Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

शिवसेना-भाजप युतीमध्ये पूनम राव यांच्या उमेदवारीवरून पेच?
मुंबई, ४ मार्च / प्रतिनिधी

 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असली तरी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांना हव्या असलेल्या मुंबई दक्षिण मतदारसंघावरून युतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. आज दुपापर्यंत मुंबई दक्षिण, कल्याण आणि यवतमाळ हे मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली होती. मात्र ऐनवेळी मुंबई दक्षिण, कल्याण अन्यथा मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ आम्हाला हवाच, अशी भूमिका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी घेतल्याने पूनम यांच्या उमेदवारीवरून जागावाटपाचा तिढा गुंतागुंतीचा झाला आहे.
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांतच दोन्ही पक्ष प्रत्येकी २४ जागा लढविण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवी सोयरिक जमविण्याचे शिवसेनेचे दबावतंत्र भाजपवर लागू पडल्याने २४ जागा मिळविण्यात शिवसेनेला यश आले आहे. तथापि भिवंडीसारखी आणखी एक जागा पदरात पाडून शिवसेना भाजपपेक्षा वरचढ ठरण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपने २६ आणि शिवसेनेने २२ जागा लढविल्या होत्या. हे सूत्र अमान्य असल्याने शिवसेना-भाजपने प्रत्येकी २४ जागा लढाव्या, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. त्याला भाजप नेते दाद देत नव्हते. शिवसेनेची मागणी थोपविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भाजप एकही जागा वाढवून मागणार नाही, अशी घोषणा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. तरीही भाजपचे नाक दाबून तोंड उघडण्याची खेळी शिवसेना खेळतच राहिली आणि त्यातूनच मुंबई दक्षिण, कल्याण आणि यवतमाळ हे लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यात यश येईल, असा दावा शिवसेनेच्या नेत्याने केला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन-राव यांच्यासाठी सोडावा अशी मुंडे यांची अखेपर्यंत मागणी होती. मात्र महाजन यांच्यावर भाजपचे प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्याच वाटय़ाचा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ पूनम यांच्यासाठी सोडावा, असा डाव शिवसेनेच्या चाणक्यांनी चर्चेच्या वेळी टाकला. अखेर मुंबई दक्षिण, कल्याण आणि यवतमाळ हे तिन्ही मतदारसंघ सोडण्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शवली, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. असे असताना मुंडे यांनी मात्र ऐनवेळी मुंबई दक्षिण, कल्याण अथवा मुंबई उत्तर - पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आग्रह धरल्याने पूनम यांच्या उमेदवारीवरून तिढा गुंतागुंतीचा होत चालला आहे, असे कळते.
युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेला सुटले तर युतीमधील जागावाटप प्रत्येकी २४ असे होईल. सुरेश जैन शिवसेनेत आल्याने जळगाव मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडावा लागेल. याखेरीज भिवंडी मतदारसंघ शिवसेनेलाच द्यावा, असा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे. येथे शिवसेना कुणबी सेनेच्या विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात असून ते तेथे बाजी मारतील, असा शिवसेना नेत्यांचा विश्वास आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी सांगितले की, मुंबई दक्षिण, कल्याण आणि मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघांवरून युतीमधील वाद अद्याप मिटलेला नाही. युती तुटावी अशी आमची इच्छा नाही. मात्र यापैकी एक जागा भाजपसाठी सोडून शिवसेना मनाचा मोठेपणा दाखवेल, अशी अपेक्षा आहे.

वाटपावर एकमत
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि शिवसेनेचे मनोहर जोशी यांच्यात व्यापक चर्चा होऊन
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी शिवसेना २६ आणि भाजप २२ अशा वाटपावर एकमत झाल्याचे रात्री उशिरा समजले.