Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वाद सुरू असताना रुग्णालयात कर्मचारी जळाला
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

सेठ नंदलाल धूत रुग्णालयात कामगार संघटना स्थापन्यावरून व्यवस्थापनाशी वाद सुरु असतानाच एक कर्मचारी रुग्णालयातच जळाल्याची घटना आज सकाळी सेठ नंदलाल धूत रुग्णालयात घडली.
सिद्धार्थ मोरे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याचा डावा हात आणि पाय जळाला आहे. प्रशासकीय विभागात हा प्रकार घडला. त्याच्यावर धूत रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मोरे आणि इतर सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. निकालही त्यांच्या बाजूने लागला होता. तरीही त्यांना सेवेत कायम करून सर्व सुविधा देण्यास प्रशासनाने नकार दिला आणि त्याच रागातून त्याला जाळण्यात आले असल्याचा आरोप ‘सिटू’ संघटनेच्या येथील शाखेचे अध्यक्ष गोरखनाथ राठोड यांनी केला.
मोरे हा येथे गेल्या दहा वर्षांपासून सेवेत होता. मात्र व्यवस्थापनाकडून कायम करण्यात आले नव्हते आणि पगारही अत्यल्प देण्यात येत होता. त्यामुळे सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी गेल्या एक वर्षांपूर्वी सिटु या संघटनेची सलग्नता घेऊन युनियनची स्थापना केली होती. तेव्हापासून कर्मचारी संघटीत झाले होते आणि त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती.
न्यायालयाचा निकाल कर्मचाऱ्यांच्याच बाजूने लागला होता आणि त्यानुसार ३ मार्चला या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्याबद्दल पत्र देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले होते. मात्र मंगळवारी पत्र न मिळाल्याने मोरे हा आज सकाळी पर्सनल अधिकारी डोणगावकर यांच्याकडे गेला होता. तेथे त्याने पत्राची मागणी केल्यानंतर हा प्रकार घडला.
डोणगावकर यांच्यासह दुसरे अधिकारी वली खान आणि प्रशासकीय अधिकारी सुरेश बाफना यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. या तिघांचे मोबाईल बंद होते आणि श्री. बाफना मोबाईलला उत्तर देत नव्हते; त्यामुळे व्यवस्थापनाचे म्हणणे समजू शकले नाही. सायंकाळपर्यंत या प्रकरणी पोलिसात नोंद झाली नव्हती.