Leading International Marathi News Daily

गुरुवार, ५ मार्च २००९

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोदी गरजतात!
ठाणे-नाशिकनंतर आज औरंगाबादेत सभा
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती टिकते की नाही, याचे चित्र अजून धूसरच आहे. त्यातच जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसलेले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातच गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

याद आंबराईची
बाहत्तराच्या दुष्काळात आमची सारी आंबराई तुटून पडली. सारी झाडं रायवळ जातीची. केव्हा, केव्हा घरपुरुषांनी लावलेली. झाडं ओळखीची. फांदी ना फांदी माहितीची. साऱ्यांच्या चवी वेगळ्या जातीच्या. चवीच्या जाती आता सांगता येणार नाहीत; पण रंग, आकार, चव यावरून आम्ही त्या-त्या झाडांची नावं ठेवली होती. ‘आंबटय़ा’, ‘खोबऱ्या’, ‘शेप्या’, ‘शेंदऱ्या’, ‘शिंगडय़ा’ ही त्यातली काही प्रमुख नावं. पण या साऱ्यांत आंबराईचा म्हणून एक खानदानीपणा होता. झाडाला झाडं खेटून, एकात एक मिसळून गेलेली. एक मोठय़ा अर्धवर्तुळानं झाडाची लागत झाल्याली. साऱ्या भावकीचा वाटा या आंबराईत होता. म्हणजे या आंबराईनच सारी भावकी एकत्र बांधून ठेवली होती.

एस. टी. बस पेटल्याने १६ जखमी
पाच जणांचे डोळे पूर्ण निकामी
उस्मानाबाद, ४ मार्च/वार्ताहर
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) उस्मानाबाद आगाराची उजनी-उस्मानाबाद बसने आज स्थानकातच पेट घेतल्याने १६ प्रवासी जखमी झाले. जर्मनच्या डब्यात भरलेल्या जिलेटीनमुळे ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घातपाताची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रासायनिक द्रव्यामुळे लागलेल्या आगीच्या ज्वालांनी पाच जणांचे डोळे पूर्णत: निकामी झाले आहेत. सत्तरीच्या राजमती सावंत ४३ टक्के भाजल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. हा अपघात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.

दासबोध म्हणजे जीवनाला दिशा देणारा ग्रंथ - विलासराव
लातूर, ४ मार्च/वार्ताहर

जीवनाचा नेमका अर्थ समजावून सांगणारा व जीवनाला दिशा देणारा ग्रंथ म्हणून दासबोधाकडे पाहिले पाहिजे. हे ज्ञान केवळ मराठीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण जगात ते पोहोचविण्याचे काम या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादामुळे होईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज व्यक्त केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दासबोधाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. या अनुवादाच्या दोन खंडांचे प्रकाशन आज झाले.

दहावीच्या ३२ विद्यार्थ्यांचे परीक्षाकेंद्र अचानक बदलले
उदगीरमध्ये सावळा गोंधळ
उदगीर, ४ मार्च/वार्ताहर
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेला उद्यापासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था झाल्यानंतर शहरातील ३२ विद्यार्थ्यांचे केंद्र ग्रामीण भागात असल्याचे अचानक सांगण्यात आले. या बदलामुळे सर्वच केंद्रांवर गोंधळ उडाला. शहरातील आठ केंद्रांवर २ हजार ५७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून परीक्षा केंद्रावर सर्व रचना लावण्याचे काम चालू होते. सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यात आल्यानंतर येथील धुरपतमाता माध्यमिक विद्यालयाचे ३२ विद्यार्थी तोंडचीर येथील जिजामाता विद्यालयाच्या केंद्राकडे वर्ग करण्यात आले. वर्ग करण्यात आलेले विद्यार्थी हे उदगीरमधील पाच परीक्षा केंद्रांतून परीक्षा देणार होते.

‘कर्ज माफ होण्यासाठी आम्हीही मरावे काय?’
छोटय़ा व्यावसायिकांचा प्रश्न
उस्मानाबाद, ४ मार्च/वार्ताहर
स्वयंरोजगार करून पोट भरता यावे म्हणून तेरखेडा येथील दशरथ तुकाराम धुमाळ यांनी कुक्कुटपालनासठी दोन लाख रुपयांचे कर्ज मागितले. तीन वर्षे बँकेत हेलपाटे घातले. तक्रारी केल्यानंतर एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. कर्ज मंजूर झाल्यावर बँकेतल्या अधिकाऱ्यांनी त्या कर्जातले ४० हजार रुपये हातउसने म्हणून घेतले. ती रक्कम पुन्हा मिळालीच नाही. गुंतवणूक म्हणून २० हजार रुपयेही कापून घेतले.

