Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

राज्य

हातमाग विणकरांच्या अत्याधुनिकतेसाठी केंद्राचे पाऊल
दयानंद लिपारे
इचलकरंजी, ३ मार्च

जागतिकीकरण व आधुनिकीकरणाच्या रेटय़ामध्ये अवघ्या जगतालाच नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची व सुधारण्याची असोशी लागली असताना पारंपरिक पध्दतीने काम करणाऱ्या हातमाग कामगारांना मागे राहून कसे चालेल ! केंद्र शासनाने याकामी सुधारणेचे पहिले पाऊल टाकताना कच्चा माल, पुरवठा, डिझाईन, तांत्रिक सहकार्य, प्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, विपणन अशी एकूणच उत्पादनाची शृंखला विकसित करण्याचा कार्यक्रम हाती घेतली आहे. दयनीय अवस्थेत गुजराण करणाऱ्या हातमाग विणकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

खोपोली नगरपालिकेचा ५७ कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प मंजूर
खोपोली, ३ मार्च/वार्ताहर

खोपोली नगरपालिकेत पाणीपुरवठा, शहर परिवहन, दिवाबत्ती, आरोग्य इत्यादी सेवा वर्षांनुवर्षे तोटय़ात चालू आहेत. त्या स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने खर्चात काटकसर करून उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे, असा स्पष्ट निर्वाळा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालयाने दिलेला असताना त्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना न करताच कौन्सिलने २००९-२०१० चा ५७ कोटी २४ लाख ८५ हजार २२० रुपये अपेक्षित उत्पन्न व ५६ कोटी ९६ लाख ८७ हजार २०० अपेक्षित खर्चाचा व कोणतीही दरवाढ न सुचविलेला २७ लाख ९८ हजार २२० रुपये शिल्लक दर्शविणारा अर्थसंकल्प आवाजी मतानी मंजूर केला.

आचारसंहितेमुळे कोकणात सभा-समारंभ थंडावले
रत्नागिरी, ३ मार्च/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींतर्फे केले जाणारे सभा-समारंभ आजपासून पूर्णपणे थंडावले.
या निवडणुकांची घोषणा अपेक्षितच असल्यामुळे गेल्या आठवडय़ात रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात विविध सार्वजनिक कामांचे भूमिपूजन, पायाभरणी किंवा उद्घाटन समारंभाचा नुसता धडाका उडाला होता. जिल्हा परिषद-नगर परिषदांचे सदस्य, पदाधिकारी, आमदार, पालकमंत्री सुनील तटकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यांसह अनेकांनी त्यामध्ये भाग घेतला.

थोरातांच्या कलानेच जिल्हाध्यक्ष निवडा!
प्रदेशाध्यक्षांकडे विखेंबद्दल तक्रारी
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इंदिरा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद चांगलाच रंगू लागला आहे. खासदार बाळासाहेब विखे यांनी काल (सोमवारी) पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेतल्यानंतर आज थोरातसमर्थकांनी थेट मुंबईला जाऊन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची या संदर्भात भेट घेतली. विखेंवर टीका करतानाच कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊनच जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केल्याचे समजते.

मिरजगावला ५०० मुलांना विषबाधा
मिरजगाव, ३ मार्च/वार्ताहर

गावातील २ ते १० वयोगटाच्या सुमारे ५०० मुलांना आज कुल्फी खाल्ल्याने विषबाधा झाली. सर्वच मुलांना उलटय़ा, जुलाबाचा त्रास झाल्याने विविध दवाखाने-रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. आशिष जगधने याची प्रकृती असल्याने त्याला नगरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठय़ा संख्येने मुलांवर सलाईन व इंजेक्शन देऊन उपचार सुरू होते. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा संख्येने लहान मुलांना विषबाधा होण्याच्या या प्रकारामुळे गावात चांगलीच घबराट पसरली आहे.

प्रचारसभेसाठी शाळेचे मैदान वापरण्यास मनाई!
नगर, ३ मार्च/प्रतिनिधी

प्रचारासाठी आता कोणत्याही शाळेचे मैदान किंवा इमारतीचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने सक्त मनाई केली आहे. शाळेच्या मैदानावरील प्रचारसभांनाही बंदी घालण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी सर्व सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी सूचना दिल्या.

