Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून युवक प्रदेश चिटणीस पाशा यांना अटक
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली. आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरू न प्रदेश चिटणीस साजेद पाशा यांच्यासह १८ कार्यकर्त्यांना सिटी चौक पोलीसांनी दुपारी अटक केली.
वेगवेगळ्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे सुमारे ५० कार्यकर्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी संजीव जयस्वाल यांनी त्यांना सांगितले. मात्र निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शेळके हे तेथे नव्हते. त्यांना येण्यास अर्धातास विलंब झाला. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांच्याकडे निवदेन देण्यासाठी हे कार्यकर्ते गेले होते. तेथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि लगेच पोलिसांनी १८ कार्यकर्त्यांना अटक केली.
पाच वेगवेगळी निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार होती. एक निवेदन देण्यासाठी पाच जण जाऊ शकतात. आम्ही बरोबर २५ जण होतो. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचाही भंग होत नाही, असे साजेद पाशा यांनी सांगितले. निवेदन वेळेत घेण्यात न आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते म्हणून त्यांनी घोषणाबाजी केल्याचेही त्यांनी सांगितले.