Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

आता राष्ट्रवादीला हव्या काँग्रेसच्या जागा
मुंबई, ४ मार्च / खास प्रतिनिधी

 

जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीत निर्माण झालेली कटुता नाहीशी होत चालली असली तरी १० ते १२ जागांबाबत अद्यापही रस्सीखेच सुरुच आहे. राष्ट्रवादीने दबावाचे पुरेपुर राजकारण करताना काँग्रेसचे विद्यमान खासदार असलेल्या पाच मतदारसंघांवर दावा करीत काँग्रेसला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. जागावाटपाची राज्यपातळीवरील चर्चा आता संपली असून, अनिर्णित अवस्थेत असलेल्या मतदारसंघांबाबत आता पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये नवी दिल्लीतच निर्णय होईल.
राष्ट्रवादीने बेरकीपणे पक्षाला अनुकूल असलेल्या जागा वाटाघाटींत सोडवून घेतलेल्या असतानाच काँग्रेसला अनुकूल असलेल्या जागांवरही हक्क सांगितला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपावरून गेले काही दिवस तिढा निर्माण झाला होता. मात्र शरद पवार व राहुल गांधी यांची झालेली भेट तसेच प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या घेतलेल्या गाठीभेठी या पाश्र्वभूमीवर त्यातील पेच सैलावत गेले. काँग्रेस व राष्ट्रवादीत २५ - २३ या सूत्रावर शिक्कामोर्तब होईल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते मात्र अद्यापही २६ - २२ अशा सूत्रासाठी आपण आग्रही आहोत, असे भासवत आहेत. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. तेव्हा राष्ट्रवादीबरोबर झालेल्या जागावाटपाचा तपशील सदर करण्यात आला. दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर आता नवी दिल्लीत शरद पवार व प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसच्या वतीने ए. के. अ‍ॅन्टोनी व अहमद पटेल यांच्या पातळीवर चर्चा होईल. नंतरच जागावाटपाच्या अंतिम सूत्रावर शिक्कामोर्तब केले जाईल. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अर्ज सादर करण्याची मुदत ३० मार्च आहे. जागावाटप जाहीर करून नाहक बंडखोरीला वाव मिळू नये म्हणून २० तारखेनंतरच कोण कुठल्या मतदारसंघात लढणार याची यादी जाहीर केली जाईल, अशी चिन्हे आहेत. तोपर्यंत दोन्ही पक्षांकडून वेळकाढू धोरण अवलंबिले जाईल. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या ज्या पाच विद्यमान खासदार असलेल्या मतदारसंघावर दावा केला आहे त्यांत शिर्डी, पालघर (सध्याचा डहाणू), नंदुरबार, धुळे व उत्तर-पश्चिम मुंबई यांचा समावेश आहे. शिर्डी मतदारसंघ रामदास आठवले यांच्यासाठी राष्ट्रवादीला हवा आहे. नंदुरबार किंवा धुळे यापैकी एका मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी आग्रही आहे. विदर्भात
तीन, मराठवाडा चार, ठाणे जिल्ह्य़ातील दोन, उत्तर महाराष्ट्रात तीन व मुंबईत एका जागा मिळावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली व सोलापूर वगळता सातही मतदारसंघांवर राष्ट्रवादीने हक्क सांगितला आहे. राष्ट्रवादीकडे सध्या असलेल्या केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या िहगोली मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. जालना, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, अकोला, रावेर या मतदारसंघांवर दोन्ही बाजूंनी दावे करण्यात आले आहेत.
मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. त्याऐवजी काँग्रेसने राष्ट्रवादीला ईशान्य मुंबई देण्याची तयारी दर्शविली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेस जास्तीत जास्त मतदारसंघांवर दावा करून अनुकूल असलेले मतदारसंघ सोडवून घेण्याची खेळी खेळत आहेत.

काँग्रेसचे संभाव्य मतदारसंघ
अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, भिवंडी, मुंबई उत्तर, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, लातूर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मतदारसंघ
जळगाव, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, िहगोली, परभणी, िदडोरी, नाशिक, ठाणे, कल्याण, मावळ, बारामती, शिरुर, नगर, बीड, उस्मानाबाद, माढा, सातारा, कोल्हापूर व हातकणंगले.