Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

क्रीडा

निषेध! निषेध!! निषेध !!!
नवी दिल्ली, ३ मार्च / पीटीआय

पाक दौऱ्यावरील श्रीलंकन क्रिकेट संघावर आज लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची जगभरातून निंदा करण्यात आली आहे. गड्डाफी स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी आज सकाळी श्रीलंकेचा संघ हॉटेलमधून मैदानाकडे जात असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद भूषवण्याच्या क्षमतेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया जगभरातील क्रिकेट संघटनांचे प्रशासक आणि खेळाडूंनी व्यक्त केली.

श्रीलंकेच्या खेळाडूंना झालेल्या दुखापती
श्रीलंकचे पाच क्रिकेटपटू आणि एक सहाय्यक प्रशिक्षक लाहोरमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झाले.
महेला जयवर्धने : पायाच्या घोटाला छोटी जखम.
कुमार संगकारा : खांद्याला गंभीर स्वरूपाची जखम.
अजंता मेंडिस : पाठीची चामडी सोलपटली.
थरंगा परानाविथाना : छातीला गोळी चाटून गेल्याने खरचटले, अद्याप हॉस्पिटलमध्ये.
थिलन समरवीरा : भरपूर जखमा, जांघेला गोळी चाटून गेली. अद्याप हॉस्पिटलमध्ये.
पॉल फॅरब्रेस (सहाय्यक प्रशिक्षक) : खांद्याला गंभीर स्वरूपात खरचटले.

पाकिस्तानच्या विश्वचषक यजमानपदाबद्दलचा निर्णय एप्रिलमध्ये
लंडन, ३ मार्च / पीटीआय

२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकिस्तानला सहयजमानपद देता येईल का, यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार आहे.
आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी म्हटले आहे की, सध्याच्या योजनेनुसार २०११ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या चार देशांत संयुक्तपणे आयोजित करण्यात येणार आहे.

आयसीसीला विश्वचषक ठिकाणांचा पुनर्विचार करावा लागेल - मनोहर
नागपूर, ३ मार्च / क्रीडा प्रतिनिधी

पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण क्रीडा जगतच हादरले आहे. या हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहरही भावनाविवश झाले असून हा हल्ला निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या घटनेमुळे पाकिस्तानातील क्रिकेट अधांतरी झाले असून यापुढे कुठलाही देश पाकिस्तानात खेळायला जाण्याच्या मनस्थितीत राहणार नाही. त्यामुळे २०११च्या पाकिस्तानात होणाऱ्या विश्वचषक लढतींचा आयसीसीला पुनर्विचार करावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता पाकिस्तान एकाकी पडेल
लाहोर, ३ मार्च / वृत्तसंस्था

आजच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर पाकिस्तान एकाकी पडेल अशी भीती पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. माजी कर्णधार जावेद मियाँदाद म्हणाला, की आजची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पाकिस्तान सरकारने या घटनेमागील सूत्रधारांचा शोध लावला पाहिजे. या घटनेचे पाकिस्तानातील क्रिकेटवर दूरगामी परिणाम होणार आहेत. आजपर्यंत आमच्या देशात एकाही खेळाडूवर अतिरेक्यांनी हल्ला केला नव्हता.

‘सद्यस्थितीत पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर प्रश्नचिन्ह’
आयसीसी अध्यक्ष मॉर्गन यांच्याकडून चिंता
लंडन, ३ मार्च / पीटीआय
जोपर्यंत सुरक्षाव्यवस्थेचा चोख बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन होऊ शकत नाही, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. मॉर्गन यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सद्यस्थितीत पाकिस्तान हे अतिशय धोकादायक असे ठिकाण आहे. त्यामुळेच जोपर्यंत पाकिस्तानातील सुरक्षाव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत नाही, तोपर्यंत तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

विजयी सलामी
* न्यूझीलंडवर ५३ धावांनी मात
* महेंद्र सिंग धोनी सामनावीर
नेपियर, ३ मार्च / पीटीआय

पावसाच्या व्यत्ययाने गाजलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आज भारताने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयासह पाच एकिदवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने आज ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेच्या कटू स्मृतींनाही तिलांजली दिली. नाबाद ८४ धावा काढणारा भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी सामनावीर ठरला. फलंदाजीतील अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला या विजयाची मजबूत पायाभरणी करता आली. कर्णधार महेंद्र सिंग धोनीने नाबाद ८४, वीरेंद्र सेहवागने नेहमीच्या थाटात तडाखेबंद ७७ धावा फटकावल्या तर सुरेश रैनाने ६६ धावांची खेळी केली.

