Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दहावीच्या ३२ विद्यार्थ्यांचे परीक्षाकेंद्र अचानक बदलले
उदगीरमध्ये सावळा गोंधळ
उदगीर, ४ मार्च/वार्ताहर

 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेला उद्यापासून (गुरुवार) सुरुवात होत आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था झाल्यानंतर शहरातील ३२ विद्यार्थ्यांचे केंद्र ग्रामीण भागात असल्याचे अचानक सांगण्यात आले. या बदलामुळे सर्वच केंद्रांवर गोंधळ उडाला. शहरातील आठ केंद्रांवर २ हजार ५७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून परीक्षा केंद्रावर सर्व रचना लावण्याचे काम चालू होते. सर्व व्यवस्था अंतिम टप्प्यात आल्यानंतर येथील धुरपतमाता माध्यमिक विद्यालयाचे ३२ विद्यार्थी तोंडचीर येथील जिजामाता विद्यालयाच्या केंद्राकडे वर्ग करण्यात आले. वर्ग करण्यात आलेले विद्यार्थी हे उदगीरमधील पाच परीक्षा केंद्रांतून परीक्षा देणार होते.
परीक्षा मंडळाकडून २५ विद्यार्थ्यांची बारकोड क्रमांकासह यादी त्या त्या केंद्रास देण्यात आली होती. काल सायंकाळी पाच वाजता ते बारकोडस्टीकर तोंडचीरच्या जिजामाता विद्यालय येथे देण्यात यावे असा आदेश असलेले व ‘२५ जानेवारी’ तारीख असलेले पत्र पाच केंद्रांना देण्यात आले.
शहरातील परीक्षा केंद्रे ही ग्रामीण परीक्षा केंद्रापेक्षा कडक शिस्तीत, कॉपीविरहीत चालतात. त्यामुळे तर हा बदल केला गेला नसेल का, अशी चर्चा सर्वच परीक्षा केंद्रांवर चालू होती. या बाबत लातूर येथील विभागीय परीक्षा कार्यालयाशी संपर्क साधले असता या ३२ विद्यार्थ्यांना तोंडचीर येथील जिजामाता विद्यालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय ६ फेब्रुवारीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. धुरपतमाता विद्यालयाच्या मागणीनुसार हा बदल झाल्याचेही सांगण्यात आले. याच बरोबर अहिल्यादेवी माध्यमिक विद्यालयातील सात अपंग विद्यार्थ्यांनाही त्यांचे मूळचे परीक्षा केंद्र बदलून देण्यात आले.