Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

सौरऊर्जेवर चालणाऱ्या दूरध्वनी यंत्रणेचा गुहागरात बोजवारा
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

 

ग्रामपंचायतींशी थेट संपर्क साधता यावा यासाठी केंद्र सरकारने सौरऊर्जेवर चालणारी मल्टी अ‍ॅक्सेस रुरल रेडिओ’ (एमएआरआर) दूरध्वनी यंत्रणा पुरवली, मात्र या योजनेचा गुहागर तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असून, तो बंद पडल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
केंद्राने ही योजना बहुसंख्य ग्रामपंचायतींना मोफत दिली होती. यामध्ये ५० व्होल्टेजच्या दोन बॅटऱ्या, दूरध्वनी संच, सौरऊर्जेची यंत्रणा देण्यात आली होती. त्याचबरोबर ग्रामपंचायतींच्या कार्यालयाशेजारी टॉवरही उभे करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायतीवर यासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्ची करण्यात आले. ही यंत्रणा बसविल्यावर काही ठिकाणी ती चार-पाच महिने चालली. आज ही यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या योजनेंतर्गत देण्यात आलेल्या बॅटऱ्या बाद झाल्या आहेत. टॉवर गंजलेले आहेत. शासकीय यंत्रणेने पाठरपुरावा न केल्याने योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींना ही यंत्रणा पुरविण्यात आली होती. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. तालुक्यातील गिमवी, झोंबडी, अडूर, कारूळ, कुडली, अंजनवेल, वेलदूर, मुंढर खुर्द, आडी वळवण, मार्गताम्हाने आदी ग्रामपंचायतींना या योजनेचा लाभ मिळाला होता, परंतु आज एकही ग्रामपंचायतीमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित नाही. काही सरंपचांनी तर ही योजना आली तेव्हा आपणाला काहीच कल्पना नव्हती, असे सांगितले. संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीला योजना ताब्यात घेण्यासाठी कळविले होते, तर काही सरपंचांनी या योजनेखाली देण्यात आलेली यंत्रणा दुय्यम दर्जाची होती, असा आरोप केला. जिल्ह्यात ही यंत्रणा देताना सांगलीतील एका कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, परंतु यंत्रणा बंद पडल्यावर कोणीही कंपनीचा प्रतिनिधी दुरुस्तीसाठी आला नाही. यंत्रणेवर झालेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचीच उधळपट्टी होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.