Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच मोदी गरजतात!
ठाणे-नाशिकनंतर आज औरंगाबादेत सभा
औरंगाबाद, ४ मार्च/खास प्रतिनिधी

 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती टिकते की नाही, याचे चित्र अजून धूसरच आहे. त्यातच जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसलेले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातच गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी नरेंद्र मोदी यांच्या सभा होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीत श्री. मोदीच भा. ज. प.चे प्रमुख प्रचारक असणार आहेत. (कै.) प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर प्रभारीपदाची सूत्रे श्री. मोदी यांच्याकडे आली आहेत. त्यांच्या गोंदिया येथील सभेने भा. ज. प.च्या प्रचाराचा आरंभ झाला. या सभेनंतर पिंपळगाव (नाशिक) व ठाणे येथे त्यांच्या सभा झाल्या. लोकसभेचे नाशिक व ठाणे मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे आहेत.
नाशिक, ठाणे या शिवसेनेच्या गडानंतर औरंगाबादेतही उद्या (गुरुवारी) भा. ज. प.ने श्री. मोदी यांची सभा आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या औरंगपुऱ्यातील मैदानावर होणार आहे. या मतदारसंघावर १९८८पासून वर्चस्व आहे ते शिवसेनेचे. अपवाद १९९८च्या निवडणुकीचा. त्या निवडणुकीत काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील निवडू आले होते. श्री. मोरेश्वर सावे शिवसेनेच्या पाठिंब्यावर एकदा आणि नंतर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले. शिवसेनेचेच माजी महापौर प्रदीप जैस्वाल १९९८मध्ये पराभूत होण्यापूर्वी या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडून आले. आपले वर्चस्व असणाऱ्या औरंगाबादेत श्री. मोदी यांची सभा आयोजित केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे.
युतीमधील सध्याचा तणाव पाहूनच भा. ज. प.ने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात श्री. मोदी यांच्या सभा ठेवल्या आहेत. ‘प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढविण्याची आवश्यकता आहे, गरज आहे; त्यामुळेच मोदींची सभा औरंगाबादेत होत आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे भा. ज. प.चे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. शिवसेनेशी युती झाली नाही तर आम्ही स्वबळावर जागा लढविण्यासाठी सज्ज आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. युती तुटली तर आपण तयारीत असलेले बरे या पद्धतीने भा. ज. प. वागत आहे.