Leading International Marathi News Daily

बुधवार, ४ मार्च २००९

विविध

श्रीलंकन क्रिकेटपटूंवरील दहशतवादी हल्ल्याने भारत विचलित
नवी दिल्ली, ३ मार्च/खास प्रतिनिधी

 

श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर झालेल्या फिदायीन हल्ल्यामुळे क्रिकेटप्रेमी भारत क्षुब्ध आणि विचलित झाला आहे. या अकल्पित हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला असून श्रीलंकन क्रिकेटपटू सुखरुप व सुरक्षित असतील, अशी आशा व्यक्त केली आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद साऱ्या जगासाठी धोकादायक ठरला असल्याचे परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी तळे लगेच उद्ध्वस्त केली नाही तर अशा घटना वारंवार घडतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे. दहशतवादाच्या मुद्यावर विषयांतर करून जागतिक समुहाची दिशाभूल करण्याऐवजी आता पाकिस्तानने आपल्या देशातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला मुखर्जी यांनी पाकला दिला. बल्गेरियाचे उपपंतप्रधान इव्हायलो काल्फिन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधताना त्यांनी वारंवार घडणाऱ्या दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तान सरकारला दोष दिला. दहशतवाद्यांना मिळणारी मदत बंद करून त्यांचे अड्डे नेस्तनाबूत केल्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत, असे मुखर्जी म्हणाले.श्रीलंकन क्रिकेट संघावरील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे, तर दहशतवादाचा स्त्रोत आणि केंद्रस्थान बनलेल्या पाकिस्तानच्या विरोधात साऱ्या जगाने एकजूट होण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
लाहोरमध्ये श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वृत्त ऐकून आपल्याला तीव्र धक्का बसला, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले. भारताच्या वतीने या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला. श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या अकस्मात हल्ल्यामुळे भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान आयोजित करीत असलेल्या २०११ सालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भवितव्यावर तसेच या स्पर्धेत खेळाडूंना प्रदान करावयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना भारत कडेकोट सुरक्षा प्रदान करेल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी दिली.

दोन महिन्यांत २६ पत्रकारांची हत्या
जिनेव्हा, ३ मार्च/वृत्तसंस्था

नवीन वर्ष, २००९ हे पत्रकारांसाठी अतिशय वाईट ठरू पाहत आहे. कर्तव्य पार पाडत असलेले २६ पत्रकार नव्या वर्षांच्या पहिल्या अवघ्या दोन महिन्यात अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडले आहेत.‘द प्रेस एम्ब्लेम कँपेन’ या नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने ही माहिती पुढे आणली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बळी पडलेल्या पत्रकारांची संख्या १६ होती. या सगळ्या हत्या जगभरातील विविध तणावांशी निगडित असल्याचेही या संस्थेने म्हटले आहे. यामध्ये गाझा पट्टीत अलीकडेच भडकलेल्या संघर्षांत मृत्यु पावलेल्या चार तसेच पाकिस्तानात मृत्यु पावलेल्या चौघांचा तसेच समावेश आहे. द प्रेस एम्ब्लेम कँपेनने कर्तव्यावर असताना बळी पडलेल्या पत्रकारांच्या प्रकरणांचा नेटाने शोध जारी ठेवला असून गेल्या वर्षभरात अशाप्रकारे ८१ पत्रकार प्राणास मुकले असल्याचे उघडकीस आणले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता मोडल्याचा देवेगौडा यांचा आरोप
बंगलोर, ३ मार्च / पी. टी. आय.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना वैयक्तिक पत्रे लिहून निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप जनता दल (से)चे एच. डी. देवेगौडा यांनी केला असून, या बाबतची तक्रार आपण निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे म्हटले आहे.‘संध्या सुरक्षा’ योजनेअंतर्गत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वृद्धांसाठी नवी निवृत्तीवेतन योजना सुरू केली असून, त्यांना दरमहा ४०० रुपये देण्याची वैयक्तिक पत्रे लिहिली आहेत. या पत्राची प्रत देवेगौडा यांनी प्रसिद्धीला दिली असून, याद्वारे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयीची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. त्याचप्रमाणे हे पत्र तयार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे.आपल्या चिरंजीवाने एचडी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली होती आणि येडीयुरप्पा हे त्याचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर लाटू इच्छिताहेत, असेही देवेगौडा यांनी म्हटले आहे.