Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

लाचखोर तलाठय़ाची जामिनावर मुक्तता
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

 

कूळ मुखत्यारपत्राची नोंद व सातबारा उताऱ्यावरील नोंदी बदलून देण्यासाठी शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना मंडणगड तालुक्यातील दाभटचे तलाठी अशोक पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक अरविंद सावंत व त्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, आरोपीस १५ हजार रुपयांच्या जामिनावर न्यायालयाने मुक्त केले आहे.
वळंजू येथील रियाज इस्माईल खलपे यांनी मौजे दाभट येथील शेतकरी हमीद वासीम सावंत यांच्याकडून त्यांच्या स्वत:च्या जागेचे कूळ मुखत्यारपत्र आपल्या नावे करून घेतले. त्यानंतर ते पत्र प्रांत कार्यालय दापोली येथे नोंदणी करून दाभट येथे तलाठी पवार यांच्या कार्यालयात जमा केले. त्यानंतर पवार यांनी हे पत्र जमा करून व त्याची पोहोच देण्यास अनेक दिवस टाळाटाळ केली. यावेळी शेतकरी खलपे यांनी सतत याबाबत संपर्क साधला असता तलाठी कार्यालयातील कोतवालाने या कूळ मुखत्यारपत्र केलेल्या जामिनावर पीकपाणी लावण्याकरिता दुसऱ्या कुळाचा अर्ज आल्याचे खलपे यांना सांगितले. मात्र पुन्हा खलपे यांनी दाभट येथे पवार यांच्याकडे याबाबत माहिती मागितली, परंतु त्यांनी आपल्याला माहिती हवी असेल तर तहसील कार्यालयाकडून नक्कल प्रतीत माहिती मिळण्याकरिता परवानगी आदेश आणण्याचे सांगितले.
खलपे यांनी जमा झालेल्या कूळ मुखत्यारपत्राची पोहोच घेतली व संबंधित जागेचे सात-बारा उतारे घेतले. मात्र पूर्वीपासून निरंक असणाऱ्या या पत्रातील जमिनीच्या सात-बारा उताऱ्यांवर नसलेल्या झाडांची नोंद केली व पुन्हा ही नोंद काढून टाकण्याकरिता खलपे यांनी मूळ जमीनमालक सावंत यांना मुंबईवरून बोलावून घेतले व तलाठय़ाशी संपर्क साधला. तलाठी पवार यांनी उताऱ्यावरील नोंद करण्याकरिता खलपे यांच्याकडे सात हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार खलपे यांनी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तलाठय़ाशी ठरल्याप्रमाणे सात हजारांपैकी पाच हजार रुपये तलाठी पवार यांना देण्याचे ठरल्याने खलपे कार्यालयात गेले. त्यावेळी अगोदरच दबा धरून बसलेल्या या लाचलुचपत पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. अधिक तपास सुरू आहे.