Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

रत्नागिरीतील रिक्षाचालकांचा संप चिघळण्याची चिन्हे
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, ३ मार्च

 

भाडेकपातीच्या निषेधार्थ येथील विविध रिक्षा संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत आज चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शहरातील रिक्षाचालकांचा संप चिघळण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यामुळे परिवहन विभागातर्फे राज्याच्या विविध भागातील प्रवासी रिक्षांच्या भाडय़ामध्येही कपात केली आहे. त्यानुसार पहिल्या १.६ किलोमीटरच्या टप्प्यासाठी १२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तो परवडणारा नसल्यामुळे एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी १२ रुपये दर आकारण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील विविध रिक्षा संघटनांनी सोमवारपासून १०० टक्के एकजूट दाखवित बेमुदत संप पुकारला. त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली, पण एसटीने रत्नागिरी शहर बसस्थानकावरून शहराच्या विविध भागांमध्ये फेऱ्या वाढविल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
दरम्यान, या संपावर तोडगा काढण्यासाठी रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांच्याशी चर्चा केली, पण त्यातून काही तोडगा निघू शकला नाही. या संदर्भात चर्चेसाठी वरिष्ठ अधिकारी येत्या गुरुवारी (५ मार्च) येथे येणार असल्याचे वृत्त आहे, पण त्याबाबत निश्चिती नसल्यामुळे संप चिघळण्याची चिन्हे आहेत.