Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

पक्षनेतेपदाचा राजीनामा आणि अध्यक्षपदही हुकले !
पिंपरी, ३ मार्च / प्रतिनिधी

स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळण्यास अडथळा ठरेल, या धास्तीने जगदीश शेट्टी यांनी पक्षनेतेपद सोडले. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्ञानेश्वर भालेराव यांनी बाजी मारल्यानंतर आता पक्षनेतेपदही नाही आणि अध्यक्षपदही नाही, तेलही गेले, तूपही गेले, अशी शेट्टी यांची अवस्था झाली आहे. त्यांच्या पक्षनेतेपदाचे काय करायचे, याचा निर्णय आता पालकमंत्री अजित पवार घेणार आहेत. जगदीश शेट्टी यांच्याकडे पक्षनेतेपद असल्याने त्यांना स्थायी समितीत प्रवेश देण्यास अजित पवार यांनी नकार दिला होता.

फलक, अतिक्रमणांच्या विरोधात पालिका व पोलिसांची मोहीम सुरू
पुणे, ३ मार्च/प्रतिनिधी

शहरातील जाहिरात फलक, अनधिकृत फ्लेक्स, भित्तिपत्रके यासह सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर धडक कारवाईची मोहीम महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या हाती घेतली असून अतिक्रमणांची माहिती कळविण्याचे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे.

राहिले ते राहिले..
‘उडाले ते कावळे नि राहिले ते मावळे..’ काही आठवलं? अहो, आता निवडणुकीचं बिगूल वाजलायं! तुमच्या राजकीयबुद्धीला आता धार लावा!! काँग्रेसला रामराम ठोकून विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढविली होती. ‘उडाले ते कावळे नि राहिले ते मावळे’ अशा त्वेषाने काँग्रेसनिष्ठ उभे राहिले. ‘जाएन्ट किलर’ ठरत विठ्ठल तुपेंनी कलमाडींचा पाडाव केला.

सर्वधर्म समभावावर आधारित आयोगाची स्थापना आवश्यक
पुणे, ३ मार्च/प्रतिनिधी

देशात धर्म, भाषा आणि सांस्कृतिक एकात्मता टिकविण्यासाठी सर्वधर्म समभावावर आधारित आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधवराव गोडबोले यांनी आज व्यक्त केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेला २२ मार्च रोजी एकोणचाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय एकात्मता अभियानांतर्गत राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या विषयावर डॉ. गोडबोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

लढवय्या कॉम्रेड - मदन फडणीस
कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते व उच्च न्यायालयातील वकील कॉम्रेड मदन फडणीस यांचे मुंबई येथे खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कॉम्रेड ‘मदन’ या नावाने ते कामगार चळवळीत परिचित होते.मनमिळावू , मधुर व्यक्तिमत्त्व, पराकष्टी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. सर्वोच्च न्यायालयातील कामगार संघटना आणि कामगारांचे ज्येष्ठ वकील, वृत्तपत्रे, वृत्तसंस्थामधील श्रमिक आणि श्रमिकेतर पत्रकारांच्या किमान वेतन मंडळाचे ते सदस्य होते.मदन यांनी ऐन कि शोरवयातच गिरणी कामगारांच्या क्रांतिकारक आंदोलानात झोकून दिले होते.

मॉलमध्ये चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यास अटक
पुणे, ३ मार्च / प्रतिनिधी

रोख रकमेसह दागिने असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरी केल्याच्या आरोपावरून मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह दोघांना येरवडा पोलिसांनी आज अटक केली. खराडी येथे असलेल्या हाऊसफुल इंटरनॅशनल मॉलमध्ये रविवारी रात्री पावणेअकरा ते सोमवारी सकाळी साडेनऊ या वेळेत हा प्रकार घडला. संदीप रोकडे (वय २५, रा. मुंढवा) आणि राजन काळुराम पोटे (वय २५, रा. सातववाडी) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

‘दहशतवाद रोखण्यास संरक्षण संशोधन हवे’
पुणे, २ मार्च/खास प्रतिनिधी

‘दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सक्षम लष्कराबरोबरच संरक्षण संशोधन संस्थांची (डीआरडीओ) भूमिका महत्त्वाची आहे,’ असे मत लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल नोबल थंबुराज यांनी आज येथे व्यक्त केले. उच्चऊर्जा स्फोटक पदार्थ संशोधन प्रयोगशाळा संस्थेच्या (एचईएमआरएल) शताब्दीनिमित्त सोमवार-मंगळवारी प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन थंबुराज यांच्या हस्ते झाले. संस्थेचे संचालक डॉ. ए. शुभानंद राव, माजी संचालक डॉ. केआरके राव, डॉ. हरिद्वारसिंग आदी या वेळी उपस्थित होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे जनक डॉ. ए. शिवथानू पिल्ले या वेळी अध्यक्षस्थानी होते. बदलत्या युद्धपरिस्थितीचा वेध घेऊन थंबुराज म्हणाले की, ‘पूर्वीप्रमाणे केवळ पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर युद्ध लढली जाणार नाहीत. त्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दशहतवादी गटांकडूनही आता प्रगत साधने वापरण्यात येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लष्कराला मोठय़ा प्रमाणावर ‘डीआरडीओ’वर अवलंबून राहावे लागणार आहे. म्हणूनच ही आव्हाने स्वीकारण्यासाठी ‘डीआरडीओ’नेही सज्ज राहावे’ असे आवाहन थंबुराज यांनी केले.

