Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

हातमाग विणकरांच्या अत्याधुनिकतेसाठी केंद्राचे पाऊल
दयानंद लिपारे
इचलकरंजी, ३ मार्च

 

जागतिकीकरण व आधुनिकीकरणाच्या रेटय़ामध्ये अवघ्या जगतालाच नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची व सुधारण्याची असोशी लागली असताना पारंपरिक पध्दतीने काम करणाऱ्या हातमाग कामगारांना मागे राहून कसे चालेल ! केंद्र शासनाने याकामी सुधारणेचे पहिले पाऊल टाकताना कच्चा माल, पुरवठा, डिझाईन, तांत्रिक सहकार्य, प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, विपणन अशी एकूणच उत्पादनाची शृंखला विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतली आहे. दयनीय अवस्थेत गुजराण करणाऱ्या हातमाग विणकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
कृषीप्रधान भारतात शेतीनंतर वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी अधिक आहे. वस्त्रोद्योगातही हातमाग विणकरांची संख्या लक्षणीय आहे. पारंपरिक उत्पादने व रोजगार टिकून राहावा यासाठी केंद्र शासन तसेच ज्या राज्यांमध्ये हातमाग अधिक प्रमाणात आहेत अशा राज्यांनी हातमाग उद्योगाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. तथापि विविध समस्यांच्या गुंत्यात अडकलेली हातमाग उद्योग व विणकरांची अवस्था वाईट आहे. हातमागावरील साडय़ा, कपडे, वापरण्याचा कल वाढत चालला असला तरी उद्योगांप्रमाणे हातमाग उद्योगातही उत्पादन घटकापेक्षा दलालांचे फावते.
वस्त्रोद्योगातही अन्य क्षेत्रांमध्ये ज्या प्रमाणात आधुनिकीकरण झाले त्याच्या तुलनेत हातमाग क्षेत्र मागे राहिले आहे. त्यामुळे हातमाग उद्योग व त्याला आकार देणारा विणकर या दोघांचाही अभ्युदय साधण्यासाठी केंद्र शासनाने विशेष प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. हातमाग उद्योगामध्ये आधुनिकीकरण यावे व त्यायोगे विणकरांची कामाची पध्दतही सुधारावी या हेतूने पावले टाकली जात आहेत. अकराव्या पंचवार्षिक योजनेत केंद्र शासनाने ५ प्रकारच्या योजनांचा समावेश करून विणकर व हातमाग उद्योगाचे कल्याण करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता त्यास आर्थिक, तांत्रिक, माहिती, विपणन याबाबतीत पुरेसे सहकार्य करून स्वयंनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
केंद्र शासनाने देशभरातील हातमाग विणकरांची तिसरी खानेसुमारीचे काम चालू ठेवले आहे. उल्लेखनीय स्वरूपाचे ठरणारे हे काम डिसेंबर २००९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वस्त्रोद्योग मंत्रालयाने वर्तवली आहे. या अवधीत हातमाग विणकरांना ओळखपत्र देण्याचा महत्वाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. विणकरांचे निवास, आरोग्य, वेतन, कुटुंब कल्याण, विमा आदी बाबतचे प्रलंबित विषय याद्वारे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
देशातील हातमागातील उत्पादित वस्तूंचे एकाच छताखालील भव्य दालन असण्याची मनीषा लवकरच फलद्रूप होणार आहे. नवी दिल्लीतील जनपथ येथे सुमारे पावणे दोन एकर जागेत नवे विपणन संकुल बांधले जात आहे. ४२ कोटी रुपये खर्चाचे हे संकुल बांधण्याचा प्रारंभ वस्त्रोद्योगमंत्री शंकरसिंग वाघेला यांच्या हस्ते झाला. हातमाग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या हँडलूम हाऊस को ऑप्टे, अ‍ॅपको, सीसीआयसी यासारख्या संस्थांपेक्षा सवाई संकुल करण्याचा प्रयत्न आहे. हातमागावर उत्पादित वस्त्रांचे कायमस्वरूपी विक्री व प्रदर्शनाची सोय इथे होणार असून याचा लाभ समस्त विणकरांना होणार आहे.