Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

काँग्रेस मेळाव्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण. शेजारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे.

राष्ट्रवादीशी युती गरजेची -चव्हाण
यवतमाळात काँग्रेसचा विदर्भ मेळावा

यवतमाळ, ३ मार्च / वार्ताहर

‘धर्माध आणि जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणे अत्यंत गरजेचे आहे. ही काँग्रेसची भूमिका आहे आणि ती राष्ट्रवादी काँग्रेसलाही मान्य राहील, असा दृढ विश्वास आहे. त्यामुळे राज्यात ‘काँग्रेस-राकाँ’ युती होण्यात अडचण नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केले.

स्कार्फ, टोप्यांची दुकाने बहरली
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहुल लागतात शहरातील विविध भागात स्कार्फ आणि टोप्यांची दुकाने थाटली जातात. महाशिवरात्री आटोपल्यानंतर बाजारपेठेत उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली असून दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. स्वत:चे व्यक्तिमत्त्व चांगले दिसावे म्हणून टोपी वापरताना ग्रामीण भागापासून शहरापर्यंत, सर्वसामान्यांपासून ते सुटाबुटापर्यंत असणारी मंडळी नेहमीच दिसते. बारा महिने चालणाऱ्या टोपी आणि स्कार्फ उद्योगाला उन्हाळ्यात चांगला बहार येतो; त्यामुळे बाजारात रंगबेरंगी टोप्या आणि स्कार्फची दुकाने सजली आहेत. उन्हाचा तडाखा वाढतो तसा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक लोक टोपी किंवा स्कार्फ वापरायला सुरुवात करतात.

आदिवासी महिला बचत गटाचा पर्यावरणपूरक गुलाल
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

आदिवासी महिला बचत गटांमार्फत रंगपंचमीच्या मुहूर्तावर ‘फागून’ हा पर्यावरणपूरक नैसर्गिक व आयुर्वेदिक गुलाल बाजारात उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने आदिवासी महिला बचत गटांना सहकार्य करून फुलांपासून बनवलेल्या लाल, हिरव्या, पिवळ्या, नारंगी, तपकिरी आदी रंगांच्या गुलालाचे महत्त्व भंडाऱ्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एन.डी. चौधरी आणि सामाजिक वनीकरण वृत्ताचे सहसंचालक जर्नेल सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

संस्कृत समाजाला दिशा देणारी भाषा -चतुर्वेदी
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

संस्कृत ही केवळ एका धर्माची व समाजाची भाषा नसून समाजाला दिशा देणारी भाषा आहे, सर्व भाषांची ती जननी आहे. त्यामुळे अशा परिषदांमधून संस्कृत भाषेविषयी चिंतन करून तिचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, असे प्रतिपादन चेन्नईचे एस. ए. आर. प्रसन्न वेंकटाचार्य चतुर्वेदी यांनी केले. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे ‘संस्कृत ही जगाची भाषा आहे’ या विषयावर तीन दिवस राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

राज्य सरकारला राष्ट्रसंतांचा विसर!
नागपूर, ३ मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आणि कार्य कर्तृत्त्वामुळे संपूर्ण देशातील नागरिक त्यांचा सन्मान करतात. त्यांच्या विचाराने शेकडो गावे आदर्श झाली. सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अर्थ त्यांच्या विचाराने दिला. मात्र, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा राज्य सरकारला विसर पडल्याचा आरोप श्री गुरूदेव युवा मंचने केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षांला ३० एप्रिल २००८ ला सुरुवात झाली. आता, ३० एप्रिल २००९ला या जन्मशताब्दी वर्षांचे समापन होणार आहे. या वर्षभरात कमीतकमी शंभर गावे ग्रामगीतेच्या विचारांप्रमाणे स्वयंपूर्ण करून आदर्श करण्याचा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या विचारावर जगणाऱ्या लोकांनी आखला आहे. मात्र, राज्य सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मशताब्दी राज्य स्तरावर साजरी करणार किंवा नाही, याविषयी काहीही जाहीर केलेले नाही. श्री गुरुदेव युवा मंच मात्र राष्ट्रसंतांची जन्मशताब्दी साजरी करणार असल्याचे, श्री गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी कळविले आहे.

