Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

अलिबाग भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील रिक्त जागा शिक्षकांच्या मुळावर!
पाली, ३ मार्च/वार्ताहर

 

जिल्ह्यातील सुमारे २५० माध्यमिक शाळा व ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील जवळपास सात हजार शिक्षकांच्या वर्तमान व भविष्यकाळाशी निगडित असलेले सर्वात महत्त्वाचे कार्यालय म्हणजे भविष्यनिर्वाह निधी, परंतु सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या किंवा बदलीनंतर जागा न भरल्यामुळे अलिबाग भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होऊन सात झाली आहे. रिक्त असलेल्या पदांमध्ये कार्यालयाचे प्रमुख पद अधीक्षक, वरिष्ठ लिपिक नाईक व मुख्य लेखनिक सतत रजेवर असल्याने तेही रिक्त असल्यासारखे आहे. उर्वरित सात कर्मचारी वर्गामध्ये एका क्लार्ककडे पेण येथील सीनिअर ऑडिटरचा चार्च, तर दुसऱ्या लेखनिकाकडे माणगाव येथील डी. एड. कॉलेजचे काम असल्याने पेन्शन, भविष्यनिर्वाह निधीच्या जमा पावत्या, कर्ज, प्रवास देयके इ. कामांचा सावळा गोंधळ सुरू असून, येणाऱ्या शिक्षकांच्या समस्या न सोडविता आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा दोष नसतानाही संताप ऐकून घ्यावा लागतो. या कार्यालयातील सावळ्यागोंधळाचा बळी ठरली आहेत आई-वडील नसलेली तीन मुले. खालापूर तालुक्यात वाशिवली येथे डॉ. पारनेर महाराज विद्यालयात मार्च १९९४ पासून शिपाईपदावर कार्यरत असणारे गोपाळ माणिकराव अहिरराव यांचे डिसें. २००५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पत्नीचेही आधीच निधन झाले असल्यामुळे या भावंडांवर दु:खाचा डोंगर कोसळला व पुढील भवितव्य धुसर झाले. जगण्यासाठी वडिलांच्या पेन्शनचाच आधार म्हणून शाळा व जि. प. शिक्षणखाते आणि भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात फेरे मारत २००९ साल उजाडून मध्यावर आले, परंतु अजूनही पेन्शन मिळत नसल्याचे पाहून उपासमारीला कंटाळून आता अमोल गोपाळ आहेरराव (२६) याने आमरण उपोषण करण्याचा विचार पत्रकारांजवळ बोलून दाखविला. त्याच्यापेक्षा लहान असलेल्या आशीष व बहीण अर्चना यांचेही आयुष्य या पेन्शनवर अवलंबून आहे.
या पेन्शनला विलंब का होत आहे, याबद्दल शाळेमध्ये चौकशी केली असता शाळेकडून प्रस्तावाबरोबर सेवापुस्तिका व इतर आवश्यक कागदपत्रे वेळीच शिक्षण खात्याकडे पाठविली आहेत. वेळोवेळी प्रस्तावांमधून निघणाऱ्या त्रुटीबाबतही सविस्तर खुलासा करून कागदपत्रे पुन्हा नव्याने पाठविली आहेत, तर भविष्यनिर्वाह निधीकडे चौकशी केली असता पेण येथून हे कार्यालय अलिबाग येथे स्थलांतरित झाल्याच्या काळात आणलेल्या सर्व कागदपत्रांमध्ये त्यांचीच फाईल सापडत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ही फाईल शोधण्यासाठी कार्यालयाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पुन्हा पेन्शन केस लांबणीवर पडत आहे. फाईल गहाळ होणे ही गंभीर बाब असून, त्यातील मूळ कागदपत्रे हरवल्याने पेन्शन हातात पडणार की नाही, याबाबतीत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यालयातील कर्मचारी वर्गाची संख्या अपुरी आहे, हे जरी व्यावहारिक मान्य केले, तरी फाईल हरविणे किंवा न सापडणे हा कामाबद्दलचा निष्काळजीपणा कोणीही आपल्या माथी घेत नाही. कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचेच पद रिक्त आहे, त्यामुळे अनेक शिक्षकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. बऱ्याच शाळांच्या मागील तीन वर्षांंच्या भविष्यनिर्वाह निधीच्या जमा पावत्या या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नाहीत. जिल्ह्यातील सात हजार शिक्षकांचा महिन्याचा पगार नऊ कोटी रुपये होतो. त्यातून भ. नि. निधीपोटी दरमहा ९३ लाख रुपये जमा होतात. हा निधी दरमहा त्या शिक्षकांच्या खात्यात जमा करून त्यावर आठ टक्के व्याजदर द्यावा लागतो. परंतु गेल्या तीन वर्षांंपासून ही रक्कमही शिक्षकांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यामुळे शिक्षकांना जमा पावत्याही दिल्या गेल्या नाहीत.