ट्रॉलीवर जीप आदळून बीडमध्ये १० जखमी
बीड, ४ मार्च/वार्ताहर

कापसाच्या ट्रॉलीवर जीप धडकून आज झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले. काल रात्री झालेल्या अपघातात ऊसतोड मजुरांची ट्रॉली उलटून एक महिला ठार व पाच जण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर रस्त्यावर पाठक मंगल कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या कापसाच्या ट्रॉलीवर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जीप धडकून झालेल्या अपघातात जीपमधील दहा जण जखमी झाले. यात थोरातवाडी येथील विलास बाबासाहेब डोंगरे आणि नेकनूर येथील अमित निर्मळ, बबन गुडवे, प्रकाश निर्मळ, दयानंद निर्मळ, राम ढवारे, चंद्रकांत लांडगे, विजय निर्मळ जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बीड-पिंपळनेर रस्त्यावर नागापूर फाटय़ाजवळ काल रात्री ट्रॅक्टर-ट्रॉली उमटली. सांगलीच्या क्रांतीसिंह साखर कारखान्यातून गावाकडे परतणाऱ्या खर्डा येथील ऊसतोड मजूर या ट्रॉलीमध्ये होते. छाया अनुरथ नाईकवाडे (खर्डेवाडी) ठार झाली व पाच जण जखमी झाले.

मुंडे-अजित पवार आज आष्टीत एका व्यासपीठावर
बीड, ४ मार्च/वार्ताहर
आष्टी येथे (कै.) रामचंद्र धस यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या (गुरुवारी) होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे व जलसंपदामंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. हे दोन नेते पहिल्यांदाच एकत्र येत आहेत.आमदार धस यांचे वडील रामचंद्र धस यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण उद्या जामगाव येथे होत आहे. या कार्यक्रमास श्री. अजित पवार, श्री. मुंडे यांच्यासह संपर्कमंत्री बबनराव पाचपुते, सार्वजनिक उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा, उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री सुनील तटकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्हाभरातील विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार धस यांनी भाजपशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केल्यानंतरच प्रथमच त्यांनी निमंत्रित केलेल्या कार्यक्रमाला श्री. मुंडे उपस्थित राहणार आहेत.

दिलीपरावांचे लातूरमध्ये जंगी स्वागत
लातूर, ४ मार्च/वार्ताहर
क्रीडा व युवक कल्याणमंत्री दिलीप देशमुख यांचे अाज लातूर रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.श्री. देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रेल्वेस्थानक ते त्यांचे निवासस्थान या मा र्गावर अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी रेल्वे स्थानकावर एकच गर्दी केली होती. श्री. देशमुख यांनी हात उंचावून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले.गाडय़ांचा मोठा ताफा, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, फलक, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण अशा थाटात श्री. देशमुख यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर दिलीपरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, सरचिटणीस बी. व्ही. मोतीपवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आचारसंहिताभंगाचा पहिला गुन्हा दाखल
नांदेड, ४ मार्च/वार्ताहर

आय.टी.आय.च्या प्रांगणात परवानगी न घेता वाहने लावल्याच्या आरोपावरून जनसुराज्य पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा आज दाखल झाला. पक्षाच्या कालच्या मोर्चासाठी कार्यकर्ते वाहनांद्वारे आले होते. त्यापैकी ७-८ वाहने आय. टी. आय.च्या प्रांगणात लावली होती. महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजेंद्रसिंह बैस यांनी तक्रार नोंदविली.

बालाजी विद्यालयाचे कारवाईचे नाटकच!
गंगाखेड, ४ मार्च/वार्ताहर

तालुक्यातील इसार येथील बारावी परीक्षेच्या केंद्रावर तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी कॉपीस प्रोत्साहन देणाऱ्या दोन शिक्षकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे सूचित केले होते. शाळेच्या प्रशासनाने मात्र आज केवळ परीक्षेदरम्यान संबंधित शिक्षकांविरुद्ध बंदी घातल्याचे मंडळाला कळविले. कॉपी करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल तहसीलदारांनी शिक्षक एस. एम. सोनवणे व जाधव यांच्यावर कारवाई करण्याची लेखी सूचना केंद्रसंचालक एस. यू. येवले यांना दिली. केवळ परीक्षादरम्यान संबंधित शिक्षकांविरुद्ध बंदीची कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे कळते.

