Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

बसपाची चार ब्राह्मणांना उमेदवारी!
मुंबई, ४ मार्च/प्रतिनिधी

 

‘हाथी नहीं.. गणेश है.. ब्रह्मा, विष्णु, महेश है’ या घोषणेने बसपाचे उत्तर प्रदेशातील सर्वजन समाजाचे स्वप्न पूर्ण करीत राज्याच्या सत्तेचा शकट त्यांच्या हाती सोपवला. येत्या लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रामध्ये जोरदार बांधणी केली आहे. आतापर्यंत त्यांनी १३ उमेदवार जाहीर केले असून आज त्यातील चार ब्राह्मण उमेदवारांची घोषणा बसपाने केली. पुणे लोकसभा मतदारसंघातून बिल्डर डी. एस. कुलकर्णी, ठाणे लोकसभामधून ए. के. त्रिपाठी, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. जयेंद्र परुळेकर आणि नाशिकमधून महंत सुधीरदास या चार जणांची नावे जाहीर करण्यात आली. आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दोन मुस्लिम, चार ब्राह्मण व आठ ओबीसी आहेत. यामध्ये बंजारा, गवळी, माळी, कुणबी जातीचे उमेदवार आहेत. अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये एकाही मराठा समाजाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मराठा उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळणार की नाही, अशी शंका पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास गरुड यांच्याकडे व्यक्त केली असता त्यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठा समाजाच्या उमेदवारांना पक्ष उमेदवारी देऊ शकतो. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी १५ जागांवर मराठा जातीचे उमेदवार, आठ ते दहा जागांवर मुस्लिम, दहा राखीव जागांवर आदिवासी व दलित व उर्वरित जागांवर ओबीसी समाजाचील उमेदवार असणार आहेत.
बहुजन समाज पक्षामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात सहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला होता. यंदा हा फटका मोठय़ा प्रमाणात बसू शकतो. गरुड यांच्या म्हणण्याप्रमाणे यंदा आमच्या तितक्याच जागा निवडून येतील व काँग्रेस व राष्ट्रवादीमुळे आमचे अनेक उमेदवार पडू शकतील. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षाला जिंकवायचे असल्यास मतदारांनी बसपा हाच पर्याय निवडावा, असे आवाहन गरुड यांनी केले आहे.