आता लक्ष त्रिनिदादवर
’ कसोटी अनिर्णीत ’ सरवान सामनावीर
बार्बाडोस, ३ मार्च/ वृत्तसंस्था
येथील किंगस्टन ओव्हलवर सुरू असलेल्या वेस्टइंडिज आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आनिर्णीत राहणार हे सामन्याच्या चौथ्या दिवशीच स्पष्ट झाले होते, आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. सामन्याची ११ षटके बाकी असताना दोन्हीही कर्णधारांनी सामना अनिर्णीत ठेवण्याच्या निर्णय घेतला. तर सामन्यात सर्वाधिक २९१ धावा करणाऱ्या वेस्टइंडिजच्या रामनरेश सारवानला सामनावीरीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजकडे १-० अशी आघाडी असून त्रिनिदाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यावर दोन्हीही संघाचे लक्ष असेल.

महिला विश्वचषक क्रिकेट : भारताची विजयी सुरुवात
मेलबर्न, ३ मार्च/ पीटीआय

ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन गेलेलेल्या भारताच्या महिला संघाने सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २३ धावांनी पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. सलामीवीर अंजुम चोप्राने झळकाविलेले अर्धशतक आणि फिरकीपटू श्रावंती कृष्णमूर्तीने पाच बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

न्यूझीलंड दौऱ्यात भारताला विजयाची संधी -द्रविड
देवेंद्र पांडे
मुंबई, ३ मार्च

न्यूझीलंडच्या गतवेळच्या दोन दौऱ्यात भारताच्या राहुल द्रविडने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली होती. १९९८ च्या दौऱ्यात त्याने १०७ च्या सरासरीने धावा फटकावल्या होत्या, तर २००२ च्या दौऱ्यातही त्यानेच सर्वाधिक धावा केल्या होत्या. न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेला १८ मार्चपासून सुरुवात होणार असून, त्यासाठी कसोटी संघात स्थान मिळालेला राहुल द्रविड नुकताच न्यूझीलंडला रवाना झाला आहे. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याच्याशी केलेली ही बातचीत.

गावसकर आणि विव्ह रिचर्ड्स माझे आवडते खेळाडू - मियाँदाद
कराची, ३ मार्च / पीटीआय

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर व वेस्ट इंडिजचा विव्ह रिचर्ड्स आपले सर्वात आवडते खेळाडू असल्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे.
आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम ’ साठी निवडण्यात आलेल्या ५५ खेळाडूंमध्ये मियाँदादचा समावेश आहे. आयसीसीच्या कॅप वितरण प्रसंगी मियाँदाद यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, ‘ अनेक खेळाडू कौतकास प्राप्त आहेत. पण गावसकर , विव्ह यांना खेळताना पाहणे खूपच आनंददायी असे.’

