Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

अग्रलेख

म्युनिक ते लाहोर

 

बरोबर ३७ वर्षांपूर्वी जर्मनीत म्युनिक ऑलिंपिकमध्ये अरब दहशतवाद्यांनी स्वैर गोळीबार करून १७ इस्रायलींना ठार केले होते. त्यापैकी १२ अ‍ॅथलिट होते. या दहशतवादी कृत्यावर ‘म्युनिक’ नावाचा चित्रपट स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी काढला होता. सात वर्षांंपूर्वी २००२ मध्ये पाकिस्तानात कराचीत शेरेटन हॉटेलवर झालेल्या फिदायीन हल्ल्यात ११ फ्रेंच इंजिनियर ठार झाले, त्याच हॉटेलमध्ये न्यूझिलंडचे क्रिकेटपटू उतरले होते. ते न खेळताच मायदेशी परत गेले. त्यानंतरचा क्रीडापटूंवर सर्वात मोठा हल्ला हा परवा लाहोरमध्ये झाला. रॉकेट लाँचरचा नेम चुकला नसता किंवा बसखाली टाकलेला ग्रेनेड फुटला असता तर सर्वच्या सर्व श्रीलंकन क्रिकेटपटूंना मृत्यूने मिठी मारली असती. या हल्ल्याविषयी ‘आम्ही तिथे नव्हतो, हे बरे झाले’, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली आहे. लाहोरच्या मुअम्मर गडाफी स्टेडिअमबाहेर श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा खेळाडू जखमी झाले. त्यांना वाचवताना पाकिस्तानचे सहा कमांडो आणि अन्य दोघे मृत्युमुखी पडले. मुंबईची जवळपास पुनरावृत्ती लाहोरमध्ये झाल्यानंतरही आमच्या क्रिकेट संयोजकांना शहाणपण येणार का, असा प्रश्न भारतात होऊ घातलेल्या क्रिकेटच्या आगामी कुंभमेळ्यामुळे विचारावा लागतो आहे. क्षणभर कल्पना करा, की भारतीय संघ याच दिवशी याच वेळी गडाफी स्टेडिअमच्या परिसरात असता आणि त्यापैकी काही खेळाडू दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे जखमी झाले असते तर? हेच तालिबानी भारतातही धुमाकूळ घालू शकतात. आता ऐन सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात सुरक्षा व्यवस्था बंदोबस्तात गुंतलेली असताना होणाऱ्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या मर्यादित २० षटकांच्या अती झटपट उत्साही सामन्यांच्या काळात गोंधळ उडवून देणे त्यांना सहज शक्य आहे. ‘आयपीएल’च्या या ४५ दिवसांच्या सामन्यांमध्ये अनेक परदेशी आणि महत्त्वाचे खेळाडू भाग घेणार आहेत. १८ एप्रिलपासून १ जूनपर्यंत चालणारे हे सामने जयपूर, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, चंडीगढ, दिल्ली आणि मुंबईसह एकदोन अन्य ठिकाणी होणार आहेत. यापैकी काही सामने मुंबईत खेळवायचे की नव्या मुंबईत याविषयी वाद आहेत. ‘आयपीएल’चे अध्यक्ष ललित मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान ज्या मतदार संघात होणार असेल, त्याआधी ४८ तास कोणताही सामना त्या केंद्रात खेळवला जाणार नाही, असे म्हटले आहे. ललित मोदींना भारतात निवडणुकांचा प्रचार कसा चालतो, त्यात कितीजणांचे जीव गुंतलेले असतात, याची कदाचित माहिती नसावी. प्रसार यंत्रणा आणि त्यावर केला जाणारा खर्च आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची होणारी तारांबळ यांचीही त्यांना कल्पना दिसत नाही. भारतात पार पडणाऱ्या निवडणुका या संघर्षांच्या परमोच्च बिंदूवर पोहोचत असतात. अशावेळी क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस अडकून राहिले तर काय अनवस्था ओढवेल हे त्यांना उमजलेले नाही. कदाचित त्यामुळेही असेल, राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा धुव्वा उडाला. ललित मोदी हे तसे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या जवळचे मानले जात असतील तर वसुंधराराजे यांचा भाजप विधानसभा निवडणुकीत का आपटला, ते आपल्याला समजावून घेता येईल. मुळात भारतात या निवडणुका निश्चितपणाने एप्रिल-मे दरम्यान होणार, याची कल्पना असताना त्यांनी त्याचवेळी या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक आखावे, हे त्यांच्या लोकशाहीविरोधी वृत्तीचेच दर्शन घडवणारे आहे. त्यांच्या क्रिकेट कंपनीचे एक सल्लागार आय. एस. बिंद्रा यांनी निवडणूक प्रचाराचा शीण घालवायला क्रिकेट पाहू द्या, असा दावा केला आहे. