Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

लोणार सरोवरात किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणूंचे अस्तित्व!

 

भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आज (५ मार्च) देशात ‘राष्ट्रीय भूविज्ञान दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त या अनोख्या सरोवरातील नव्या संशोधनाबाबत..

अभिजित घोरपडे
पुणे, ४ मार्च
अशनी आदळल्यामुळे निर्माण झालेल्या लोणार येथील प्रसिद्ध सरोवराच्या पाण्यात किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणूंच्या (रेडिओअ‍ॅक्टिव्ह रेझिस्टंट बॅक्टेरिया) अस्तित्वाचे पुरावे मिळाले असून, त्यामुळे या सरोवराच्या वैशिष्टय़ात आणखी एक भर पडली आहे. या जीवाणूंना ही क्षमता कशामुळे प्राप्त झाली याचा शोध घेण्याची आवश्यकता असतानाच, प्रत्यक्षात मात्र या सरोवराकडेच दुर्लक्ष होत असल्याने त्याचे वेगळेपणच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
विदर्भात बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार येथे अशनीच्या धडकेमुळे तयार झालेले अनोखे सरोवर आहे. ते पूर्णपणे वर्तुळाकार आहे. त्याचा व्यास सुमारे १.८ किलोमीटर इतका असून, त्याचा काठही अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून आहे. त्याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाली की अवकाशातून अशनी येऊन पडल्यामुळे, हे असे दोन मतप्रवाह होते. पण आता बहुतांश अभ्यासकांनी ते अशनीच्या धडकेमुळेच निर्माण झाल्याच्या मतावर शिक्कामोर्तब केले आहे. त्याच्या निर्मितीचा काळ सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. या पाण्याचा खारेपणा हेही प्रमुख वैशिष्टय़ ठरले आहे. आता त्यात किरणोत्सार प्रतिबंधक जीवाणूंच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. पुण्यातील राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतर्फे (एन.सी.सी.एस.) या सरोवराच्या पाण्यातील सूक्ष्म जीवाणूंचा नुकताच अभ्यास करण्यात आला. त्यात वैशिष्टय़पूर्ण ‘डी.एन.ए. क्रम’ आढळले आहेत. हे क्रम म्हणजे ‘डायनो-कोकस’ या किरणोत्सारी प्रतिबंधक जीवाणूंच्या अस्तित्वाचा पुरावाच मानला जातो. याबाबत अधिक अभ्यास झाल्यास हे जीवाणू मिळवता येतील, असे एन.सी.सी.एस.मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी सांगितले. किरणोत्सारी प्रतिबंधक जीवाणू इतरही काही ठिकाणी आढळले आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणच्या जीवाणूंमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार वेगळेपण आढळते. त्यामुळेच या जीवाणूंना किरणोत्सार प्रतिबंधक क्षमता नेमकी कशामुळे प्राप्त झाली याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
याचबरोबर इतरही काही महत्त्वपूर्ण जीवाणू आणि विकरे (एन्झाईम्स) या पाण्यात आढळली आहेत. त्यांचा उपयोग करून घेतला तर ते औद्योगिकदृष्टय़ाही महत्त्वाचे आहेत. त्याचाही पाठपुरावा झालेला नाही. प्रत्यक्षात मात्र आता या तलावात जास्त प्रमाणात पाणी येत असल्याने या तलावाचा खारेपणा कमी झाला आहे. असेच होत राहिले तर लवकरच ते गोडय़ा पाण्याचे सरोवर बनेल आणि त्याचे वेगळेपणच नष्ट होईल.