Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९

बसपाची चार ब्राह्मणांना उमेदवारी!
मुंबई, ४ मार्च/प्रतिनिधी
‘हाथी नहीं.. गणेश है.. ब्रह्मा, विष्णु, महेश है’ या घोषणेने बसपाचे उत्तर प्रदेशातील सर्वजन समाजाचे स्वप्न पूर्ण करीत राज्याच्या सत्तेचा शकट त्यांच्या हाती सोपवला. येत्या लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रामध्ये जोरदार बांधणी केली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ उमेदवार जाहीर केले असून आज त्यातील चार ब्राह्मण उमेदवारांची घोषणा बसपाने केली. पुणे लोकसभा मतदारसंघातून बिल्डर डी. एस. कुलकर्णी, ठाणे लोकसभामधून ए. के. त्रिपाठी, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. जयेंद्र परुळेकर आणि नाशिकमधून महंत सुधीरदास या चार जणांची नावे जाहीर करण्यात आली.

शिवसेना-भाजप युतीमध्ये पूनम राव यांच्या उमेदवारीवरून पेच?
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असली तरी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांना हव्या असलेल्या मुंबई दक्षिण मतदारसंघावरून युतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. आज दुपापर्यंत मुंबई दक्षिण, कल्याण आणि यवतमाळ हे मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली होती. मात्र ऐनवेळी मुंबई दक्षिण, कल्याण अन्यथा मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ आम्हाला हवाच, अशी भूमिका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी घेतल्याने पूनम यांच्या उमेदवारीवरून जागावाटपाचा तिढा गुंतागुंतीचा झाला आहे.

आता राष्ट्रवादीला हव्या काँग्रेसच्या जागा
मुंबई, ४ मार्च / खास प्रतिनिधी

जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत निर्माण झालेली कटुता नाहीशी होत चालली असली तरी १० ते १२ जागांबाबत अद्यापही रस्सीखेच सुरुच आहे. राष्ट्रवादीने दबावाचे पुरेपुर राजकारण करताना काँग्रेसचे विद्यमान खासदार असलेल्या पाच मतदारसंघांवर दावा करीत काँग्रेसला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. जागावाटपाची राज्यपातळीवरील चर्चा आता संपली असून, अनिर्णित अवस्थेत असलेल्या मतदारसंघांबाबत आता पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये नवी दिल्लीतच निर्णय होईल.

लोणार सरोवरात किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणूंचे अस्तित्व!
अभिजित घोरपडे
पुणे, ४ मार्च

अशनी आदळल्यामुळे निर्माण झालेल्या लोणार येथील प्रसिद्ध सरोवराच्या पाण्यात किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणूंच्या (रेडिओअ‍ॅक्टिव्ह रेझिस्टंट बॅक्टेरिया) अस्तित्वाचे पुरावे मिळाले असून, त्यामुळे या सरोवराच्या वैशिष्टय़ात आणखी एक भर पडली आहे. या जीवाणूंना ही क्षमता कशामुळे प्राप्त झाली याचा शोध घेण्याची आवश्यकता असतानाच, प्रत्यक्षात मात्र या सरोवराकडेच दुर्लक्ष होत असल्याने त्याचे वेगळेपणच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार येथे अशनीच्या धडकेमुळे तयार झालेले अनोखे सरोवर आहे.

दहावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ होतोय. राज्यभरातील सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी आयुष्यातील या निर्णायक शैक्षणिक वळणाला सामोरे जात आहेत.
‘चक दे इंडिया’ चित्रपटात अंतिम सामन्यापूर्वी शाहरूख खानने भारतीय संघाला दिलेला कानमंत्र आठवतोय?. तो म्हणतो, ‘कसे खेळावे, याबाबत या निर्णायक क्षणी मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की, अंतिम लढतीच्या ७० मिनिटांमधील प्रत्येक क्षण तुमचा आहे. तो संस्मरणीय करा ! आपण प्रयत्नांमध्ये कमी पडलो, अशी खंत आयुष्यात पुढे कधीही वाटणार नाही, एवढी मेहनत घ्या.’
विद्यार्थी मित्रांनो, तुमचीही सध्या अशीच स्थिती आहे. आतापर्यंत प्राप्त केलेले ज्ञान स्मरणशक्तीच्या ‘हार्डडिस्क’मध्ये ‘स्टोअर’ केले आहे. आता यशापयशाचा विचार न करता दहावी परीक्षेचा हा अनुभव संस्मरणीय करा. ‘तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये राजहंस दडलेला आहे,’ असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव हे सातत्याने सांगत आले आहेत. कदाचित, दहावी परीक्षेमधून त्या राजहंसाला मोत्याचा चारा मिळणारही नाही. पण, म्हणून दहावीच्या या आव्हानापासून दूर पळून कसे चालेल? शालेयविश्वातील या सर्वात महत्त्वाच्या क्षणाला सामोरे जाण्याचे ‘धाडस’ दाखवा. आणि हो, कितीही नेटप्रॅक्टिस केली, तरी केव्हा ना केव्हा तरी प्रत्यक्ष खेळपट्टीवर जाऊन धावा करण्याचे आव्हान फलंदाजाला पेलावे लागतेच. तुमच्यासाठीही दहावीची परीक्षा ही कसोटी आहे. आपला लाडका सचिन म्हणतोच ना..

