Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

एस. टी. बस पेटल्याने १६ जखमी
पाच जणांचे डोळे पूर्ण निकामी
उस्मानाबाद, ४ मार्च/वार्ताहर

 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) उस्मानाबाद आगाराची उजनी-उस्मानाबाद बसने आज स्थानकातच पेट घेतल्याने १६ प्रवासी जखमी झाले. जर्मनच्या डब्यात भरलेल्या जिलेटीनमुळे ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घातपाताची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. रासायनिक द्रव्यामुळे लागलेल्या आगीच्या ज्वालांनी पाच जणांचे डोळे पूर्णत: निकामी झाले आहेत. सत्तरीच्या राजमती सावंत ४३ टक्के भाजल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. हा अपघात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला.
जखमींची नावे अशी : जनाबाई माळी (वय ५०), अनिता देवकर (३०), परशू पवार (६५), सुदर्शन गुरव (१५), हरिदास ढवळे (३५), वजीर शेख (५०), सखाहरी कुलकर्णी (५५, सर्व राहणार बेंबळी), उजाला गायकवाड (६०, देवळाली), छाया परीट (४०, धुत्ता), किसन सांगवे (६५, उमरेगव्हाण), रमेश जाधवर (१७, बरमगाव), गोपाळ खटके (१६, नांदुर्गा), राजमती सावंत, मारुती सिरसाट, कावेरी गायकवाड आणि विठ्ठल पाटील.
उस्मानाबाद-उजनी-उस्मानाबाद बस (क्रमांक एमएच २० डी ३६९५) स्थानकात लागल्यावर उजनीकडे जाण्यासाठी प्रवासी बसले. बसच्या मधल्या आसनामध्ये अनपेक्षितपणे आग लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. गाडीत धूरच धूर झाला आणि प्रत्येक जण दरवाजाच्या दिशेने पळू लागले. काही जणांचे डोळे तेथेच निकामी झाले. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. प्रवाशांना बाहेर काढून आग विझविण्यात आली. प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी बसमधून काही संशयास्पद वस्तू जप्त केल्या. विहीर खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटिनची वाहतूक धातूच्या डब्यातून होत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे उजनी मार्गावर पोलीस चौकशी करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बसस्थानकातच स्फोट झाल्याची बातमी शहरात पसरली. हा घातपात नव्हता असे सांगण्यात आले.