Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आरोग्य महामेळाव्यातून चिपळूणच्या पंचायत समिती सदस्यांना डावलले
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत डीबीजे महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या आरोग्य महामेळाव्यातून येथील पंचायत समिती सदस्यांनाच डावलण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा जाब संतप्त सदस्यांकडून ६ मार्च रोजी होणाऱ्या मासिक सभेत विचारण्यात येणार असल्याने ही सभा गाजण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. चिपळूणमध्ये हा मेळावा पहिल्यांदाच होणार असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी आयोजक प्रयत्न करीत होते. या मेळाव्याचे निमंत्रण देण्यापासून ते पार पडेपर्यंतची सर्व जबाबदारी येथील काही आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती, मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे सुमारे पाच हजार रुग्णांचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवणाऱ्या या आयोजकांनी ज्या भागात हा मेळावा आयोजित केला, त्या भागातील पंचायत समितीलाच विश्वासात घेतले गेले नाही. सभापती बाळकृष्ण जाधव व उपसभापती सूर्यकांत खेतले यांनी या विरोधात कोणतीही हरकत घेऊ नये, यासाठी शेवटी या मेळाव्याचे निमंत्रण देऊन त्यांना तात्पुरते खुश करण्यात आले, परंतु विविध गावांचे प्रतिनिधित्व करणारे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांना या मेळाव्याचे साधे निमंत्रणही आयोजकांनी दिले नाही. या मेळाव्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातील ५० तज्ज्ञ डॉक्टर्स, जिल्हा व तालुका कर्मचारी, नर्सचा ताफा डीबीजेच्या मैदानावर अवतरला होता. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाचे सुमारे सहा लाख रुपये खर्च करण्यात आले, मात्र रुग्णांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याने शासनाचा खर्च वाया तर गेलाच, याशिवाय आयोजकांचे नियोजन किती ढिसाळ होते याची प्रचिती आली. शासनाने हा मेळावा राजकारणविरहित स्वरूपाचा आयोजित केला होता. मात्र व्यासपीठावर अधिकतर मान्यवर हे शिवसेनेचेच असल्याने व या कार्यक्रमात येथील सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने हा मेळावा नक्की कोणाचा, असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांना पडला होता. त्यामुळे आमंत्रण न मिळालेल्या काही सदस्यांनी त्याकडे पाठच फिरविली.