‘पण मी सुखरूप आहे’
सिडनी, ३ मार्च / वृत्तसंस्था

‘आमच्या बसवर गोळीबार झाला आहे. पण मी सुखरुप आहे..’ श्रीलंकेचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस आपली पत्नी ज्यूली हिला दूरध्वनीवरुन सांगत होते. आपल्या पतीने सांगितलेले वर्णन ऐकून त्यांचा थरकाप उडाला. पती सुरक्षित आहे हे एकून त्यांचा जीव भांडय़ात पडला.
‘ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेस’ शी बोलताना बेलिस यांच्या पत्नीने ही माहिती दिली. बेलिस हे ज्या आसनावर बसले होते त्याच्या पुढच्याच खिडकीवर तीन गोळ्या आदळल्या. बेलिस यांना कसलीही दुखापत न होता ते सुखरुप बचावले. हल्ल्यानंतर काही मिनिटांतच बेलिस यांनी आपल्या पत्नीला दूरध्वनी केला. या घटनेमुळे बेलिस यांना चांगलाच धक्का बसल्याचे जाणवले. गोळीबार होण्यापूर्वी बॉंबस्फोटही झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करणे चालू केले. त्यावेळी बसमधील खेळाडूंना घटनेचे गांभीर्य जाणवले, असे बेलिस यांनी आपल्या पत्नीला सांगितले. स्टीव्ह डेव्हिस व सायमन टफी हे ऑस्ट्रेलियाचे पंच दुसऱ्या वाहनात होते. तेही या गोळीबारातून सुखरुप बचावले.

आमचा तो निर्णय योग्य होता - धोनी
नेपियर, ३ मार्च /वृत्तसंस्था

जानेवारी - फेब्रुवारीत होणारा आमचा पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय किती योग्य होता, हे आजच्या घटनेमुळे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली. पाकिस्तानात श्रीलंका खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याचे वृत्त समजल्यावर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना धोनी म्हणाला की, मी फलंदाजी करीत असतानाच मला या घटनेचे वृत्त समजले. ते ऐकून मी हादरलो. आमच्या सरकारने मुंबईवरील हल्ल्यानंतर आमच्या संघाचा जानेवारीत होणारा पाकिस्तानचा दौरा तातडीने रद्द केला. हा निर्णय किती बरोबर होता हे पाकिस्तानातील आजच्या घटनेने सिद्ध झाले.

बुद्धिबळ: आनंदची पुन्हा बरोबरी
लिनारेस, ३ मार्च / पीटीआय
विश्वविजेता आणि भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने येथे सुरू असलेल्या लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत लढती बरोबरीत राखण्याचा धडाका सुरू ठेवला असून १०व्या फेरीतही त्याने क्युबाच्या डॉमिनगेझविरुद्ध बरोबरी साधली. या निकालामुळे तो संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेतील केवळ चार फेऱ्या शिल्लक असून आनंदच्या खात्यात १०पैकी पाच गुण जमा झाले आहेत. आता उरलेल्या फेऱ्यात त्याने चमत्कार घडविला तरच आघाडीचे स्थान मिळविण्यात त्याला यश येईल. रशियाचा ग्रिसचुक मात्र ६.५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

बास्केटबॉल: ओएनजीसी आणि सेनादलाची आगेकूच
मुंबई, ३ मार्च/ पीटीआय

इंडियन जिमखान्यात सुरु असलेल्या रौप्यमहोत्सवी रामू स्मृती बास्केटबॉल स्पर्धेत ओएनजीसी आणि सेनादलाने विजयी आगेकूच सुरू ठेवली आहे.
आजच्या सामन्यात ओएनजीसीने महाराष्ट्रावर ६५-४६ अशी मात करीत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. तर गेल्यावर्षी उपविजेते ठरलेल्या सेनादलाने चेन्नई कस्टमचा ९७-८४ असा पराभव केला. ओएनजीसीकडून पराभव पत्करणाऱ्या पश्चिम रेल्वेने आज इंडियन ओवरसीस बॅंकेला ९१-५७ अशी धूळ चारली. निकाल पुढील प्रमाणे :- पुरुष गट: ओएनजीसी ६५ (देसराज १३), वि. महाराष्ट्र ४६ (सोजी चेरीयन १२), पश्चिम रेल्वे ९१ (विघ्नेश ३२) वि. इंडियन ओवरसीस बॅंक ५७ (चंद्रशेखर २०), सेनादल ९७ (दिलीप कुमार २१) वि. चेन्नई कस्टम ८४ (बी. राजन २०) महिला गट: छत्तीसगढ ७१ (भारती नेताम १३) वि. उर्वरीत महाराष्ट्र ३४ (कंवलजीत सिंग १९)