आदिवासींनी गोंडीयन संस्कृतीचे जतन करावे -कंगाले
वर्धा, ३ मार्च / प्रतिनिधी

आदिवासींनी गोंडीयन संस्कृतीचे जतन करतानाच त्यातील नियमानुसार चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नागपूरचे सह पोलीस आयुक्त बाबासाहेब कंगाले यांनी केले. आदिवासी सांस्कृतिक कलामंचतर्फे तळेगाव येथे ‘कोया पुनेम’ जागर मेळाव्यात ते बोलत होते. आदिवासी समाजातील घातक परंपरांविरुद्ध लढण्याचे आवाहन गोंडी समाजाची तत्त्वे समजावून सांगताना अवचितराव सयाम यांनी सोप्या सरळ मार्गाने जीवन जगण्याचा मार्ग याप्रसंगी सांगितला. सुधा मडावी यांनी गोंडीयन देव, गोत्र व कुळाची माहिती दिली. नामदेवराव मसराम यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी वसंतराव श्रीराव व संतोषराव श्रीरामे यांनीही विचार मांडले.

तुमसर पतसंस्थेवर लोहबरे गटाचे वर्चस्व
तुमसर, ३ मार्च / वार्ताहर

तुमसर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत लोहबरे गटाने दणदणीत विजय मिळवला. सोमवारी पार पडलेल्या तुमसर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी लोहबरे पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे ११ उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. मधुकर लांजे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सचिव राजकुमार माटे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव झाला. या पतसंस्थेत शोभाराम लोहबरे, सुभाष बडवाईक, नरेंद्र ईखार, जयपाल ईश्वर, तृणेश कारेमोरे, उरकुडा ठवरे, नाना सेलोकर, मधुबाला निखाडे, उषा समरीत, रामदास मडावी, अरुण सहारे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुप भांडारकर यांनी काम पाहिले. मतमोजणी नंतर लोहबरे पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारारांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

भारिप बहुजन महासंघाचा रिसोडमध्ये उद्या मेळावा
रिसोड, ३ मार्च / वार्ताहर

भारिप बहुजन महासंघाच्या तालुका शाखेच्यावतीने ५ मार्चला दुपारी १२ वाजता माहेश्वरी भवनात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रामप्रभु सोनोने राहणार असून उमेशकुमार हिवराळे, भारत कांबळे, डॉ. रवींद्र मोरे, डॉ. सुनील लाड, सतीश चोपडे, जुलेखाँ, बाबुराव जुमडे, उपस्थित राहणार आहेत. मेळावा डॉ. अब्दुल कुरेशी यांनी आयोजित केला आहे. मेळाव्याला तालुका पदाधिकारी, सर्कल पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, हितचिंतक, भारीप बहुजन महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन भारत भगत, प्रवीण खैरे, गिरीधर शेजुळ यांनी केले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया
बुलढाणा, ३ मार्च / प्रतिनिधी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना संपर्क नेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी बुलढाणा व अमरावती जिल्ह्य़ाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया खालीलप्रमाणे जाहीर केल्या आहे. त्यानुसार बुलढाणा तालुका प्रमुखपदी माणिकराव सावळे, चिखली शिवसेना तालुका प्रमुखपदी नीलेश अंजनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अमरावती शहरातील शिवसेना शहर उपप्रमुख पदासाठी भारत चौधरी, अमोल निस्ताने, रामाभाऊ सोळंके, विकास शेळके व भारत चव्हाण यांची नियुक्ती उपशहरप्रमुख म्हणून करण्यात आली आहे. तसेच अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख पंजाबराव तायवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.

तुमसरमध्ये नरहरी महाराज पुण्यतिथी
तुमसर, ३ मार्च / वार्ताहर

संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी स्वर्णकार समाजातर्फे साजरी करण्यात आली. तुमसर येथील स्वर्णकार समाजाच्यावतीने शकुंतला सभागृहात संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष सुभाष डुंभरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ह.भ.प. मधुकर आंबेकर यांचे संत नरहरी महाराजांच्या जीवनावर सुश्राव्य असे कीर्तन झाले. दुपारी आमदार कुकडे यांच्या हस्ते दहिकाल्याचा कार्यक्रमही झाला. दिनाजी उरकुडे पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष सुभाष डुंभरे यांच्या प्रयत्नातून पुण्यतिथी सोहोळा साजरा झाला. समाजातील सुभाष मार्जिवे, धनराज फाये, चंद्रकांत निनावे, यादवराव खरवडे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासींचे धरणे
चंद्रपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

