभायात्रा काढण्यात येणार असून बग्गीमध्ये श्रींची सुवर्णजडीत मूर्ती ठेवण्यात येणार आहे. सहा ते आठ मार्च दरम्यान यज्ञासह इतर धार्मिक कार्यक्रम होऊन श्रींची विधीवत स्थापना करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी दुपारी ११ वाजता मंदिर संस्थान आखाडय़ाचे प्रमुख महंतांच्या उपस्थितीत पूजा केली जाणार आहे. या निमित्ताने महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा नागरे, बाळासाहेब कुलथे, सुनील महालकर, विजय घोडके, सुनील सुगंधी आदींनी केले आहे.

भुसावळ पालिकेचे ५५ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
भुसावळ / वार्ताहर

नगरपालिकेचे २००९-१० या वित्तीय वर्षांसाठी ५५ कोटी १ लाख २३ हजार खर्चाचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा माधुरी फालक यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकात नवीन दुकाने, संकुले, नवीन रस्ते, गटारी, शाळा, घरकुले, नाटय़गृह बांधणे, बगीचे, पुतळे आदींच्या उभारणीची तरतूद आहे. तसेच महिलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण, घनकचरा व्यवस्थापक व विल्हेवाट अंतर्गत शहरातील दररोज निघणाऱ्या घन कचऱ्यापासून गोजोरे शिवारात सेंद्रीय खत प्रकल्प उभारणे आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. आगाखान वाडय़ात बीफ मार्केट बांधणे, झोपडपट्टय़ांमध्ये सुविधा पुरवणे, वॉर्ड क्र. १४ मध्ये नाल्यास संरक्षक भिंती बांधणे, रिंगरोडवरील पूला्ची उभारणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, शाळा इमारतींना मंजुरी देतानाच स्मशानभूमी व कब्रस्तानाचे नूतनीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे यासाठी सुद्धा खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल संजय बाणाईत यांनी केले. त्यांना जीवनसिंग पाटील, भागवत सरोदे व जनसंपर्क अधिकारी एस. व्ही. सुरवाडे यांचे सहकार्य लाभले.

लोकशाहीदिनी ७२ अर्ज दाखल
धुळे / वार्ताहर

लोकशाही दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ६५ तर महानगर पालिकेकडे सात अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनानंतर ही माहिती देण्यात आली. या ६५ अर्जांपैकी महसूल विभागाचे ३८, जिल्हा परिषद १२, पोलीस प्रशासन ३, पाटबंधारे २, सहकार ५, भूमी अभिलेख २, महापालिका २, लीड बँक १, राज्य उत्पादन शुल्क १ अशा अर्जाचा समावेश आहे. आजवर दाखल जालेल्या २३६ अर्जावर निकाल देणे अद्याप बाकी आहे. दरम्यान महापालिकेत नगररचना विभाग ३, बांधकाम ३, वसुली विभागाचे दोन असे सात अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.