Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

प्रचारसभेसाठी शाळेचे मैदान वापरण्यास मनाई!
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

 

प्रचारासाठी आता कोणत्याही शाळेचे मैदान किंवा इमारतीचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली आहे. शाळेच्या मैदानावरील प्रचारसभांनाही बंदी घालण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी सूचना दिल्या.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मनपा उपायुक्त अच्युत हांगे, तसेच सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्य सरकारी कार्यालयांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना डॉ. अन्बलगन यांनी आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्य़ात प्रभावीपणे केली जाईल, असे सांगितले. जिल्हा व तालुकास्तरावर आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ म्हणून ग्रामीण भाग, मनपा क्षेत्र व नगरपालिका क्षेत्रात स्वतंत्र पथक असेल. या पथकांचे प्रमुख अनुक्रमे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा उपायुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असतील.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारी अंमलबजावणी कक्षाकडे आल्या की त्यांच्याकडून त्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’कडे पाठवल्या जातील. जिल्हास्तरावरील अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी व तालुकास्तरावरील पथकप्रमुख उपजिल्हाधिकारी असतील. य्९ाा सर्व कक्षांना आचारसंहिता पालनाबाबत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. अन्बलगन यांनी सांगितले.
याशिवाय सार्वजनिक जागा, भिंतीवर लिहिणे, प्रचारफलक लावणे, कोणतेही प्रचारसाहित्य जाहीरपणे वापरात आणताना त्याची निवडणूक अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे या राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी नेहमीच बंधनकारक असलेल्या गोष्टींवरही लक्ष ठेवले जाणार आहे. सरकारी संस्था व अधिकारी यांनाही सरकारी वाहन, इमारत, विश्रामगृह यांचा गैरवापर होऊ न देण्याबाबत कळवण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे तत्काळ कारवाई केली जाईल. राजकीय पक्षांना या सर्व
नियमांची माहिती व्हावी, यासाठी त्यांचीही लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी
दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची वाहने व त्यांचे कार्यालय ताब्यात न घेता फक्त सरकारी कामासाठी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. वाहनाचा वापर पदाधिकाऱ्यांना निवासस्थान ते कार्यालय असाच करता येईल. वाहनाच्या गैरवापराविषयी कसलीही तक्रार आल्यास किंवा निवडणूक विभागाला आवश्यक वाटल्यास वाहने ताब्यात घेण्याची कारवाई केली जाईल, असे सोनवणे यांनी सांगितले.
दोन्ही मतदारसंघात २८ हजार ३८६ नावे दुबार आहेत. त्याबाबतची कार्यवाही सुरू असून, आठच दिवसांत या दुबार नावांमधील कोणते तरी एकच नाव ठेवून दुसरे रद्द केले जाईल, अशी माहिती सोनवणे यांनी दिली.

प्रचारसभांसाठी मोठी अडचण
शाळांची इमारत किंवा मैदान प्रचारासाठी वापरण्यावर प्रतिबंध आल्याने किमान नगरमध्ये तरी राजकीय पक्षांच्या प्रचारसभांसाठी मोठी अडचण होणार आहे. गांधी मैदान व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मैदान येथे प्रचारसभा होत. यातील गांधी मैदान हेही मरकडेय शाळेचे मैदानच असल्याने ते बाद होते. त्यामुळे जाहीर सभेसाठी नगरमध्ये मैदानच राहत नाही.

जिल्ह्य़ात एकूण मतदार - २८ लाख २५ हजार
शिर्डी लोकसभा मतदारसंघ - १३ लाख १४ हजार
नगर लोकसभा मतदारसंघ - १५ लाख १४ हजार ९०६
मतदान केंद्रे - ३ हजार ४४२
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार - नगर लोकसभा मतदारसंघ - शेवगाव - २ लाख ७२ हजार ५४०, राहुरी - २ लाख ३२ हजार २६२, पारनेर - २ लाख ५० हजार ५८१, नगर शहर - २ लाख ५१ हजार ९५, श्रीगोंदे - २ लाख ५२ हजार ४९३, कर्जत-जामखेड - २ लाख ५४ हजार ९३५.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ - अकोले - २ लाख १ हजार ४४६, संगमनेर - २ लाख २० हजार ८३०, शिर्डी - २ लाख ४ हजार ९८९, कोपरगाव - २ लाख २० हजार ४६१, श्रीरामपूर - २ लाख ४२ हजार ५१८ आणि नेवासे - २ लाख २३ हजार ४३२.