‘दूर्वाकुर सप्तसूर लिटिल वंडर्स’ची आज महाअंतिम फेरी
पुणे, ३ मार्च/प्रतिनिधी

सारेगम या लोकप्रिय कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित असलेल्या ‘दुर्वाकुर सप्तसूर लिटिल वंडर्स’ या स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या चार मार्च रोजी होणार आहे. कार्यक्रमाचे निर्माता आशिष केसकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सहा ते नऊ दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. महाअंतिम फेरीसाठी ८ ते १० व ११ ते १४ असे स्वतंत्र वयोगट करण्यात आले आहेत. या स्पर्धेत महाअंतिम फेरीसाठी अतिथी परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सकाळचे संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते होईल. ही स्पर्धा पाहण्यासाठी सावली व वानवडी येथील अपंग कल्याणकारी केंद्रातील विशेष मुलांना निमंत्रित केले असून त्यांना कार्यक्रम पाहण्यासाठी पन्नास टक्के सवलत ठेवण्यात आली आहे.

सात बहाई नेत्यांवर आता क्रांतिकारी कोर्टात खटला
पुणे,३ मार्च/प्रतिनिधी

कोणतेही अधिकृत दोषारोप नसतानाही इराण सरकारने कैदेत ठेवलेल्या सात बहाई नेत्यांवर आता क्रांतिकारी कोर्टात खटला चालविला जाणार आहे.अशा पद्धतीच्या पक्षपाती खटल्यास बहाई समुदायाबरोबरच भारतीय जनतेनेही विरोध करावा, असे आवाहन बहाई राष्ट्रीय आध्यात्मिक सभेच्या सदस्या एम.दलाल यांनी आज केला. ईस्त्राईलचे हेर,धार्मिक पावित्र्याचा अपमान व इराणच्या मुस्लिम गणराज्याच्या विरोधी प्रचार केल्याचे बिनबुडाचे आरोप ठेवून सात बहाई नेत्यांना इराण सरकारने कैदेत ठेवले आहे.मुळात या लोकांच्या धर्मावरील श्रद्धेमुळे व त्यांच्याकडूुन होत असलेल्या शांततापूर्ण कार्यामुळेच बहाई समुदायावर असे आरोप ठेवण्यात आले आहेत.या अटकेविषयी भारतातील तेरा प्रसिद्ध व्यक्तींनी एका खुल्या पत्रावर स्वाक्षरी करून चिंता व्यक्त केली आहे.

अप्सरा चित्रपटगृहात दीड लाखाचा अपहार
पुणे, ३ मार्च/ प्रतिनिधी

रोखपाल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने अप्सरा चित्रपटगृहात तिकीट विक्रीतून जमा झालेली दीड लाखाच्या रकमेचा अपहार केला. मे ते सप्टेंबर २००८ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. विलास मणिलाल पारेख (वय ६३, रा. शंकरशेठ कॉलनी) यांनी याबाबत स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शिवाजी किसन मराठे (रा. रॉयल आर्केड, सातारा रस्ता) याच्याविरूद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

विद्यापीठात चंदनचोराला अटक
पुणे, ३ मार्च / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर असलेल्या उद्यानातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरटय़ाला चतु:शंृगी पोलिसांनी अटक केली. त्याचा साथीदार मात्र यावेळी पसार झाला. खंडू मारुती मनाडे (वय २४, रा. मु.पो. पाटकुळ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे.

विकासकामांना कात्री नाही - वळसे पाटील
शिक्रापूर, ३ मार्च/वार्ताहर

शेतक ऱ्यांची कर्ज माफी आणि सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजवणी यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोजा पडला असला तरी विकासकामांना कात्री लावली जाणार नसल्याचे अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. वळसे पाटील शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्याच्या आíथक स्थिती विषयी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्रानेही या आयोगाच्या अभ्यासासाठी एक समिती नियुक्त केली होती. या वेतन आयोगात काही भत्ते देण्याबाबत चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदलने केली. त्यावर ते म्हणाले, ‘‘हे भत्ते देण्याबाबत शासनाकडून कुठलीही टाळाटाळ केली जात नाही. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्य सरकारवर सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा बोजा पडला आहे.

भारतीय संरक्षण कामगार संघाच्या अध्यक्षपदी गणेश टिंगरे
पिंपरी, ३ मार्च / प्रतिनिधी

खडकी येथील दारुगोळा कारखान्यातील भारतीय संरक्षण कामगार संघाच्या अध्यक्षपदी गणेश टिंगरे यांची निवड करण्यात आली. कामगार संघाची वार्षिक सर्वसाधरण सभा आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष संजय सफई व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजय मेनकुदळे उपस्थित होते. या वेळी निवडलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- प्रवीण दाळू (उपाध्यक्ष), राजेंद्र देवकर (कार्याध्यक्ष), चंद्रकांत भेगडे (सरचिटणीस), संभाजी थोरवे (सल्लागार), कैलास भुजबळ (खजिनदार), आणि राजू हांडे (संघटक).