Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मिरजगावला ५०० मुलांना विषबाधा
मिरजगाव, ३ मार्च/वार्ताहर

 

गावातील २ ते १० वयोगटाच्या सुमारे ५०० मुलांना आज कुल्फी खाल्ल्याने विषबाधा झाली. सर्वच मुलांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास झाल्याने विविध दवाखाने-रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. आशिष जगधने याची प्रकृती असल्याने त्याला नगरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठय़ा संख्येने मुलांवर सलाईन व इंजेक्शन देऊन उपचार सुरू होते. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा संख्येने लहान मुलांना विषबाधा होण्याच्या या प्रकारामुळे गावात चांगलीच घबराट पसरली आहे.
नेहमीप्रमाणे रोजचा कुल्फीवाला येताच गावातील अनेक मुलांनी टप्प्या-टप्प्याने त्याच्याकडून कुल्फी खरेदी करून खाल्ली. परंतु काही वेळातच या मुलांना कुल्फीमुळे उलटय़ा, जुलाबाचा त्रास सुरू झाला. दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान एकदम मुलांना त्रास सुरू झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत गावातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या मुलांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. सरपंच डॉ. शुभांगी गोरे, डॉ. विलास कवळे, डॉ. संजय कंक, डॉ. अशोक काळदाते आदी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने दाखल केलेल्या मुलांवर वेळीच उपचार सुरू करण्यात आले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी उपचार मिळू न शकल्याने गरीब पालकांना आपल्या मुलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे लागले.
डॉ. कवळे व डॉ. गोरे यांनी जि. प. सदस्य लता गोरखे व कर्जत पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी साळुंखे यांचे या बाबत लक्ष वेधले. त्यानंतर जि. प.चे उपाध्यक्ष सुजित झावरे यांनाही कळविण्यात आले. कर्जतहून संध्याकाळी आरोग्य पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु पथक येईपर्यंत बहुतेक मुलांवर उपचार करण्यात आले होते. मुलांची प्रकृती सुधारत आहे.
आरोग्य केंद्रात दीडशेवर मुले सलाईनवर
दरम्यान, चापडगाव येथील आरोग्य केंद्रातील डॉ. जुबेरे येथील आरोग्य केंद्रात दाखल झाल्याचे समजताच उलटय़ा-जुलाबाचा त्रास झालेल्या अनेक मुलांची या केंद्रात उपचारासाठी रीघ लागली. येथील डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास कवळे यांच्यासह पंढरीनाथ गोरे, सुभाष सूर्यवंशी, संजय कोल्हे, संजय कंक, चंद्रकांत कोरडे, शिवाजी पाबळे, रामदास सूर्यवंशी, अनिल मापारी आदी डॉक्टरांनी मानवतेच्या भूमिकेतून आरोग्य केंद्रात येऊन मुलांवर सलाईन, इंजेक्शन असे उपचार सुरू केले. शंभर-सव्वाशे मुलांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले.