Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक आयोगाच्या बडग्यामुळे भा. ज. प.ची तारांबळ
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

शैक्षणिक संस्थांच्या मैदानांवर राजकीय पक्षांच्या जाहीर सभा घेण्यास आयोगाने मनाई केल्याने याचा पहिलाच फटका भारतीय जनता पक्षाला औरंगाबादेत बसला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्या (गुरुवारी) येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मैदानावर जाहीर सभा होणार होती. यासाठी व्यासपीठ उभारण्यापासून सर्व तयारीही पूर्ण होत होती. ऐनवेळी सभेचे मैदान बदलण्यासाठी भा. ज. प.च्या स्थानिक कार्यकर्त्यांना मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारी दिवसभर धावपळ करावी लागली.
सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्याचे पूर्वी ठरविण्यात आले होते. शैक्षणिक संस्थाच्या जागा राजकीय पक्षांसाठी या काळात वापरता येणार नाही असा दंडक निवडणूक आयोगाचा पूर्वी नव्हता; परंतु २००९ च्या निवडणुकीसाठी आचारसंहितेमध्ये या जागा सभेसाठी वापरता येणार नाही हा दंडक राजकीय पक्षांना घालण्यात आला. भा. ज. प.ने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडीच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची निवड करण्यात आली. मंगळवारी सायंकाळपर्यंत येथे व्यासपीठ उभारण्यापासून मंडप आणि आसन व्यवस्थेची तयारी करण्यात येत होती.
आचारसंहितेच्या काळात शैक्षणिक संस्थांची मैदाने वापरायची नाहीत, असा निर्णय मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला आणि संयोजकांची तारांबळ उडाली. मोदी यांच्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, राजस्तानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, राष्ट्रीय महिला मोर्चाच्या चिटणीस स्मृती इराणी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याने तातडीने अन्यत्र सभेची तयारी करण्याचे दडपण संयोजकांवर होते.
‘शासनाच्या परिपत्रकानुसार शैक्षणिक संस्थांचे मैदान राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी देता येत नाही. त्यामुळे या मैदानावर सभा घेण्यासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे’ असे पोलीस आयुक्तालयाने काल रात्री साडेआठ वाजता संयोजकांना कळविण्यात आले. त्यानंतर भा. ज. प.च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र ‘आयोगाचे स्पष्ट निर्देश असल्याने सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेता येणार नाही’ असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. तेथे सभा घेण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगीही दिली. कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून सांस्कृतिक मैदानावर करण्यात आलेली सर्व व्यवस्था जिल्हा परिषद मैदानावर हलविली. ‘आमचे कार्यकर्ते रात्रभर झटत होते. तेथील पूर्ण झालेली तयारी मोडून पुन्हा जिल्हा परिषद मैदानावर तयारी करावी लागल्याने तारांबळ उडाली खरी पण त्याला काही इलाज नव्हता.’ असे भा. ज. प.चे शहराध्यक्ष अतुल सावे यांनी सांगितले. उद्या सकाळपासून सभास्थानी राज्यातून आलेल्या महिला कार्यकर्त्यांचे शिबिर होणार असल्याने तातडीने व्यासपीठ आणि मंडप तयार करणे गरजेचे होते.
एकाच सभेची दोनदा तयारी करावी लागल्याने सभेच्या खर्चात वाढ होणार आहे. आचारसंहिता असल्याने या सभेचा खर्च आयोगासमोर सादर करावा लागणार आहे. ‘सभेच्या खर्चात वाढ झाली हे खरे आहे आणि नियमानुसार सभेचा खर्च आयोगाकडे सादर केला जाईल’ असेही सावे यांनी सांगितले.