Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

वाशिष्ठीचा गाळ पुन्हा तेथेच; पुराची तीव्रता कायम राहण्याचा धोका
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

 

वाशिष्ठी नदीच्या पुराचा फटका शहरवासीयांना बसू नये, यासाठी शासनातर्फे नदीतील गाळ काढण्यास युद्ध पातळीवर प्रारंभ करण्यात आला असला, तरी तो गाळ पुन्हा नदीपात्रातच टाकला जात आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुराचा धोका कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. गाळामुळे या नदीचे पात्र बदलले होते, त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी शहरात घुसते. या पुराला वाशिष्ठी नदीपात्रात साचलेला गाळच जबाबदार असल्याचे निष्पन्न होताच व काही नागरिकांनी याकडे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर हा गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी शासनाने लाखो रुपयांचे अनुदान खर्च केले असून, गेल्या वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू झाली. पावसाळ्यामुळे गतवर्षी गाळ काढण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर यावर्षी मोठय़ा जोमाने करोडो रुपयांच्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने येथील खेर्डी, सती, पेठमाप व गोवळकोट या भागातील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला.
या चारही ठिकाणी युद्धपातळीवर गाळ काढण्याचे काम सुरू असले तरी काढलेला गाळ हा नदीपात्रातच टाकला जात आहे, त्यामुळे येथील संबंधित विभागांतर्फे नदी साफ करीत असल्याचे केवळ बिंबवले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र हा गाळ नदीपात्रातच साचला जात आहे. गतवर्षीही काढलेला गाळ हा नदीकिनारी टाकण्यात आल्याने पावसाळ्यात पुराचा फटका कायम होता. शहरामध्ये ३० ते ३५ टक्के गाळ उपसण्याचे काम झाले असतानाच तेथे दाखल झालेली काही यंत्रणा मात्र राजापूर येथे घाईने हलविण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून गाळ काढण्याची प्रक्रिया मंदावली असून, काही ठिकाणी हे काम बंदही करण्यात आले आहे. वाशिष्ठीतील गाळ काढावा, या मागणीसाठी अनेकांनी जनआंदोलनाचा मार्गही अवलंबला होता. मात्र त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च करत असताना काढलेला गाळ नदीपात्रातच टाकला जात आहे. याकडे मात्र या आंदोलनकर्त्यांनी जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे दिलेले नाही. याशिवाय या कामावर संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नसून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.