भा.ज.प.ची महिला परिषद आज
मोंदीची सभा जिल्हा परिषद मैदानावर
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी दुपारी राज्यस्तरीय महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला राज्यभरातून ५० हजार महिला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेची पूर्ण तयारी झाली आहे. या परिषदेचा समारोप गुजरातचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी नरेंद्र मोदी यांच्या जाहीरसभेने होणार आहे. ही जाहीर सभा औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर होणार आहे. या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा किरण माहेश्वरी, चिटणीस स्मृती इराणी, प्रदेश महिला अध्यक्षा मनीषा चौधरी आदी सहभागी होणार आहेत. या परिषदेत महिलाविषयक धोरणांचे ठराव घेतले जाणार आहेत. या परिषदेला दुपारी १ वाजता प्रारंभ होईल. सायंकाळी ४ वाजता या परिषदेचा समारोप श्री. मोदी यांच्या भाषणाने होईल. श्री. मोदी यांचे आगमन दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. त्यानंतर ते थेट जिल्हा परिषद मैदानावर जाणार आहेत. महिला परिषदेच्या समारोपानंतर श्री. मोदी गुजराती विद्या मंदिरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अर्धा तास विश्रांती घेऊन ते जिल्हा परिषद मैदानावर सायंकाळी सहा वाजता जाहीर सभेसाठी येणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी दिली.

पं.नेरळकर व पाऊसकर यांना रोटरी क्लबचा पुरस्कार
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी
शासकीय संगीत आणि नृत्यामध्ये आपली सेवा अर्पण करणारे पं. नाथराव नेरळकर आणि मीरा पाऊसकर यांना रोटरी क्लब औरंगाबाद मेट्रोतर्फे ‘सव्‍‌र्हीस अबोव्ह सेल्फ’ या रोटरीच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. गेल्या अनेक दशकापासून मराठवाडय़ामध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करण्याचे महान कार्य पं. नाथराव नेरळकर यांनी केले आहे. नृत्य क्षेत्रात नृत्य झंकारच्या संचालिका मीरा पाऊसकर यांचे मोलाचे योगदान आहे.

विद्यापीठाच्या उर्दू विभागात परिसंवादाला प्रारंभ
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागात ‘प्रेमचंद यांच्यानंतर उर्दू कादंबरी: प्रश्न आणि प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राला बुधवारी प्रारंभझाला.
कुलसचिव डॉ. दीपक मुळे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते. बीसीयुडी संचालक डॉ. ए. जी. खान हे प्रमुख अतिथी होते. प्रेमचंदांमुळे उर्दू साहित्याची ओळख झाल्याचे डॉ. मुळे म्हणाले. डॉ. कोत्तापल्ले यांनी विभागात होणाऱ्या चर्चासत्राबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. खान यांनी उर्दू कादंबरीच्या प्रवासावर प्रकाश टाकला. प्रारंभी विभागप्रमुख डॉ. मोहंमद गयासुद्दीन यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रक डॉ. सिद्दीकी मोहियोद्दीन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कीर्तीमालिनी जावळे यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर प्रा. कीर्ती जावळे, डॉ. काझी नवीद, अहमद सिद्दीकी, नुरूल हुसैन यांनी शोधनिबंध सादर केले. बशर नवाझ अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रा. हमीद सोहरवर्दी यांचे मुख्य भाषण झाले.

पंचायतराजवर काँग्रेसचे जिल्हा शिबिर शनिवारी
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अंतर्गत राजीव गांधी पंचायत राज संघटन यांच्यातर्फे औरंगाबाद जिल्हास्तरीय शिबिर येथील विंडसर कॅसल या हॉटेलमध्ये शनिवारी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. माजी खासदार आणि पंचायत राज संघटनचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. या शिबिरात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. आतापर्यंत ४५० सभासदांची नोंदणी झाली आहे. राज्यात १ लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी दिली.

लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी
रजेचे पैसे मंजूर करण्यासाठी कनिष्ठ लिपिकाकडून १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. लाडसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात महेंद्र काशीनाथ भालेराव हे कनिष्ठ लिपिक आहेत. ते रजेवर गेले होते. या रजेचे त्यांना ६० हजार रुपये मिळणार होते. या रजेच्या पैशाला मंजुरी देण्यात यावी यासाठी वैद्यकीय अधिकारी मनोहर प्रभाकर मुट्टे - पवार यांनी ३० टक्के रकमेची मागणी केली. तडजोड झाल्यानंतर १५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. श्री. भालेराव यांनी लाचलुचपत विभागाकडे या संदर्भात तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाअधीक्षक संग्राम सांगळे यांनी सापळा रचून डॉ. मनोहर प्रभाकर मुट्टे - पवार यांना त्यांच्या निवासस्थानी अटक केली.

मातीचे घर जळून खाक
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी
बिबिका मकबरा परिसरात काल रात्री लागलेल्या आगीत अख्खे घर जळून खाक झाले. यात कचरू महादेव शेळके यांच्या घरातील सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. शेळके यांचे मकबऱ्याच्या पाठीमागेच मातीचे घर आहे. रात्री तेथे अचानक आग लागली. यात घरातील कपडे, भांडी-कुंडी असे जीवनावश्यक असे सर्व सामान जळून खाक झाले. सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य दुसऱ्या घटनेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रेंगटीपुऱ्यातील (जुना मोंढा) एका घरात गॅस गळती झाल्याने खळबळ उडाली. प्रदीप रतनलाल मेहतोडे यांच्या घरात ही गॅसगळती झाली होती. सुदैवाने आग लागल्यापूर्वीच गॅस गळती रोखण्यात अग्निशमन दलाला यश आले.

लोकशाहीदिनात ६६ तक्रारी
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकशाहीदिनानिमित्त ६६ अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाच्या होत्या. त्याखालोखाल अन्य विभागाच्या १९ तक्रारी होत्या. जिल्हा परिषद (६), महापालिका (२), सिंचन (३), विद्युत विभाग (४) आणि पोलीस (३) या विभागांचे अर्ज आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

रोहित गिरी या तरुण चित्रकाराच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथील शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरलेले आहे. पहिली ते सहावीच्या मुलांनी काढलेली जवळपास दीडशे ते दोनशे चित्रे या प्रदर्शनात मांडलेली आहेत. विशेष म्हणजे या चित्रामागची संकल्पना काय, याची माहिती ही मुले चित्रे बघणाऱ्यांना देतात. मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांच्याकडून रोहित गिरी यांनी ही चित्रे बनवून घेतली आहेत. हे चित्र प्रदर्शन अमला अपार्टमेंट, सारडा पॅथालॉजीच्या बाजूला, व्यंकटेश नगर येथे रविवारी, ८ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत बघता येईल.

केळीचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवील - यादव
लातूर, ४ फेब्रुवारी/वार्ताहर
केळीची शेती सिंचन पद्धतीने उत्तमरीत्या करता येते. केळीचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविणारे आहे म्हणून शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केळी उत्पादक शेतकरी उदय यादव यांनी केले.श्री सिद्धेश्वर अ‍ॅग्रोटेक २००९ व राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केळी चर्चासत्र व परिसंवाद, शेडनेटमधील भाजीपाला लागवड व व्यवस्थापन चर्चासत्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लालासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी यादव बोलत होते. या प्रसंगी मुख्य संयोजक विक्रम गोजमगुंडे, तुषार जाधव, सुहास डोंगरे उपस्थित होते. श्री.यादव म्हणाले, केळी उत्पादनाचा एकरी खर्च ५० ते ५५ हजार आहे. उत्पन्न दीड लाख रुपये मिळते. खर्च वजा जाता १ लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे केळी शेती शेतकऱ्यांना परवडणारी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विक्रम गोजमगुंडे यांनी केले.