जातीची खोटी प्रमाणपत्रे देण्याच्या विरोधात आदिवासींच्या विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन आदिवासींच्या सर्व सवलती हडप करणाऱ्या बोगस आदिवासी तसेच सरकारच्या निषेधार्थ आदिवासी विकास परिषद व आदिवासीच्या विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. आंदोलनात रिपाइं नेते व्ही.डी. मेश्राम, रवींद्र तिराणिक, जनार्दन गेडाम, बाबुराव जुमनाके, बाबा कुमरे, चिंतामन आत्राम, गणेश पेंदरे, परमानंद तिराणिक, दिनेश शेडमाके, किशोर आत्राम, मधुकर कोटनाके, पितेश्वर येरमे, चांगदेव पेंदोर, मिनाक्षी गेडाम, अशोक येरमे, विनोद मसराम, मल्लेश्वर पेंदोर यांच्यासह शेकडो आदिवासी सहभागी झाले. यावेळी आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सामूहिक विवाह मेळावा
चंद्रपूर, ३ मार्च/प्रतिनिधी

बल्लारपूर शहरात मे महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्याची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. २४ फेब्रुवारीला बल्लारपुरात अपंगांना तीन चाकी सायकल वितरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, वाढती महागाई व जीवनावश्यक वस्तूंचे आभाळाला भिडलेले भाव लक्षात घेता समारंभपूर्वक विवाह सोहोळे करणे हे आज अतिशय कठीण काम झाले आहे. दीन, दुर्बल, गरीब, शेतकरी तसेच सर्व जातीधर्मीयांना महागाईची झळ पोहोचत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब कर्ज काढतात व पुढे त्याची परतफेड करताना त्यांना आर्थिक विवंचनांचा सामना करावा लागतो. यात अनेक कुटुंबे वर्षांनुवष्रे कर्जात खितपत पडलेली आपण बघतो. सामूहिक विवाह मेळाव्यांमध्ये आवाढव्य खर्च कमी होतो व विवाहाची पारंपरिक प्रक्रिया सुलभ होते. त्यामुळे सामूहिक विवाह मेळावे ही आज काळाची गरज झाली आहे.

शेतमजूर संघटनेचे सोमवारी कुहीत अधिवेशन
कुही, ३ मार्च / वार्ताहर

नागपूर जिल्हा शेतमजूर संघटनेच्या कुही शाखेचे अधिवेशन ९ मार्चला दुपारी १२ वाजता कुही ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे. अतिक्रमित झोपडीधारकांना व जबरान जोत शेतकऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते मालकी पट्टे देण्याचे काम सुरू झाले आहे. कुही तालुक्यात ग्रामसभा सचिव, तलाठी, वनकर्मचारी हे अतिक्रमणधारकांची दिशाभूल करीत आहेत. याच पाश्र्वभूमीवर अधिवेशन आयोजित करण्यात आले असून याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे नागपूर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत मुंडले यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. शेतकरी-शेतमजूर व अतिक्रमण करणाऱ्यांनी बहुसंख्येने हजर राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

रस्ते व नाल्यांचे बांधकाम करण्याची मागणी
कोंढाळी, ३ मार्च / वार्ताहर

गावातील रस्ते व नाली बांधकाम करून गावाचे आरोग्य चांगले ठेवावे, अशी मागणी येथील विकासनगर आणि गावठाण वस्तीमधील नागरिकांनी केली. कोंढाळी येथील मुख्य मार्गाचे सिमेंट बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली असून रस्त्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज सादर केल्याचे सरंपच सलमा पठाण, उपसरपंच योगेश चाफले व ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले. कोंढाळी येथील विकास नगर व गावठाण वस्तीत गरजू व शेतमजुरांना अजूनही रस्ते नाही किंवा सांडपाणी निचरा करण्यास नाल्या नाहीत. सरकारने गावठाण वस्ती किंवा गरजूंना देण्यात येणाऱ्या जागेवर पाणी, रस्ते, नाल्या व वीजपुरवठा उपलब्ध करून दिल्या जातो. येथील गावठाण वस्तीत मात्र तसे झाले नाही. या भागात अजूनही रस्ते नाही नाल्या नाहीत, चिखलात रहावे लागत असल्याचे अ‍ॅड. विनोद पांडे यांनी सांगितले आहे.

