Leading International Marathi News Daily
गुरुवार, ५ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

औरंगाबादला येणारच - वसंत वैद्य
औरंगाबाद, ४ मार्च/प्रतिनिधी

 

बदली आदेश येऊन दोन आठवडे झाल्याने पालिका आयुक्तपदी बदली झालेले पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी वसंत वैद्य येथे येणार नसल्याची चर्चा पालिका वर्तूळात जोर धरू लागली आहे. मात्र ‘या चर्चेला काहीही अर्थ नाही. येथे दुसऱ्याकडे पदभार सोपविला की येत्या चार दिवसांत मी औरंगाबादला येणारच’ असा दावा श्री. वैद्य यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला आहे तर ‘वैद्य येणारच, काहीच अडचण नाही’ असे पालिकेचे माजी आयुक्त आणि पुण्याचे विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद पालिकेला आयुक्त म्हणून येण्यास अधिकारी राजी नसतात. त्यामुळेच नवीन सोना यांनी झालेली बदली रद्द केली होती. त्यानंतर आयुक्तपदासाठी अधिकारीच सापडत नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी श्री. वैद्य यांची आयुक्त म्हणून बदली झाली होती. दोनच दिवसांत ते येथे रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यास आता पंधरा दिवस लोटले आहेत. शिवाय आता आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे वैद्य आता येणार नाहीत, अशी चर्चा पालिका वर्तूळात जोर धरू लागली होती.
श्री. वैद्य यांच्याशी संपर्क साधला असता ‘आचारसंहिता सुरु झाली असली तरी मला तेथे येण्याला अडचण नाही. मी तेथे येण्यास उत्सूक नाही, असे काहीच नाही. येथे अधिकारी येण्याची प्रतीक्षा मी करत आहे. येत्या एक दोन दिवसात येथे नवीन अधिकारी येईल आणि त्यांच्याकडे पदभार सोपविल्यानंतर लगेच मी औरंगाबादला येईल. या आठवडय़ात किंवा सोमवारी मी औरंगाबादला असेल’ असे त्यांनी सांगितले. ‘श्री. वैद्य आतापर्यंत औरंगाबादला यायला हवे होते. तेथे येण्यास काहीही अडचण नाही’ असे श्री. बंड यांनीही सांगितले.
श्री. बंड यांच्या बदलीनंतर उपायुक्त उद्धव घुगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. पालिकेची आर्थिक आणि एकूणच परिस्थिती पाहता येथे कायमस्वरुपी अधिकाऱ्याची गरज आहे.