ढोरजळगावला चोरटय़ांनी तीन दुकाने फोडली
शेवगाव, ३ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील ढोरजळगाव येथे चोरटय़ांनी तीन दुकाने फोडून सुमारे ५२ हजारांचा ऐवज लांबविला. निंबेनांदूर येथून एक मोटारसायकल पळवून नेल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हा प्रकार काल रात्री १० वाजता घडला. ढोरजळगाव येथे चौकात असणारे अरुण विक्रम उकिरडे यांचे सत्यम मेडिकलचे शटर कटावणीने उचकटून चोरटय़ांनी २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यांच्या शेजारीच असणारे सुभाष पालवे यांच्या ममता मेडिकलची याच पद्धतीने चोरी करून १८ हजार १०० रुपये, तर ज्ञानेश्वर फसले यांच्या यशोदीप जनरल स्टोअर्समधून ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला. याच रात्री ढोरजळगावशेजारी निंबेनांदूर या गावातून कृष्णा मुरलीधर बुधवंत यांची मोटारसायकल (एमएच १६ व्ही ५८३२) चोरून नेण्यात आली.

लोकसभेचा मीच उमेदवार, कामाला लागा - राजळे
पाथर्डी, ३ मार्च/वार्ताहर
लोकसभेची निवडणूक आपण लढविणारच असून, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश आमदार राजीव राजळे यांनी दिला.दत्त दिगंबर पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक प्रसन्नकुमार शेवाळे होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रथमच राजळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीररित्या कामाला लागण्याचे आदेश दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला.या वेळी व्यासपीठावर जि. प. सदस्य शिवशंकर राजळे, सभापती काकासाहेब शिंदे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, बाजार समितीचे सभापती भुजंगराव गाडे, नगरचे नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते.श्री. राजळे म्हणाले की, लोकसभेसाठी नगरमधून उमेदवारी करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावा. ही लढाई मोठी असून, दक्षिणेच्या स्वारीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. मतदारसंघात आठ तालुके असून, कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रचार करावा. राजकारणात जसा जनतेला विश्वास व सेवा द्यावी लागते, तसेच पतसंस्थेच्या बाबतीतही आहे.

धुळे : काटेकोर आचारसंहितेवर भर
धुळे, ३ मार्च / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात आली असून राजकीय भित्तीपत्रके, घोषणापत्र काढून घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, सप्टेंबर अखेर सर्वाना ओळखपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी दिली. जिल्ह्य़ात अद्यापही मतदार नोंदणी आणि ओळखपत्रासाठी छायाचित्रे काढण्याची मोहीम सुरू आहे. त्यासाठी यापूर्वीच तारीख निहाय कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार मतदारांनी संबंधित केंद्रावर जावून आपली छायाचित्रे काढून घ्यावीत असेही कळविण्यात आले आहे. जिल्ह्य़ात निवडणुकीची आचार संहिता लागू होताच महापालिका प्रशासनाने राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांसह साऱ्यांसाठीच आदर्श आचारसंहितेबाबत माहिती देवून आवाहन केले आहे. चिन्ह, वैयक्तिक जमीन, इमारती, भिंतीचा निवडणूक प्रचारासाठी विना परवानगी वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर प्रचार केल्यास सार्वजनिक मालमत्तानुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ व महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपण कायदा १९९५ नुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हा दखल पात्र गुन्हा असल्याचे स्पष्ट करत संबंधितांवर गुन्हा सिद्ध झाल्यास तीन महिने कैद अथवा दोन हजार रुपये दंड अथवा दोन्हीही प्रकारची शिक्षा होवू शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गावक ऱ्यांनाही पाणीटंचाई आराखडा बनवण्याची संधी
धुळे, ३ मार्च / वार्ताहर