कॉपीला मदत केल्यास गुन्हा दाखल करणार
पुणे, ४ मार्च/खास प्रतिनिधी

बोर्डाच्या परीक्षांदरम्यान प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कॉपीला मदत करणाऱ्या किंवा गैरप्रकारांना अभय देणाऱ्या घटकांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेश बजाविण्यात आला असून शिक्षक, केंद्रप्रमुखांपासून थेट जिल्हाधिकारी-वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला त्याबाबत माहिती दिली. ‘कॉपी प्रकरणी संशयित व्यक्तींवर थेट गुन्हे नोंदविण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कॉपीबहाद्दर शिक्षक, केंद्रप्रमुखांना तत्काळ निलंबित करण्यात येणार असून खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागेल. बोर्डाची भरारी पथके कुचकामी ठरीत असल्याची तक्रार करण्यात येत असून आपण तिची गंभीर दखल घेतली आहे. भरारी पथकांच्या कामगिरीचा प्रत्येक दिवशीचा अहवाल तपासण्यात येणार आहे. या पथकांच्या कामामध्ये कुचराई झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. परीक्षा केंद्रांची मान्यता, तेथील सोयी आणि आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे की नाही, हेदेखील पाहण्यात येईल,’ असे विखे-पाटील म्हणाले.
गेल्या वर्षीपासून दहावी-बारावीची परीक्षा ‘सीईटी’प्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत घेतली जाते. परंतु, त्यामुळे गैरप्रकार कमी करण्यासाठी वचक बसण्याची आशा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार घडणाऱ्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. परीक्षाकेंद्राची सुरक्षा ठेवण्यास अपयशी ठरल्याचा ठपका स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही ठेवला जाणार आहे.

तक्रार करण्यास पुढे या
‘सर्वसामान्य नागरिकदेखील कॉपीबाबत पोलिसांकडे तक्रार करू शकतो. ती नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यास नागरिकांनी मंडळ व शिक्षण खात्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे प्रसिद्धीमाध्यमांमधील बातम्या या सकृतदर्शनी पुरावा मानून कारवाई करण्यात येणार आहे,’ असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. कॉपीच्या प्रकरणांबाबत थेट गुन्हा नोंदविण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिला असताना आता तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. शिक्षक-पालक संघ आणि सर्वसामान्य पालकवर्गाने ठिकठिकाणी दबावगट स्थापन करून कॉपीच्या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे.

आयपीएल पुढे ढकलण्यासाठी सुरक्षा यंत्रणाही आग्रही
नवी दिल्ली, ४ मार्च/खास प्रतिनिधी

ऐन लोकसभा निवडणुकांच्या कालावधीतच होऊ घातलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वेंटी २० स्पर्धेला सुरक्षा प्रदान करणे हा चिंतेचा विषय नसला तरी याबाबत स्पर्धेच्या आयोजकांनी केंद्र सरकारचा दृष्टीकोन लक्षात घेण्याची गरज आहे, असे मत आज केंद्रीय कृषी मंत्री व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांच्या कालखंडातच होणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणाही आग्रही असून, सरकारला यासंदर्भात त्यांनी विनंती केल्याचे समजते. निवडणुकीच्या तारखांच्या काळात त्या शहरात सामना न खेळविण्याचे धोरण स्वीकारत आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संयोजकांनी ठरविले होते. परंतु केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्याचा कडाडून विरोध केला आहे. सैनिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुमारे २४ ते ४८ तासांचा वेळ लागतो. त्यामुळे सैनिकांवर नाहक ताण पडेल. हे कारण पुढे करीत सुरक्षा संस्थांनी आपली नाराजी प्रकट केली.

नवीन चावला मुख्य निवडणूक आयुक्त
नवी दिल्ली, ४ मार्च/पी.टी.आय.

केंद्र सरकारने अपेक्षेनुसारच निवडणूक आयुक्त नवीन चावला यांची मुख्य निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती केली आहे. येत्या २० एप्रिलपासून ते या पदाची सूत्रे हाती घेतील. नवीन चावला हे १९६९ च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. देशभर लोकसभा निवडणुकांची ऐन रणधुमाळी सुरू असताना मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणारे नवीन चावला हे पहिलेच अधिकारी ठरणार आहेत. पुढील वर्षी २९ जुलैपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.

शिवसेनाप्रमुख उद्या ‘मातोश्री’वर परतणार
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

अशक्तपणा आणि ताप आल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांना आज अतिदक्षता कक्षातून विशेष कक्षात दाखल करण्यात आले. शुक्रवारी त्यांना घरी जाण्याची मुभा देण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या अंगातील ताप उतरला असला तरी त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याने पूर्ण विश्रांतीसाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, असे हॉस्पिटलचे प्रवक्ते डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले. मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम असून ते नातेवाईक आणि मित्रांच्या भेटीगाठी घेत आहेत. गेल्या चार दिवसांत ठाकरे यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. २६ फेब्रुवारी रोजी ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

मीरा रोड येथे लोकलमध्ये बिघाड; प. रे. विस्कळीत
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

मीरा रोड येथे विरार लोकल नादुरुस्त झाल्याने आज दुपारी पश्चिम रेल्वेची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. विरार-४५४ क्रमांकाची ही लोकल दुपारी १.२० वाजता मीरा रोड स्थानकात तांत्रिक बिघाड निर्माण होऊन बंद पडली. तिच्या मागोमाग धावणाऱ्या तीन लोकलही त्यामुळे अडकून पडल्या. तात्पुरती दुरुस्ती करून ही लोकल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारशेडकडे रवाना करण्यात आली. तोपर्यंत पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झाले होते. सर्व गाडय़ांची वाहतूक सुमारे २०-२५ मिनिटे उशिराने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची लोकलमधील गर्दीने पुरेवाट लागली. बिघडलेली लोकल एसी-डीसी लोकल असली तरी, एमयूटीपीची नवी लोकल नव्हती, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

 


प्रत्येक शुक्रवारी