Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कारवाईच्या इशाऱ्यामुळे फलक, जाहिराती गायब!
बीड, ४ मार्च/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर राजकीय पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या जाहिरात व घोषणा फलक काढण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मर्यादा देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पक्षाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी पंकजकुमार यांनी दिला; त्यामुळे मंगळवारी रात्रीतून अनेक फलक व जाहिराती गायब झाल्या.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पंकजकुमार यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांची बैठक काल घेतली. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचारसंहिता २ मार्चपासून लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात निवडणुका शांततेत पार पाडाव्यात आणि आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सार्वजनिक ठिकाणी चौक व मुख्य रस्त्यावर विविध पक्षाच्या व संघटनेने लावलेले फलक, जाहिराती, घोषणापत्र अठ्ठेचाळीस तासांत, गुरुवर्ाी सायंकाळपर्यंत काढून घ्यावेत अथवा पुसून टाकावेत असे आवाहन केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने या जाहिराती पुसून टाकण्यात येतील आणि त्यासाठी लागणारा खर्च कायदेशीरपणे संबंधित पक्ष संघटनेकडून वसूल केला जाईल. त्याचबरोबर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कडक कारवाईही करण्यात येईल, असा इशारा दिला आहे; त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत चौक आणि प्रमुख रस्त्यावर अनेक दिवसांपासून विविध पक्ष संघटनांचे लागलेले डिजिटल फलक व जाहिराती गायब झाल्या आहेत.