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसला की हे असले विद्रूप विचार सुचत असतात. हा प्रश्न कुणाच्या इच्छेचा वा करमणुकीचाही नाही. (तशी करमणूक बऱ्याचदा प्रचार सभांमधूनही होत असते.) हीच वेळ त्यांना क्रिकेटचे सामने भरवायला मिळते, यातच त्यांच्या अकलेचे कोतेपण स्पष्ट झाले आहे. हे सामने पुढे ढकलले वा रद्द झाले तर आपले किती हजार कोटींचे नुकसान होईल ते आता इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सांगितले जात आहे. हा म्हणजे जुलमाचा रामराम झाला. उद्या आमचे एवढे नुकसान निवडणुकांमुळे झाले, ते केंद्राने भरून द्यावे, असे सांगायलाही ते कमी करणार नाहीत. ‘आयपीएल’च्या गेल्या खेपेच्या फेरीत ज्यांनी भरपूर कमवून घेतले आहे, त्यांनी फार तर ललित मोदींच्या समजुतीखातर त्या फायद्यातला काही वाटा त्यांना द्यावा. तसे पाहिले तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे जेवढा पैसा आहे, तेवढा तो कुणाही एका संघटनेकडे असायची शक्यता नसल्याने मंडळाने या सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या संघांची मालकी ज्यांच्याकडे आहे, त्यांना त्यांच्या रकमा घरपोच कराव्यात. पण कोणत्याही परिस्थितीत हे सामने निवडणुकांच्या काळात भरवू नयेत. या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली आणि एखाद्या भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलियन वा अन्य कोणत्याही प्रमुख खेळाडूवर वा त्यातल्या कोणत्याही संघावर हल्ला झाला, तर काय अवस्था ओढवेल, याची त्यांना कल्पना असली पाहिजे. शरद पवार म्हणतात, की भारतातली सुरक्षा व्यवस्था एवढी मजबूत आहे की, तसे घडणार नाही. मुंबईवर इतका भीषण हल्ला होईल, हे तरी कुणाला माहीत होते? कोणत्याही एका संघात अनेक देशांचे खेळाडू असल्याने त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा विचार केला जायला हवा. श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये हल्ला झाल्यावर लगेचच केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘आयपीएल’चे सामने पुढे ढकला, असे कळकळीचे आवाहन केले. त्यांना या धोक्याची जाणीव आहे, म्हणून तर त्यांनी ही स्पष्टोक्ती केली आहे. पवार हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे नियोजित अध्यक्ष आणि क्रिकेट नियामक मंडळाचे सध्याचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०११ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला देण्यात आलेल्या भारत, श्रीलंका, बांगलादेश याबरोबरच्या सहयजमान पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच आहे. विश्वचषकाचे काही सामने पाकिस्तानात भरवले जायची शक्यता नसल्याचे त्यांनी सूचित केले आहे. पवार यांची लोकशाहीवर श्रद्धा आहे, असे आम्ही मानतो. खरे म्हणजे राजकीय भान असणारा नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. असे असता लोकशाहीतल्या सर्वोच्च प्रक्रियेच्यावेळीच होणाऱ्या क्रिकेटच्या या सामन्यांनी देशापुढे आणि जगापुढे काय वाढून ठेवले जाईल, याचा किमानपक्षी विचार त्यांनी करावा. अति झटपट सामने भरवताना खेळ की पैसा असा प्रश्न होता. तेव्हा पैसा जिंकला. खेळ हरला नसला तरी तो जिंकला नाही. या स्थितीत कुणाच्याही जिवापेक्षा पैसा कधीही श्रेष्ठ नसतो, हे लक्षात घेतले जायला हवे. शिवाय लोकशाहीचा आत्मा निवडणूक प्रक्रियेत असतो आणि त्याच उद्ध्वस्त होणे म्हणजे तो लोकशाहीवरतीच हल्ला ठरेल. म्हणून हे सामने रद्द केले जावेत हे गृहमंत्री चिदम्बरम यांनी म्हटले ते योग्यच आहे.