Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेमुळे कोकणात सभा-समारंभ थंडावले
रत्नागिरी, ३ मार्च/खास प्रतिनिधी

 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींतर्फे केले जाणारे सभा-समारंभ आजपासून पूर्णपणे थंडावले.
या निवडणुकांची घोषणा अपेक्षितच असल्यामुळे गेल्या आठवडय़ात रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात विविध सार्वजनिक कामांचे भूमिपूजन, पायाभरणी किंवा उद्घाटन समारंभाचा नुसता धडाका उडाला होता. जिल्हा परिषद-नगर परिषदांचे सदस्य, पदाधिकारी, आमदार, पालकमंत्री सुनील तटकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यांसह अनेकांनी त्यामध्ये भाग घेतला. आमदार उदय सामंत आणि राणे यांनी तर गेल्या शनिवारी एकाच दिवसात प्रत्येकी सुमारे अर्धा डझन समारंभ पार पाडत याबाबत जणू एक विक्रमच नोंदविला. येथील मिरकरवाडा बंदरातील गाळ उपसण्याच्या बहुचर्चित कार्यक्रमासाठी तटकरे खासगी विमानाने रत्नागिरी शहरापर्यंत आले, पण खराब हवामानामुळे त्यांचे विमान उतरू शकले नाही. त्यामुळे आमदार सामंत यांनाच सर्व कार्यक्रम उरकावे लागले. राणे यांच्या हस्ते झालेले तंत्रनिकेतन इमारतींचे भूमिपूजन कार्यक्रम विरोधी पक्षांच्या आमदारांना वगळल्याच्या आरोपामुळेच जास्त गाजले.
निवडणूक आचारसंहितेचा भाग म्हणून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हा प्रशासनाने आज ताब्यात घेतली. त्यामुळे आगामी सुमारे दोन महिने या पदाधिकाऱ्यांना खासगी वाहनव्यवस्था करणे भाग पडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व तयारी यापूर्वीच पूर्ण झाली आहे, पण रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे मिळून बनलेल्या या लोकसभा मतदारसंघाचे मुख्य केंद्र रत्नागिरी की सिंधुदुर्ग याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे अनुक्रमे नीलेश राणे व सुरेश प्रभू हे संभाव्य उमेदवार म्हणून हॉट फेव्हरिट आहेत. ते दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्यामुळे मुख्य निवडणूक केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी राजापूर लोकसभा मतदारसंघ आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ स्वतंत्र होते. देशातील मतदारसंघांची फेररचना करताना लोकसंख्या हा मुख्य निकष ठरविण्यात आल्यामुळे हे दोन जिल्हे मिळून एक मतदारसंघ बनला आहे. अशा परिस्थितीत मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात उमेदवारांची कसोटी लागणार आहे.