Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दासबोध म्हणजे जीवनाला दिशा देणारा ग्रंथ - विलासराव
लातूर, ४ मार्च/वार्ताहर

 

जीवनाचा नेमका अर्थ समजावून सांगणारा व जीवनाला दिशा देणारा ग्रंथ म्हणून दासबोधाकडे पाहिले पाहिजे. हे ज्ञान केवळ मराठीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण जगात ते पोहोचविण्याचे काम या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादामुळे होईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज व्यक्त केली.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी दासबोधाचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. या अनुवादाच्या दोन खंडांचे प्रकाशन आज झाले. या कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. श्री. चाकूरकर, गृहमंत्री जयंत पाटील, कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडामंत्री दिलीप देशमुख, पुण्याच्या ‘एम. आय. टी.’चे अध्यक्ष डॉ. वि. दा. कराड, आमदार चंद्रशेखर भोसले, खासदार जनार्दन वाघमारे, गोपाळराव पाटील, डॉ. अशोक कुकडे आदी या वेळी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मराठवाडय़ाला संतांचा वारसा आहे. संत वाङ्मयाचा हा वारसा चाकूरकरांनी जोपासला आहे. नवीन पिढीत संतवाङ्मयाविषयी मोठे कुतूहल आहे. ते शमविण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषेत वाङ्मय पोहोचविले पाहिजे. नव्या पिढीतही अध्यात्म समजून घेण्याची जिज्ञासा आहे. जीवनाचा अर्थ समजावून घेणे व समाधानाचा शोध घेऊन चिंतामुक्त आयुष्य घालवावे, अशी इच्छा प्रत्येकाची आहे. दासबोध जीवनाला नवा दृष्टिकोन देणारा ग्रंथ आहे. दासबोधावर पुस्तक लिहिणे आणि त्याचा अनुवाद करणे यात प्रचंड फरक आहे. हे तपस्येचे काम चाकूरकरांनी केले आहे. नव्या पिढीत चिंता विसरून चिंतनाचे भाव रुजावेत यासाठी हा ग्रंथ आवश्यक आहे. राजकारणी मंडळीसाठी हा मार्गदर्शक ग्रंथ आहे. हा गाभा चाकूरकरांनी लक्षात घेतला आहे.’’
श्री. चाकूरकर म्हणाले, ‘‘इतरांना दासबोध समजावून सांगण्यासाठी नाही तर दासबोध स्वत: समजून घेण्यासाठी त्याचा इंग्रजी अनुवाद मी केला. इंग्रजीत बायबल हा सर्वात सोपा ग्रंथ आहे. तसाच मराठीत सर्वात सोपा ग्रंथ दासबोध होय. हा केवळ साहित्यिक नव्हे, तर आध्यात्मिक ग्रंथ आहे. जीवनातील प्रत्येक अंगासंबंधी दासबोधात उपदेश आहे. कौटुंबिक दु:ख आणि राजकीय पिछेहाट हसत हसत सहन करण्याची दासबोध शक्ती देतो. मी स्वत: १ हजार पाने गेल्या सात-आठ वर्षांपासून लिहून काढली आणि नंतर ती टंकलिखित केली. आपले आध्यात्मिक ज्ञान या निमित्ताने जगभर उपलब्ध होईल.’’
डॉ. कुकडे म्हणाले की, चाकूरकर तत्त्वज्ञ राजा आहेत. आपल्या देशात प्रचंड सांस्कृतिक ठेवा आहे. तुज आहे तुजपाशी, मात्र तू जागा चुकलाशी अशी समाजाची स्थिती आहे. दासबोध हा ग्रंथ व्यवहारशास्त्र शिकवणारा आहे.
डॉ. वाघमारे म्हणाले की, समर्थ रामदासांनी ईशसंवाद, आत्मसंवाद लिखाणातून साधला. दासबोधातून त्यांनी जनसंवाद केला. श्री. दिलीप देशमुख म्हणाले की, रामदासांनी लहानपणापासूनच विश्वाची चिंता करण्यास सुरुवात केली होती. त्याच शृंखलेतील चाकूरकर आहेत.
‘तत्त्वापासून न ढळणारे असे चाकूरकर राजकारणातील संत आहेत,’ असे उद्गार श्री. जयंत पाटील यांनी काढले. रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर यांची ग्रंथसंपदा आयुष्याच्या उत्तरार्धात अभ्यासाची नसून ती आयुष्याची सुरुवात करताना अभ्यासली पाहिजे. शालेय शिक्षणात या ग्रंथातील काही बाबी अभ्यासासाठी ठेवायला हव्यात. नव्या पिढीत या संस्काराची अधिक गरज आहे, असे ते म्हणाले.
पुस्तकाचे प्रकाशक प्रा. बी. व्ही. मोतीपवळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कराड म्हणाले की, दासबोध हा व्यवस्थापनशास्त्र सांगणारा ग्रंथ आहे. श्री. बसवराज पाटील मुरूमकर, श्री. थोरात यांचीही भाषणे झाली. प्रा. देवेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन जयप्रकाश दगडे व प्राचार्य सोमनाथ रोडे यांनी केले. नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी आभार मानले.

‘मी संत नाही!’
श्री. चाकूरकर म्हणाले, ‘‘मी राजकीय संत असल्याचा उल्लेख अनेकांनी भाषणात केली. मात्र मी संत नाही हे स्पष्ट करू इच्छितो. माझ्या विचारापेक्षा मी वापरत असलेल्या कपडय़ांचीच चर्चा अधिक झाली होती.’’