Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

थोरातांच्या कलानेच जिल्हाध्यक्ष निवडा!
प्रदेशाध्यक्षांकडे विखेंबद्दल तक्रारी
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदिरा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद चांगलाच रंगू लागला आहे. खासदार बाळासाहेब विखे यांनी काल (सोमवारी) पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेतल्यानंतर आज थोरातसमर्थकांनी थेट मुंबईला जाऊन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची या संदर्भात भेट घेतली. विखेंवर टीका करतानाच कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊनच जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.
पूर्वीचे जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी ज्येष्ठ नेते आमदार गोविंदराव आदिक यांच्यासमवेत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सध्या हे पद रिक्त आहे. त्यासाठी थोरात-विखे संघर्ष सुरू झाला आहे. थोरात गटाकडून डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, ज्ञानदेव वाफारे; तर विखे गटाकडून माजी आमदार नंदकुमार झावरे, रामदास धुमाळ आदींची नावे चर्चेत आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा थोरातसमर्थक धनंजय जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांसह पक्षाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला. त्यानंतर काल खासदार विखे यांनी स्वतच येथे येऊन कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
सलग दोन दिवसांच्या या नाटय़मय घडामोडीनंतर थोरातसमर्थकांनी आज थेट मुंबई गाठली. माणिकराव ठाकरे यांना त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार रात्री उशिरा मुंबईत ठाकरे यांनी थोरातसमर्थकांशी चर्चा केली. मंत्री थोरात यांना विश्वासात घेऊनच जिल्हाध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी करतानाच या गटाने विखे पिता-पुत्रांबाबत अनेक तक्रारी केल्या. संगमनेर नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध निवडणुकांमध्ये विखेंनी पक्षाऐवजी भाजप-सेनेच्या लोकांना ताकद दिली. जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे गेल्यास लोकसभेच्याच निवडणुकीत त्याचे विपरित परिणाम दिसतील, असे थोरातसमर्थकांनी स्पष्ट केल्याचे समजते. सर्वाना विश्वासात घेऊनच नगरचा जिल्हाध्यक्ष निवडू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. या शिष्टमंडळात डॉ. सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, जि. प. सभापती बाळासाहेब गिरमकर, पांडुरंग खेडकर, श्रीगोंदे कारखान्याचे संचालक राजेंद्र नागवडे यांच्यासह संगमनेर, अकोले, नगर, पाथर्डी, कर्जत येथील तालुकाध्यक्ष, तसेच नगरच्या शहराध्यक्षांचा समावेश होता.