ब्राह्मण सभेच्यावतीने सामाजिक सलोख्याचे दर्शन
चिखली, ३ मार्च / वार्ताहर

हिंदू धर्मातील जातीभेद व इतर भेदभावाविरोधात लढा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृती दिनानिमित्त इतर सर्व समजातील कार्यकर्त्यांचा ब्राह्मण सभेत घेतलेला सत्कार कौतुकास्पद असल्याचे विदर्भ ब्राह्मण सभेचे मोहन कुळकर्णी यांनी सांगितले. महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या चिखली शाखेच्यावतीने माजी नगराध्यक्ष माणिकलाल लाहोटी, दलित मित्र व ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते सुखदेव जाधव, शि.प्र.मं. चे सचिव प्रेमराज भाला, डॉ. प्रतापसिंह राजपूत, माजी नगराध्यक्ष विमल देव्हडे, नगरसेवक पंडित देशमुख, नीलेश अंजनकर इत्यादींचा सत्कार करण्यात आला. जिल्हा ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सतीश रोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माणिकलाल लाहोटी व काँग्रेसच्या एस.सी., एस.टी. सेलचे तालुकाध्यक्ष कैलास खंदारे यांनी सत्कारास उत्तर दिले. कार्यक्रमाचे संचालन रेणुकादास मुळे यांनी केले तर नरेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.

जिगाव प्रकल्पात अडथळा आणणाऱ्यांवर नियंत्रण गरजेचे- टापरे
जळगाव जामोद, ३ मार्च / वार्ताहर

जिगाव प्रकल्पात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकावर नियंत्रण गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलविकास लोकमंचच्या सरचिटणीस अंजली टापरे यांनी केले. स्थानिक संजय गांधी सहकारी सूतगिरणीत आयोजित मंचच्या तातडीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंचाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर टापरे होते. अंजली टापरे म्हणाल्या की, लाखो लोकांच्या हितासाठी होणार जिगाव प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, अशी सर्व लाभधारकांची इच्छा आहे. पुनर्वसनाचे काम गतीने झाले पाहिजे, अशी मंचाची भूमिका सुरुवातीपासूनच आहे. पुनर्वसनाचे काम लोकशाही मार्गाने, कायदा हातात न घेता, सामंजस्याने होऊ शकते. पुनर्वसनासाठी सर्वानी पुढे यावे, असे आवाहन जलविकास लोकमंचाने केले. काही मंडळी लोकशाही मार्गाने प्रश्नाबाबत चर्चा करीत आहेत तर काही मंडळी ब्लॅकमेलींग करीत असभ्य वर्तन करीत आहेत. त्यामुळे या भागासाठी महत्त्वपूर्ण जिगाव धरण बंद पाडू इच्छिणाऱ्या समाजकंटकांना त्यांची जागा दाखविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केली. बैठकीला जलविकास लोकमंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंजनगावातील दिवसाची संचारबंदी शिथिल
अंजनगावसुर्जी, ३ मार्च / वार्ताहर

शहरातील दिवसाची संचारबंदी उठवण्यात आली असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी अद्याप कायम आहे. शिवसेनेचे अमरावती विभाग संपर्क प्रमुख खासदार आनंदराव अडसूळ यांनी सोमवारी क्षतिग्रस्त भागाची पाहणी करून व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले.
वेळ पडल्यास जिल्ह्य़ातील सर्व शिवसैनिकानिशी आपण अंजनगावात ठाण मांडू असेही ते म्हणाले. जातीय तणाव निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी जिल्हा पोलीस महानिरीक्षक दलबीर भारती यांना भेटून करणार असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीवर डोळा ठेवून काँग्रेसने जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप करून व निष्पक्ष चौकशी करून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही अडसूळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम गेडाम व प्रभारी ठाणेदार शिवाजीराव बचाटे यांना भेटून केली. यावेळी सोबत माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हा प्रमुख दिगंबर डहाके, माजी जिल्हा प्रमुख सोमेश्वर पुसदकर, सुधीर सूर्यवंशी, दिनेश बूब, बाळासाहेब हिंगणीकर, विजय होटे, अविनाश गायगोले, महेंद्र दीपडे, राजू अकोटकर, देविदास वाळके, राजू गिरी, सतीश कतोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

