Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाल येथील ‘त्या’ मुलीचे बारावीचे वर्ष वाया गेले!
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

पाल येथे महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या अमानुष घटनेनंतर बारावीची विद्यार्थिनी असलेली ती मुलगी गावातून गायब आहे. घटनेच्या दोन तीन दिवसांनंतर ती गावात परतेल, असा गावकरी तसेच पोलिसांचाही अंदाज होता. मात्र ती अद्यापि परतलेली नाही. बारावीच्या एकाही विषयाच्या परीक्षेला ती उपस्थित राहिली नाही. त्यामुळे या घटनेने तिचे वर्ष वाया गेले आहे.
रोहिदास तुपे यास खांबाला बांधून मारण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्या मुलीचे वडील, आई, चुलते, चुलत्या असे सर्वच जवळचे नातेवाईक अटकेत आहेत. त्या दिवशी ही घटना समजताच रक्तदाब वाढल्याने तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून ती कोठे गेली याची गावकऱ्यांना कल्पना नाही. पोलिसांना तिचाही जबाब नोंदवायचा आहे. त्यांनीही चौकशी केली असता ती नातेवाईकांकडे गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. कोणत्या नातेवाईकाकडे आहे, याची माहिती पोलिसांकडे नाही.
ही मुलगी यंदा बारावीला होती आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर ती येईल, असा अंदाज पोलिसांचा होता. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तथापि ती परीक्षेलाच आली नाही.
‘घरातील सर्वच अटकेत असल्यामुळे तिला घरी ठेवण्यात आले नाही. ती मुलगी नातेवाईकांकडे असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय ती परिक्षेलाही हजर नव्हती.’ असे पोलीस उपअधीक्षक पी. पी. शेळके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मुलीने पोलिसांच्या नावे लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना देण्यात आली आहे. मात्र ही चिठ्ठी तिने दडपणाखाली लिहिली असल्याचा आरोप झाल्यानंतर तिचा पोलिसांसमक्ष जबाब घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस तिचा शोध घेत आहेत.