कळंब नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदी आशाताई भवर
कळंब, ४ मार्च/वार्ताहर
नगराध्यक्ष शिवाजी कापसे एक महिन्याच्या रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष आशाताई भवर यांच्याकडे जाणार आहे.नगरपालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असून, नगराध्यक्षपद तीन महिन्यांसाठी काँग्रेसकडे आले होते. या काळात श्री. कापसे नगराध्यक्ष झाले. उर्वरित तीन महिन्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार होता. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे श्री. कापसे यांनी एक महिना रजेचा अर्ज दिल्याने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून श्रीमती भवर काम पाहणार आहेत.तीन महिन्यांच्या काळात यशस्वी प्रशासन व हिताचे निर्णय घेतल्याबद्दल कर्मचारी संघटनेतर्फे मुख्याधिकारी अजित खंदारे यांनी श्री. कापसे यांचा सत्कार केला. या वेळी सलीम मिर्झा, राजाभाऊ मुंडे, प्रा. बाळकृष्ण भवर, दिलीपसिंह देशमुख, जिलानी कुरेशी, लक्ष्मीकांत हुलजुते, मुश्ताक कुरेशी, शंकर वाघमारे, भारत करंजकर, शैलेश शिंदे, बाबूशेठ बारगेचा उपस्थित होते.

‘दिलासा’चे काम कर्मयोग्याप्रमाणे- देशमुख
औरंगाबाद, ३ मार्च/खास प्रतिनिधी
‘दिलासा’ या संस्थेचे कार्य एका कर्मयोग्याप्रमाणे आहे. कष्ट आणि कर्माची सांगड घातली गेली तर लक्षणीय काम उभे राहते, हे या स्वयंसेवी संस्थेने सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले.दिलासा संस्थेतर्फे आयोजित मानकरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामविकासात सहभाग घेतलेल्या गावकऱ्यांना श्री. देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देण्यात आले. गेल्या दीड दशकापासून ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या दिलासा जनविकास प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. गावाला दिशा देणाऱ्या गावकऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलासाने एक लाख हेक्टरवर पाणलोटाची कामे पूर्ण केली आहेत. बाराशेपेक्षा अधिक बचत गटाची बांधणी संस्थेने केली आहे. या कार्यक्रमात ‘तांडेतांडेरो गावगाडा’, ‘राजपूत-परदेशी गावगाडो’ या दोन नियतकालिकांचे प्रकाशन श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार एम. एम. शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे आणि डॉ. शरद भोगले आदी उपस्थित होते.

आचारसंहितेचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई
हिंगोली, ४ मार्च/वार्ताहर
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून सर्वासाठी समान वागणूक देण्याचे कर्तव्यकर्म मतदारसंघातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पार पाडावे. यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी विनिता सिंघल यांनी सांगितले.लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्रीमती सिंघल बोलत होत्या. रोजगार हमी, पिण्याचे पाणी आदी संदर्भात कुठलाही अडसर नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आदर्श आचारसंहितेस अनुसरून शहरातील आणि लोकसभा मतदारसंघातील छोटे-मोठे फलक हटविण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी जाहिराती पुसल्या जात आहेत.

मच्छिमारांना विमा संरक्षण लागू
सोयगाव, ४ मार्च/वार्ताहर
मासे विकून पोट भरणाऱ्या मच्छिमारांना आता विमा लागू केल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचे जय भोले मत्स्य व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष अशोक खेडकर यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसाय हा संकटाचा सामना करीत पोट भरणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायात व व्यवसाय करणाऱ्या मच्छिमाराला विमा संरक्षण द्यावे अशी मागणी मत्स्य व्यावसायिकांनी बऱ्याच वर्षांपासून केली. नुकतीच ही मागणी पूर्ण केल्याने आता मच्छिमारांना विमा संरक्षण लागू होणार आहे.

मानवतमध्ये घरफोडी
मानवत, ४ फेब्रुवारी/वार्ताहर

कोक्कर कॉलनीतील सुनील मुंजाजी धुमाळ यांच्या घरात प्रवेश करून चोरटय़ांनी रोख २२ हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून ५८ हजारांचा ऐवज चोरला. ही घटना रविवारी रात्री घडली.
सुनील धुमाळ यांचे वडील अंगणात व भाऊ बैठकीमध्ये झोपला असताना काही अज्ञात चोरटय़ांनी घराच्या प्रवेश केला कपाटातील रोख २० हजार, सोन्याचे नेकलेस, गंठण, झुंबर जोड, मणी, चांदीचे जोडवे मिळून एकूण ५८ हजारांचा ऐवज टोरटय़ांनी पळविल्याची तक्रार फिर्यादी सुनील धुमाळ यांनी मानवत पोलीस ठाण्यात दिली.