संभाव्य पाणी टंचाईशी मुकाबला करण्यासााठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पाणी टंचाई निवारणाचा आराखडा तयार झाला असला तरी शासनाच्या नव्या तरतुदीनुसार गावकऱ्यांनाही आपल्या गावाचा स्वतंत्र पाणी टंचाई आराखडा तयार करता येवू शकणार आहे. असे काही प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होत असल्याची माहिती यंत्रणेतर्फे देण्यात आली. जिल्ह्य़ातील संभाव्य पाणी टंचाईशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने ८७ लाखाची तरतूद करून पाणी टंचाईचा आराखडा तयार केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील तापी नदीवर तयार करण्यात आलेल्या सुलवाडे बॅरेजमधून ज्या गावांना पाणी मिळणार आहे, त्या गावांसाठी स्वतंत्र योजना देण्याचा प्रस्ताव आल्यास त्याचाही जिल्हा प्रशासन विचार करणार आहे. अशा गावांसाठी स्वतंत्र योजना देता येवू शकेल काय, या संदर्भात निर्णय होणार आहे. दरम्यान, ग्रामसभा घेवून गावक ऱ्यांनी अशा पाणी टंचाई आराखडय़ाला मंजुरी द्यावयाची आहे. भूजल विभागातर्फे अशा गावांमध्ये सर्वेक्षण होईल आणि त्यानंतर संभाव्य पाणी टंचाईवर उपाय योजना होवू शकेल. तूर्त प्रशासनाने विविध भागात विहीरी अधिग्रहण करण्याबरोबरच पाणी टंचाई असलेल्या भागात ५०० मीटरवर (परिसरात) विहीर खोदण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

मोटार अपघातग्रस्त झाल्याने चंदन तस्करी उघड
जळगाव, ३ मार्च / वार्ताहर

जिल्ह्य़ाच्या पारोळा-अमळनेर रस्त्यावर एक मोटार अपघातग्रस्त झाल्यामुळे तेथे पोहचलेल्या पोलीस पथकाला या मोटारीत चंदनाची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी वन अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आल्यावर चंदन तस्करीची खात्री पटताच चालकावर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. पारोळा-अमळनेर रस्त्यावरून एक मोटार भरधाव वेगाने जात असतानाच चालकाचा ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघाताची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातगस्त गाडीची पाहणी करीत असताना त्यात पोलिसांना लाकूडफाटा आढळून आल्याने त्यांनी वनअधिकाऱ्यांना पाचारण केले. परीक्षण करता ते लाकूड चंदनाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून या वाहनातून चंदनाची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघड झाल्याने मग पोलिसांनी तपासाची दिशाच बदलविली. या प्रकरणी चालक शकील मेहमूद पठाण यास अटक करण्यात आली असून हजारो रुपये किंमतीचे चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. आरोपी कन्नड येथील राहणारा असून सिल्लोड तालुक्यातील भगडी येथून पारोळा मार्गे अमळनेर येथे चंदनाची चोरटी वाहतूक करण्यात येत होती असे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे चंदन तस्करांची साखळी उघड होण्याचा अंदाज आहे.

रत्नागिरी गॅस प्रकल्प नाफ्ता सुरक्षेसाठी केवळ दोनच रक्षक
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

गुहागर तालुक्यातील बहुचर्चित रत्नागिरी पॉवर गॅस कंपनीच्या नाफ्ता टाकीच्या सुरक्षिततेसाठी फक्त दोनच सुरक्षारक्षक कार्यरत असून, येथील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंपनीमधील ज्या ठिकाणी समुद्राच्या आत १० कि.मी. अंतरावर नाफ्ता गॅस ठेवण्याचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी ओमानवरून येणारा गॅस ठेवला जातो. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची समजली जाते. याठिकाणी सायंकाळी सहापासून सुरक्षिततेसाठी दोन कर्मचारी ठेवले जातात. या कर्मचाऱ्यांकडे एक टॉर्च व दोन लाकडी बांबू एवढेच साहित्य असते. हे दोन कर्मचारी पूर्ण रात्र प्रकल्पापासून १० कि. मी. अंतरावर असणाऱ्या या ठिकाणची सुरक्षा करतात. परिणामी या दोन कर्मचाऱ्यांवर या प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी पडते. रत्नागिरी गॅस कंपनीत मोठी सुरक्षा असताना वर्षभरापूर्वी ६० लाखाचे संगणक गुप्त माहितीसह चोरीला गेले होते. संबंधित अधिकारी वर्गाने सुरक्षिततेची योग्य काळजी घेऊन या ठिकाणी सशस्त्र कर्मचारी वर्गाची नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

