Leading International Marathi News Daily
बुधवार, ४ मार्च २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘रयत’च्या शाळांमध्ये जूनपासून सेमी इंग्लिश झ्र् कडू
नगर, ३ मार्च/वार्ताहर

 

रयत शिक्षण संस्थेची सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये संगणकीकरणाने जोडतानाच जूनपासून सर्व शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू करणार असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू यांनी केले.
वाळकी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित केलेल्या संस्थेच्या उत्तर विभागीय मंडळाच्या वार्षिक सभेत श्री. कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव माने होते. या वेळी संस्थेचे समन्वय समिती सदस्य दादापाटील शेळके, आमदार अशोक काळे, मीनाताई जगधने, बाबासाहेब भोस, बापूसाहेब शिंदे, संस्थेचे सहसचिव श्रीरंग झावरे, गुंडाप्पा खोत, कारभारी आगवण, पद्माकर कुदळे उपस्थित होते.
कडू म्हणाले की, शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. या विचारानुसार संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, एन. डी. पाटील व चेअरमन रावसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रयत’ने वेगळे धोरण हाती घेतले आहे. ‘रयत’च्या सर्व ४४१ माध्यमिक व ४१ महाविद्यालयांना ‘ई-मेल’ आयडी देऊन सर्व कामकाज इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर केले जाईल. संस्थेशी सर्व शाळा संगणकीकरणाने संलग्न ठेऊन प्रशासकीय कामात गतिमानता आणली जाईल.
‘रयत’शी सर्वानी एकनिष्ठ असणे आवश्यक आहे. संस्थेत सेवा करून संस्था हिताविरोधी भूमिका घेणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री. कडू यांनी दिला.
या वेळी सर्वश्री. दादापाटील शेळके, बाबासाहेब भोस, श्रीमती मीनाताई जगधने, श्रीरंग झावरे, गुंडाप्पा खोत आदींनी मार्गदर्शन केले.