महावितरण लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी उत्तम झाल्टे
लातूर, ४ मार्च/वार्ताहर

महावितरणच्या लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी उत्तम झाल्टे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.पूर्वीचे मुख्य अभियंता बी. बी. पाटील यांची बदली कल्याण येथे झाल्याने त्यांच्या जागी झाल्टे रुजू झाले आहेत. ते यापूर्वी महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात वितरण विभागाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. झाल्टे यांनी सेवेत असतानाच पॉवर सिस्टीम अ‍ॅनालिसिस या विषयात विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी प्रथम श्रेणीत मिळविली असून त्यांनी विद्युत क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील विविध परिषदांमध्ये भाग घेतला आहे. ते महावितरणच्या नाशिक येथील प्रशिक्षण, संशोधन व विकास केंद्रातील प्रशिक्षकही आहेत.परिमंडलाचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार, उस्मानाबाद मंडलाचे अधीक्षक अभियंता सुहास रंगारी, लातूर परिमंडलाचे व्यवस्थापक अशोक खटावकर, उपव्यवस्थापक महानोर इंगळे, यांनी झाल्टे यांचे अभिनंदन करून स्वागत केले.

जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी सरकार असंवेदनशील - दाभोलकर
लातूर, ४ मार्च/वार्ताहर
जादूटोणाविरोधी कायदा अमलात आणावा यासाठी आम्ही गेल्या १४ वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. राज्यातील सरकार मात्र अकार्यक्षम व असंवेदनशील असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पत्रकार बैठकीत केले.हा कायदा करण्यासाठी गेल्या १४ वर्षांपासून लोकशाहीतील सर्व मार्ग आपण अमलात आणले आहेत. आमचा हिंसाचारावर विश्वास नाही व आम्ही विवेकी असल्यामुळे आत्मदहनाचा इशारा देत नाहीत त्यामुळे सरकार आमच्या रास्त मागणीकडे डोळेझाक करत आहे. सामाजिक सुधारणा करणाऱ्या शाहू महाराजांचा पुतळा दिल्लीच्या संसदेत बसवला जातो व पुरोगामी म्हणवणारे महाराष्ट्र सरकार मात्र जादुटोणाविरोधी कायदा करत नाही हे दुर्दैव आहे. सरकारचे लक्ष वेधावे यासाठी स्वत:च्या रक्ताने स्वाक्षरी अभियान राबविले जात आहे. सरकार याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

उपकनिष्ठ तायक्वोंदो स्पर्धेत बीडला उपविजेतेपद
बीड, ४ मार्च/वार्ताहर
पहिल्या राज्य उपकनिष्ठ तायक्वोंदो स्पर्धेत बीड संघाने उपविजेतेपद पटकाविले. तर पुणे संघ तिसऱ्या क्रमांकावर आणि यजमान अहमदनगर संघाला एकूण १२ पदके मिळाली, अशी माहिती प्रशिक्षक अविनाश बारगजे यांनी दिली. जामखेड येथे तायक्वोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि कै. निवृत्ती बारगजे तायक्वोंदो अकादमी यांनी पहिली राज्य उपकनिष्ठ तायक्वोंदो स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये बीड संघाने सात सुवर्ण, चार रौप्य व सात कांस्य पदकांसह ६८ गुण मिळवून स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व राखले. सातारा संघाने सहा सुवर्ण, पाच रौप्य व १० कांस्य पदकांसह ६७ गुण मिळवून उपविजेतेपद, तर दोन सुवर्ण, सहा रौप्य, पाच कांस्य पदकांसह ३७ गुण मिळवून पुणे संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यजमान नगर जिल्ह्य़ाच्या संघाने १२ पदके मिळविली.जिल्हा परिषद सदस्य मधुकर, प्रसिद्ध व्यापारी रमेश गुगळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, कॅप्टन नारायणराव काशिद, भारतीय तायक्वोंदो महासंघाचे निरीक्षक विनायक गायकवाड, छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, जिल्हा तायक्वोंदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

