Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पालच्या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपींना अटक
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

पाल येथे तरुणाचा ठेचून खून केल्याच्या गुन्ह्य़ातील मुख्य चार आरोपींना काल रात्री अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. शेळके यांनी आज सांगितले. संदीप जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सचिन जाधव व सुरेश जाधव अशी त्यांची नावे आहेत. एकाला गुन्हे शाखेने व तिघांना तपास पथकाने अटक केली.
रोहिदास तुपे पालमध्ये आल्यानंतर या चौघांनीच त्याला पकडून मारत आणले आणि चौकातील खांबाला बांधल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चौघांचा कसून शोध घेण्यात येत होता. महाशिवरात्रीला हा खून झाल्यानंतर तेव्हापासून आरोपी फरारी होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता ४७ झाली आहे. घटनेच्या दिवशीच पोलिसांना सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील ४३ जणांना अटक करण्यात आली होती. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या उर्वरित लोकांना नंतर सोडून देण्यात आले. न्यायालयाने ३९ जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून, ते सर्व सध्या हर्सूल कारागृहात आहेत.
घटनेनंतर वरील चौघेही वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकांकडे फिरत होते. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचाही प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. आरोपींचा शोध असल्याचे पोलीस सांगत असल्याने अन्य गावकरीही फरारी होते. अखेर पोलिसांनी यांचा शोध घेतला आणि काल रात्री या चौघांना अटक करण्यात आली. आणखी काही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून अटकेच्या भीतीपोटी गावातून गायब असलेल्या गावकऱ्यांनी गावात परतावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.