Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

जोगेश्वरी : शैव संप्रदायाची पहिली लेणी!
जोगेश्वरीच्या लेण्यांमध्ये बरोबर मध्यभागी मोठा उघडा भाग आहे. हादेखील लेण्यांचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पुढे आणि मागच्या बाजूस असलेल्या लेण्यांमध्ये प्रकाश राहावा आणि हवाही खेळती राहावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर समोरच्या बाजूस लेण्याच्या वरती एक छोटेखानी लेणे पहिल्या मजल्यावर पाहायला मिळते. साधनेसाठी लोकांमध्ये न राहता वेगळे राहावे, असे पाशुपतांमध्ये सुचविण्यात आले होते. त्यामुळे तसेच हे वेगळे लेणे (गुहाश्रय) साधनेसाठी केले असावे, असे डॉ. सूरज पंडित सांगतात. या वेगळ्या लेण्याप्रमाणेच डाव्या बाजूसही अगदी एका टोकाला एक छोटेखानी लेणे आहे. आता सध्या या लेण्याचा वापर मारुती मंदिर म्हणून केला जातो. तिथे सध्या दिसणारी मारुतीची मूर्ती पूर्वी निश्चितच नव्हती. हे लेणे किंवा लेण्यातील खोली ही सर्वात जुनी असावी, असा कयास आहे.

‘मुंबईतील ऐतिहासिक ठेव्याची जाण झाली’
‘लोकसत्ता’ आणि मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सिटी वॉक’ या उपक्रमाला ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कान्हेरी लेण्यांना भेट देण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल वाचकांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया..
कृष्णराव माळी- (कोल्हापूर, सहल आयोजक)
मुंबई विद्यापीठ आणि ‘लोकसत्ता’ यांनी ‘सिटीवॉक’सारखा अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. डॉ. सूरज पंडित यांनी कान्हेरी लेण्यांविषयी उत्कृष्ट माहिती सांगितली. शुल्क स्वीकारण्यासाठी ‘लोकसत्ता’चं कार्यालय आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांसोबतच आणखी एखादे जवळपासचे ठिकाण असावे, ही विनंती आहे.

इंटरॅक्टिव्ह खेळांतून जमणार जोडी
स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून ‘जोडी जमली रे’

हल्ली वधू-वरांचे विवाह इंटरनेटवरून जुळवण्याकडे अनेक तरुण-तरुणींचा कल असला तरी एखाद्या मध्यस्थाच्या माध्यमातून लग्नाळू वधू-वरांचे विवाह जुळवण्याचे प्रयत्नही बहुतकरून केले जातात. इंटरनेट डेटिंगही प्रचंड लोकप्रिय आहे. वधू-वरांचे विवाह जुळवण्यासाठी वृत्तपत्रांतून, साप्ताहिकांतून जाहिरातीही दिल्या जातात. मात्र हसतखेळत गेम शोद्वारे विवाह जुळवणारा ‘जोडी जमली रे’ हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर आजपासून दाखविण्यात येणार आहे. वास्तविक, सुयोग्य जोडीदाराची निवड करणे हा प्रत्येकासाठीच अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. ‘टेन्शन’चाही हा विषय असतो. पण स्टार प्रवाहवरील ‘जोडी जमली रे’ या रिअ‍ॅलिटी शोची संकल्पना गेम शोसारखीच आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये तीन तरुण आणि तीन तरुणी ‘इंटरॅक्टिव्ह’ स्वरूपाचे खेळ खेळणार आहेत. सहभागी उपवर वधु-वरांचे पालक, ज्योतिषी तसेच विवाहविषयक सल्लागार सहभागींना मदत करतील. ‘इंटरॅक्टिव्ह’ खेळांमधून या तीन जोडय़ा एकमेकांशी किती जुळवून घेतात, ते एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत हे ठरेल. सर्वाधिक अनुकूल जोडीला ‘सर्वोत्तम जोडी’ म्हणून जाहीर करण्यात येईल. अतुल परचुरे आणि कविता लाड यांनी ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले आहे.
तरुणांना पारंपरिक जोडीदार निवडीची पद्धती कंटाळवाणी आणि क्लिष्ट वाटू शकते, त्यामुळे या कार्यक्रमाद्वारे हसतखेळत छोटय़ा-छोटय़ा ‘इंटरॅक्टिव्ह’ खेळातून अनुरूप जोडीदार निवडण्याची संधी तरुण-तरुणींना मिळावी आणि त्यांचे विवाह जुळावेत म्हणून हा कार्यक्रम बनविण्यात आला असल्याचे ‘जोडी जमली रे’चे दिग्दर्शक श्रीप्रसाद क्षीरसागर यांनी सांगितले. हा कार्यक्रम दर गुरुवारी व शुक्रवारी रात्री १० वाजता प्रसारित केला जाणार आहे.
प्रतिनिधी