Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

याद आंबराईची

 

बाहत्तराच्या दुष्काळात आमची सारी आंबराई तुटून पडली. सारी झाडं रायवळ जातीची. केव्हा, केव्हा घरपुरुषांनी लावलेली. झाडं ओळखीची. फांदी ना फांदी माहितीची. साऱ्यांच्या चवी वेगळ्या जातीच्या. चवीच्या जाती आता सांगता येणार नाहीत; पण रंग, आकार, चव यावरून आम्ही त्या-त्या झाडांची नावं ठेवली होती. ‘आंबटय़ा’, ‘खोबऱ्या’, ‘शेप्या’, ‘शेंदऱ्या’, ‘शिंगडय़ा’ ही त्यातली काही प्रमुख नावं. पण या साऱ्यांत आंबराईचा म्हणून एक खानदानीपणा होता. झाडाला झाडं खेटून, एकात एक मिसळून गेलेली. एक मोठय़ा अर्धवर्तुळानं झाडाची लागत झाल्याली. साऱ्या भावकीचा वाटा या आंबराईत होता. म्हणजे या आंबराईनच सारी भावकी एकत्र बांधून ठेवली होती.
हिवाळा संपतानाच सारी आंबराई मोहरानं फुलून यायची. या साऱ्या चवीच्या आंब्याचा मोहर एकमेकांत मिसळून जाई. अन् साऱ्यांचा आंबूस-गोड, पण खमंग वाटणारा वास, साऱ्या रानभर पसरून जाई. आंब्याच्या काही फांद्यावर मोहकांची पोळं असायची. अन् दिवसभर साऱ्या आंबराईभर मधमाशा घोंगावत राहात. याच दरम्यान परीक्षांचाही हंगाम असायचा. अभ्यासाचं निमित्त करून भावकीतली मुलं हक्कानं आंबराईत येत. झाडाबुडी पोतं टाकून झाडाच्या फांद्या ना फांद्या न्याहळत राहात. गळफांदीचं एखादं मोहोळ झाडून मध चाटून खात. खाता खाताच कोणत्या आंब्याची चव-वास या मधात आहे, हे सांगून त्या त्या झाडाकडं काहीसा आपलेपणानेही बघत. मग दिवसभर हेच काम हाती घेत हिंडत. अभ्यासाची पुस्तकं आंब्याबुडीच फडफडत राहात.
काही दिवसानं हा सार मोहर गळून खाली पडत राहायचा. त्या त्या जाग्यावर बोराएवढय़ा, अवळ्याएवढय़ा कैऱ्या लागायच्या. आणि अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर तिखट-मीठाच्या पुडय़ाही पोरांना गरजेच्या वाटायच्या. याच काळात गुराख्या पोरांच्याही वर्दळी वाढायच्या. गुरं-ढोरं सावलीसाठी आंबराईत यायची अन् पोरं वळती करण्यसाठी झाडं हेरीत आंबराईत घुसायची. भावकीतली आणा-दोन आण्याचे वाटेकरी असणारी मालकं गुराख्यावर गुरकायची. हातातल्या इजळक्या कैऱ्या हिरावून घ्यायची. कुरबुरी वाढायच्या. कलागती व्हायच्या. पोरासोरांच्या या कलागती बघता बघता त्यांच्या त्यांच्या आयांपस्तोर पोचायच्या. रात्री-सकाळी आयांच्या कलागती व्हायच्या. बापगडी माणसं हिस्स्यावरून वर्दळीला यायचे. र्अध गाव भावकीचं अन् त्यातही अर्धाआण्यापस्तोरचे हिस्सेदार मालकाच्या तोऱ्यात यायचे.
कवळ्या कोयीच्या कैऱ्या हळूहळू लोणच्यासाठीच्या आकारात यायच्या. अन् पोरांच्या ‘खुलवरी’ सुरू व्हायच्या. भल्या पहाटेच एकमेकांच्या नजरा चुकवून पोरं झाडं चढायची. खिशात, पिशवीत कैऱ्या भरून माळामाळानं कळंबचा बाजार जवळ करायचे. बसून विकलं, तर कुणी भावकीतला ओळखील, या भीतीनं कोणी बागवानालाच या निबर कैऱ्या मिळेल त्या पैशांत देऊन पोरं मोकळी व्हायची. अन् संध्याकाळी पुन्हा भांडणाला ऊत यायचा. ‘ह्य़ानंच पिशवी भरून नेल्या’ अन् मग त्या पोरांच्या चौकशीसाठी वेळप्रसंगी ‘तू-मी’ करण्यासाठी बाया सरसावयाच्या.
पाखरखाती एखाद्या फळावरून झाडाला ‘पाड’ लागल्याची बातमी भावकीत पसरून जायची अन् पोरं-बायका पाडासाठी परस्परांवर पाळत ठेवून वागायची. संशयानं बघत राहायची. वर्दळ वाढायची. कोणत्या झाडाला पाड लागलाय, कोणतं झाड उतरण्यासाठी आलंय याची चर्चा व्हायची. वाटण्यावरून वादावादी व्हायची. मोसम सरायचा. सारी आंबराई बिचारी व्हायची. मुकी होऊन जायची. आता आपला काळ संपल्यागत झाडं दिसायची. आता सारंच आटल्यागत झालं होतं. कसलं तरी दिसामासाचं वांझपण आल्यासारखं झाडं, फांद्या मुळात वाळत चालली. एकानं एक ‘मर’ लागल्यागत झालं.
चार भावकीतली म्हातारी माणसं बसली होती. वखारवाल्याशी ‘सौदा’ ठरत होता. दुष्काळ झाडावरून माणसात शिरून पसरत होता. सारी आंबराईच गेंदमर्जीची झाली होती. दोनशे रुपयांपासून दहा रुपयापर्यंत हिस्सं भावकीनं वाटून घेतलं.
अन् रौनकदार आंबराई वखारवाल्याच्या मिशनीनं आडवी झाली. म्हसरांचा कळप बसावा तसं अंब्याची लाकडं साऱ्या रानभर पसरून पडली होती. वाऱ्यानं हिरवा वाळका पालापाचोळा रानारानात पसरत पांगत होता. अन् जळती उन्हं साऱ्या रानावरून झळाया मारीत फिरत होती.
या साऱ्या झळ्यांनी हिरवेपणाशी वैरच पत्करलेलं होतं. उभ्या गावरानावर या दुष्काळाचा क्रूर हात पसरत होता. त्या दुष्काळानं झाडं खाल्ली. गुरंढोरं मारली. माणसं देशोधडीला लागली. सारा सारा परिसर उलटा-पालट झाला. खडी केंद्रावर माणसं भर उन्हात, दगडं फोडू लागली. दुष्काळी कामं निघाली. लोकांनी घरातली भांडी-कुंडी, किडूक-मिडूक बाजारात मांडलं. माणसं हवालदिल झाली. पिढय़ापिढय़ांनी जपलेली, जोपासलेली फळा-फुलांची झाडंही, पोटाच्या आगीत करपून गेली.
माझी आंबराई याच जाळात जळून खाक झाली. आता ह्य़ा पोरक्या वावरातून फिरताना उगीचच आंब्याच्या मोहोराचा वास येतो. आंब्याची आंबट-गोड चवीची जिभीला साद येते.