‘विज्ञाननिष्ठा जरूर जपा, पण संस्कृती विसरू नका’
लोहा, ४ मार्च/वार्ताहर
आजच्या संगणकीय युगात मानवाने गरुडझेप घेतली. एकीकडे प्रचंड विश्व अगदी जवळ आले. तसे नास्तिकही वाटत आहेत. विज्ञान निष्ठेमुळे भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये असे विचार ख्यातकीर्त सत्संग अभ्यासक कीर्तनकार प्रमोद जगताप बारामतीकर यांनी मांडला. लोहा व्यापारी मंडळ व चिंतामणी गणपती समितीच्या वतीने भागवत कथाज्ञान यज्ञ सोहळा मोंढा येथे सुरू आहे. त्या वेळी प्रमोद महाराज जगताप प्रवचनात सांगत होते. अभंगाचा उपक्रम आणि उपसंहार फार महत्त्वाचा आहे. कीर्तनातून आत्महित आणि अत्यंत साक्षेपीपणा जपता येतो. एकीकडे प्रगती तर दुसरीकडे अधोगती होत आहे. दिवसेंदिवस मनुष्य नास्तिकवादी बनत चालला आहे. विज्ञानाची कास धरावी पण त्या प्रगतीने भारतीय संस्कृतीचा लोप होता कामा नये असा उपदेश त्यांनी केला. भागवत ज्ञानकथा यज्ञ सोहळ्याचे निरुपण वंृदावनचे अरुण महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून होत आहे.

शिधापत्रिकाधारक पामतेलापासून वंचित
गेवराई, ४ मार्च/वार्ताहर
वाढती महागाई कमी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामार्फत २५ रुपये किलोने पामतेलाचे वितरण करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. तालुक्यात फेब्रुवारीचा कोटा गोदामातच आला नसल्याने शिधापत्रिकाधारक या योजनेपासून वंचित राहिले.स्वस्त धान्य दुकानामार्फत पूर्वी ४२ रुपये किलोने विक्री होणाऱ्या पामतेलाच्या किमती सरकारने कमी केल्या. हे तेल २५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांतून वितरित केले जात आहे. ही योजना अनेक तालुक्यांत यशस्वी होत आहेतालुक्यात मात्र फेब्रुवारीचा कोटा असलेले पामतेल आले नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना बाजारातून महाग तेल खरेदी करावे लागले. स्वस्त धान्य दुकानदारांना या योजनेबाबत विचारले. त्यांनी सांगितले की, कमी दराचे तेल गोदामातच आले नाही. त्यामुळे शधापत्रिकाधारकंना तेलवाटप करण्याचा प्रश्नच नाही.

लोहा नगरपालिकेचे शिलकी अंदाजपत्रक सादर
लोहा, ४ मार्च/वार्ताहर
नगरपालिकेचे आर्थिक वर्षांचे शिलकी अंदाजपत्रक अलीकडेच पालिकेच्या विशेष सभेत सादर करण्यात आले. विविध रूपाने येणारा निधी ७ कोटी ११ लाख १५ हजार रुपये अपेक्षित आहे. अंदाजपत्रकातील शिल्लक १ हजार ५७ रुपये आहे.नगराध्यक्ष त्रिशलाबाई कांबळे, उपनगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, मुख्याधिकारी सरवदे यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत अंदाजपत्रक सादर करण्यात आले. कर उत्पन्न ६० लाख ८० हजार, सुधार विकास २९ लाख, इतर भत्ते, तयबाजार, जनावर दाखले यातून १६ लाख ७५ हजार, अनुदाने २ कोटी ६५ लाख, सुवर्णजयंती शहरी रोजगार अनुदान ५७ लाख ५० हजार, इतर- २ लाख ९५ हजार, दलित वस्ती सुधार योजनेतून १ कोटी ८ लाख असे ७ कोटी ११ लाख ६५ हजार रुपये जमा अपेक्षित आहेत. यात सामान्य प्रशासन ४६ लाख ३० हजार, कर वसुली २ लाख ७५ हजार, अग्निशामक ३ लाख ७५ हजार, दिवाबत्ती २० लाख ७५ हजार, पाणीपुरवठा ६४ लाख ३५ हजार, जलनिस्सारण- २ लाख, स्वच्छता विभाग- ६४ लाख रुपये खर्च अंदाजित आहे.

‘नामफलकाची मोडतोड करणाऱ्यांना अटक करावी’
बीड, ४ मार्च/वार्ताहर

पुण्यातील कोथरुड सराफा बाजारात असलेल्यी श्रीसंत नरहरी महाराज चौकाच्या नामफलकाची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने अटक करावी, अशी मागणी श्रीसंत नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक संदीप बेदरे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने १६ फेब्रुवारीला श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते. मात्र १ मार्चला काही अज्ञात समाजकंटकांनी या नामफलकाची तोडफोड केली आहे. या समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.