परिवहन महामंडळाच्या आंतरविभागीय नाटय़ स्पर्धा सुरू
अकोला, ३ मार्च /प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या ३८ व्या आंतर विभागीय नाटय़ स्पध्रेस प्रमिलाताई ओक सभागृहात सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. अकोला विभाग नियंत्रक चंद्रकांत बोरसे यांच्या हस्ते नाटय़ स्पध्रेचे उद्घाटन झाले. यावेळी दिग्दर्शक अरुण पाटोळे, हेमा देशमुख, मधू जाधव उपस्थित होते. रायगड विभागातून चांदणे शिंपीत जा, ठाणे विभागातून शांतता कोर्ट चालू आहे, औरंगाबाद येथील एक चॉकलेट प्रेमाचं, कुर्लामधून अधांतर आणि सोलापूर येथील ब्रेकींग न्यूज ही नाटके या स्पध्रेत सादर केली जाणार आहेत. ७ मार्चपर्यंत दररोज संध्याकाळी सात वाजता हे प्रयोग सादर केले जातील. पाचही नाटकामधून दमदार अभियनय आणि उत्कृष्ट लेखन असलेल्या नाटकाची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. नाटय़ रसिकांनी प्रयोगांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पी. डी. पितळे, के. एस. इंगळे, डी. पी. पाठक, अतुल पळसपगार, अशोक डेरे, बी. ए. तुपोने यांनी केले आहे.

महिलांचा १५ मार्चला सत्कार
चंद्रपूर दि. ३ मार्च/प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला दुपारी ४.३० वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात महिलांचा सत्कार आयोजित केले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे उपस्थित राहणार आहेत. १५ मार्चला सायंकाळी ५ वाजता नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते व डॉ. अभय बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

नियमित मानधनासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे धरणे
अकेाला, ३ मार्च/प्रतिनिधी

मानधन नियमित देण्यात यावे या मागणीसाठी अंगणवाडी सेविका, मदननीस यांच्यासह लालबावटा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. २००६ मध्ये रुजू झालेल्या अंगणवाडी सेविकांना अद्याप वाढीव मानधन मिळाले नाही. अकोला शहरात १७६ अंगणवाडय़ा असून, सेविका व मदतनिसांना नियमित मानधन मिळत नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामधून नियमित मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी सुरेखा ठोसर यांच्या नेतृत्वाखाली सेविका, मदतनिसांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. या आंदोलनात माया धरडे, त्रिवेणी मानवटकर, विशाखा खोत, वनिता मेश्राम, शालू गाढे, भावना इंगळे, शोभा खडसे, पुष्पा राजपूत आदी सहभागी झाल्या.

नगरसेवक प्रदीप बाजड यांचा सेना सदस्यत्वाचा राजीनामा
अमरावती, ३ मार्च / प्रतिनिधी

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघात तयारी सुरू केली असतानाच पक्षात असंतुष्टांनी नाराजीचे प्रदर्शन करण्यास प्रारंभ केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप बाजड यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. अलिकडेच झालेल्या नियुक्त्यांमध्ये प्रदीप बाजड आणि त्यांच्या सहकाऱ्यांची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ प्रदीप बाजड यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र फॅक्सद्वारे पाठवले. खुद्द प्रदीप बाजड यांचा दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यांनी दूरध्वनी बंद केला असून पक्षातील सूत्रांनी मात्र बाजड यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रदीप बाजड यांनी गाडगेनगरात शिवसेनेची पक्षसंघटनात्मक बांधणी केली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

मारुती कुळमेथेंना श्रद्धांजली
यवतमाळ, ३ मार्च / वार्ताहर

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक मारुती कुळमेथे यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली. मारुती कुळमेथे यांचे केळझरजवळ अपघातात निधन झाले. कुळमेथे यवतमाळात ९३ ते ९८ दरम्यान माहिती अधिकारी होते. जिल्हा माहिती अधिकारी राधाकृष्णन मुळी यांनी मारुती कुळमेथे यांचा एक कलाप्रेमी, मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमाची जाण असलेला अधिकारी असा लौकिक असल्याचे सांगितले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.