Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

शिवाजीराव तुपे यांच्याकडून निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिक
संगमेश्वर, ३ मार्च/वार्ताहर

 

सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या १६ व्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या निमित्ताने कलातपस्वी शिवाजीराव तुपे यांनी कलाविद्यार्थी व कलारसिक यांच्यासाठी पोस्टर कलर माध्यमात कोकणातील घरांचे सुंदर असे निसर्गचित्रांचे प्रात्यक्षिक सादर केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दररोज किमान दहा पेन्सिल रेखाटने करावीत. जेणे करून पेन्सिल रेखाटने करताना यथार्थ दर्शनाचा, छाया प्रकाशाचा, रंगसंगतीचा अभ्यास करता येईल. हे सर्व करत असताना विद्यार्थ्यांनी समोरील दृश्याचे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने बारकाव्यासहित निरीक्षण करणे जरुरीचे आहे. हे सर्व साध्य झाल्यानंतर पूर्वी केलेल्या रेखाटनांपैकी काही चित्रे रंगवावीत. ही चित्रे रंगवताना रंगमाध्यमाच्या शक्यतेचा अनुभव घ्यावा.
चित्रकार अनिल अभंगे यांनीही जलरंगातील व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सादर केले. हे प्रात्यक्षिक सादर करताना जलरंगातील विविध प्रकारच्या पारदर्शकपणाच्या किमया त्यांनी कलारसिक व विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. व्यक्तिचित्रणासाठी मॉडेल म्हणून पूर्वा प्रशांत निकम यांनी सहकार्य केले. चित्रकार अभंगे यांनी केवळ एका तासात हे व्यक्तिचित्र पूर्ण केले.
या दोन्ही प्रात्यक्षिकांच्या वेळी छायाचित्रकार सदानंद जाधव, चित्रकार प्रकाश राजे शिर्के, कलाशिक्षक उद्धव तोडकर, कलाशिक्षक टी. एस. पाटील, आर. एन. कुंभार, चित्रकर्ती मुक्ता बालिगा, माणिक यादव, विशाखा कदम, अमित सुर्वे, सागर पवार, शिल्पकार रोहन पवार, रुपेश सुर्वे, कलाविद्यार्थी व कलारसिक बहुसंख्येने उपस्थित होते.