‘..तर वीज व मायनिंग प्रकल्पांना मनसेचा विरोध!’
सावंतवाडी, ३ मार्च/वार्ताहर
लोकांचा विरोध असलेल्या येथील वीज आणि मायनिंगसारख्या प्रकल्पांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध राहील. लोकशाही व न्यायसंस्थांमार्फत आवाज उठविण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही मनसेचे राज्य सरचिटणीस संजय घाडी यांनी दिली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवार रिंगणात उभा करण्याचे संकेत त्यांनी दिले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती अगर आघाडी होणार नाही, असे धाडी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते घाडी बोलत होते. यावेळी राज्य उपाध्यक्ष अवधूत वाघ, सिद्धार्थ माईणकर, जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, संपर्कप्रमुख उदय सावंत उपस्थित होते. सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची उपेक्षा केली, त्यामुळे नवनिर्माण करण्याचे मनसेचे धोरण आहे, असे घाडी म्हणाले.

आनंद शाळेत मराठी दिन साजरा
खोपोली, ३ मार्च/वार्ताहर :
प्रो. ए.सो. संचालित इंग्रजी माध्यमाच्या आनंद शाळेत साहित्यिक कै.र.वा. दिघे यांच्या स्नुषा व कादंबरीकार-कवयित्री उज्ज्वला दिघे यांच्या उपस्थितीत मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठीचा मानबिंदू, तसेच मापदंड ठरणारे थोर साहित्यिक कुसुमाग्रज ऊर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून का साजरा करण्यात येतो? मराठी भाषेची थोरवी कोणती व मराठी भाषा शिकण्याची व तिचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता, याबद्दल उज्ज्वला दिघे यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. आपल्या कविता संग्रहातील कवितांचे वाचनही त्यांनी केले. मराठी भाषा विकास कार्यशाळा आयोजित करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी थोर साहित्यिकांच्या कवितांचे वाचन केले. दिघे यांनी शाळेच्या ग्रंथालयाला आपले कविता संग्रह भेट म्हणून दिले. संचालिका आसावरी दंडवते यांनी त्याचा स्वीकार करून कृतज्ञता व्यक्त केली. स्वागत, प्रास्ताविक, अतिथींचा परिचय व शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी यांनी केले.

११ वा दरोडेखोर तब्बल ११ वर्षांनंतर पोलिसांच्या ताब्यात
चिपळूण, ३ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील वालोपे येथील मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या लक्ष्मी ट्रेडर्स या पेट्रोलपंपावरील १९९७ साली पडलेल्या दरोडाप्रकरणी अकरावा आरोपी तब्बल ११ वर्षांंनंतर येथील पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. संजय मेहता यांच्या मालकीच्या पेट्रोलपंपावर १६ जुलै १९९७ रोजी दराडो पडला होता. हा दरोडा टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील २८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यातील जवानसिंग भिल्ल, टिठा बारिया, मंगलिया गोंडिया, जामा बारिया, गडू अहोनिया, पुनिया बारिया, सक्रिया गोंडिया, दुल्ला मिनामा, सिंधा बारिया या नऊ जणांना अटक केली. त्यानंतर या दरोडय़ाचा तपास येथील व मध्य प्रदेशातील पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला, मात्र यामध्ये मानसिंग बारिया हा अकरावा आरोपी तब्बल ११ वर्षांंनंतर मध्य प्रदेशात पोलिसांच्या हाती लागला. रत्नागिरी दरोडय़ाशी त्याचा संबंध असल्याने जिल्हा पोलिसांशी संपर्क करून मध्य प्रदेश पोलिसांनी याबाबत त्यांना खबर दिली. त्यानुसार जिल्हा अधीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी एक पथक पाठवून गोध्रा पोलिसांकडून त्याला ताब्यात घेतले.